‘ऐ दिल ए नादान…’ या गाण्याच्या प्रेमात बिग बी पडले होते!
भारतीय सिनेमाच्या दुनियेत कमाल अमरोही या दिग्दर्शकाचे नाव अग्रक्रमाने घ्यायाला हवे इतकी भरीव कामगिरी त्यांनी केली आहे. १९४९ सालच्या ‘महल’ या चित्रपटापासून त्यांचा सुरू झालेला दिग्दर्शनाचा प्रवास १९८३ सालच्या ‘रजिया सुलतान’ पर्यंत अतिशय दिमाखदार आणि भारतीय सिनेमाला श्रीमंत करणारा असा होता. (Khayyam)
दिग्दर्शक के. असिफ यांच्याप्रमाणेच कमल अमरोही देखील आपल्या चित्रपटाची निर्मिती अतिशय मन लावून आणि तब्येतीने करत असे. त्यामुळे त्यांचे चित्रपट बनायला दहा दहा वर्षाचा कालावधी लागत असे. मीनाकुमारी यांच्या निधनानंतर १९७३ साली त्यांनी आपल्या पुढच्या एका भव्य दिव्य सिनेमाची सुरुवात केली. हा चित्रपट होता ‘रजिया सुलतान’ . सुमारे आठशे वर्षांपूर्वीचा कालखंड. मुघल साम्राज्यातील एकमेव राणी असलेली रजिया सुलतान हिच्या जीवनावरची ही एक पीरेड मूवी होती.
या चित्रपटासाठी कमाल अमरोही यांनी अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्या काळातले सेट्स, कॉस्ट्यूम्स, त्या काळातलं संगीत याचा त्यांनी खूप बारकाईने अभ्यास केला. या चित्रपटाची गाणी जानीसार अख्तर यांनी लिहिली होती. तर संगीत खय्याम (Khayyam) यांचे होते. या चित्रपटातील एका गाण्याचा किस्सा खूप जबरदस्त आहे. बिग बी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये या प्रसंगाचे वर्णन केले आहे.
गंमत म्हणजे १९७३ साली सुरू झालेला चित्रपट तब्बल दहा वर्षांनी १९८३ साली प्रदर्शित झाला होता. १९७४ साली या चित्रपटातील एक गाणे रेकॉर्ड झाले होते. लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गाणे होते ‘ऐ दिले नादान ऐ दिले नादान आरजू क्या है जुस्तजू क्या है….’ या गाण्याला एक जबरदस्त असा ठहराव आहे. भारतीय चित्रपट संगीतात अशा प्रकारची खूप कमी गाणी आहेत. हे गाणं ऐकताना रसिक आजही अक्षरशः हरवून जातात!
या गाण्याच्या संदर्भातील एक दिलचस्प किस्सा मध्यंतरी वाचण्यात आला. स्वतः संगीतकार खय्याम (Khayyam) यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्या ‘रजिया सुलतान’ या चित्रपटाची सुरुवात १९७३ सालापासून झाली होती. संगीतकार म्हणून त्यांनी खय्याम यांची निवड केली हे अनेकांना आश्चर्य वाटले होते. पण खय्याम यांनी कमाल अमरोही यांच्या निवडीला पुरेपूर न्याय दिला. या चित्रपटातील ‘ऐ दिले नादान…’ हे गाणं १९७४ सालीच रेकॉर्ड झाले होते. या गाण्यात असलेला शांत रस, ठह राव आणि चक्क पाच दहा सेकंदाचे पॉज गाण्याचं सौंदर्य वाढवणारे आहेत.
या रेकॉर्डिंगनंतर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये या गाण्याबाबत चर्चा सुरू झाली. एक वेगळा प्रयोग खय्याम (Khayyam) यांनी या गाण्यांमध्ये केला होता. या गाण्याबाबतची चर्चा अमिताभ बच्चन यांच्या कानावर देखील आली. अमिताभ यांचे नाव देखील तेव्हा बॉलीवूडमध्ये मोठे व्हायला सुरुवात झाली होती. त्यांचा ‘जंजीर’ हा चित्रपट सुपरहिट झाला होता.जेव्हा अमिताभला या गाण्याबद्दल कळले तेव्हा त्यांना या गाण्याबाबतची उत्सुकता जागृत झाली. एका पार्टीत त्यांनी या गाण्याची खूपच तारीफ ऐकली तेंव्हा पार्टी झाल्यानंतर त्यांनी त्यांची पत्नी जया भादुरी हिला खय्याम यांच्या कडून त्या गाण्याची टेप आणायला सांगितली.
जया भादुरी आणि दिग्दर्शक सुलतान अहमद मध्यरात्री खय्याम यांच्या घरी पोहोचले. इतक्या रात्री कोण आला असेल म्हणून खय्याम (Khayyam) यांनीच दार उघडले तर समोर जया बच्चन आणि सुलतान अहमद होते! एवढ्या रात्री येण्याचे कारण विचारले असता त्यांनी सॉरी म्हणत, ”तुम्ही जे ऐ दिल ने नादान… हे जे गाणे केलेले आहे त्याची टेप अमिताभ बच्चन यांना ऐकायची आहे.” ती देण्याची विनंती केली. त्यावर खय्याम म्हणाले ,” हो गाणं तयार झाले आहे. पण ते गाणं सध्या माझ्याकडे नाही. ते गाणे कमाल अमरोही यांच्याकडे आहे!” दुसऱ्या दिवशी साहीर लुधियानवी आणि यश चोप्रा कमलीस्तान स्टुडिओमध्ये जाऊन कमाल अमरोही यांना भेटले. त्यांनी आनंदाने त्या गाण्याची टेप यश चोप्रा यांना दिली आणि तिथून ती अमिताभ बच्चन यांच्याकडे आली.
अमिताभला हे गाणे प्रचंड आवडले आणि त्याने आपल्या आगामी ‘कभी कभी’ या चित्रपटाला संगीतकार खय्याम यांचे संगीत असावे असा यश चोप्रा यांच्याकडे आग्रह धरला. असाच आग्रह साहीर लुधियानवी यांनी केला होता .कारण साहीरच्या ‘कभी कभी ‘ या कवितेला साठच्या दशकामध्ये खय्याम (Khayyam) यांनीच संगीत दिले होते. चेतन आनंद यांचा हा चित्रपट मात्र अपूर्णच राहिला. त्यामुळे या कवितेला पहिल्यांदा स्वरबद्ध करणारे खय्याम यांनीच ‘कभी कभी’ या चित्रपटाला संगीत द्यावे अशी साहीर यांची योग्य भूमिका होती.
==========
हे देखील वाचा : बप्पी लहिरी : हिंदी सिनेमा संगीताच्या दुनियेतील गोल्ड मॅन
==========
अमिताभ बच्चन आणि साहिर लुधियानवी या दोघांनाही खय्याम (Khayyam) यांच्या नावाची शिफारस केल्यामुळे यश चोप्रा यांच्या ‘कभी कभी’ या चित्रपटाला संगीत देण्यासाठी त्यांची निवड झाली! तिथूनच ते यश चोप्राचे आवडते संगीतकार बनले. त्या पुढील त्रिशूल, नुरी, नाखुदा या चित्रपटांना खय्याम यांचेच संगीत होते. कमाल अमरोही यांच्या ‘रजिया सुलतान’ या चित्रपटातील ‘ऐ दिले नादान…’ या गाण्याच्या मोहिनीने अमिताभ बच्चन यांनी यश चोप्रांकडे खय्याम यांचे नाव सुचवले आणि हा सर्व ‘सिलसिला’ सुरू झाला!