
Abhishek Bachchan अनेक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर चमकले अभिषेक बच्चनचे नशीब, आज आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक
बॉलीवूडमधील स्टार किड्स, नेपोटीझम हे विषय नेहमीच मीडियामध्ये, कलाकारांमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये चर्चेचे आणि वादाचे विषय ठरतात. यावर अनेक मतमतांतरं आहेत. मात्र कदाचित स्टार किड्स असल्यामुळे त्यांची सुरुवात सोपी होत असेल मात्र पुढचा प्रवास आणि त्यासाठी असणारा संघर्ष करावाच लागत असेल. याला कोणीच अपवाद नाही. सामान्य व्यक्ती असो किंवा स्टार कीड या क्षेत्रात टिकण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी प्रत्येकालाच संघर्ष करावाच लागतो. (Abhishek Bachchan)
बॉलिवूडचे महानायक असलेल्या अमिताभ बच्चन यांनी आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आपले मोठे प्रस्थ निर्माण केले. आज अमिताभ बच्चन यांच्याकडे एक ब्रँड म्हणून पाहिले जाते. अशा या ५/६ दशकांपासून बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडणाऱ्या अमिताभ बच्चन यांचे नाव पुढे लावलेल्या अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचे ठरवले तेव्हा त्याला कुठेही त्याच्या वडिलांच्या नावाचा उपयोग झाला नाही. त्याला चित्रपट मिळवण्यासाठी त्याची प्रतिभा सिद्ध करावी लागली. (Abhishek Bachchan Birthday)

अभिषेक बच्चन आज बॉलिवूडमधील एक मोठे नाव आहे. कमी सिनेमे करूनही त्याने त्याच्यात असणाऱ्या प्रतिभावान अभिनेत्याला प्रेक्षकांसमोर सादर केले. आज अभिषेक अभिनयासोबतच इतर अनेक क्षेत्रांमध्ये सक्रिय आहे. अभिषेकने आपल्या वडिलांइतके यश मिळवले नसले तरी त्याची गणना एक प्रतिभावान अभिनेता आणि यशस्वी अभिनेता म्हणून केली जाते. आज ५ फेब्रुवारी रोजी अभिषेक बच्चन त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया अभिषेक बच्चनच्या एकूण कारकिर्दीबद्दल. (Bollywoood Masala)
५ फेब्रुवारी १९७६ मध्ये मुंबईत त्याचा जन्म झाला. अभिषेक चांदी नाही तर सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आला होता. आई वडील दोघेही हिंदी चित्रपटांमधील मोठे नाव. अभिषेकला काहीच कमी नव्हती. त्याने शालेय शिक्षण दिल्लीच्या मॉडर्न स्कूलमधून आणि त्यानंतर मुंबईच्या जमनाबाई नरसी आणि बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून घेतले. पुढे तो उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला गेला. मात्र त्याने त्याचे उच्च शिक्षण पूर्ण केले नाही आणि शिक्षण अर्धवट सोडून पुन्हा भारतात परतला. (Ankahi Baatein)

अभिषेक बच्चन आज बॉलिवूडमधील एक यशस्वी आणि मोठा अभिनेता म्हणून ओळखला जातो. जरी त्याला त्याच्या वडिलांसारखे मोठे स्टारडम मिळवता आले नसले तरी तो आज एक यशस्वी अभिनेता आहे. मात्र अनेकांना जाणून आश्चर्य वाटेल की, लहान असताना अभिषेकला ‘डिसलेक्सिया’ हा आजार झाला होता. या आजारामध्ये शब्द लक्षात ठेवणे, शब्द ओळख नसणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय, लिहिणे, वाचणे आणि बोलण्यातसुध्दा अडथळा निर्माण होतो. याच आजारावर आधारित आमिर खानने ‘तारे जमीन पर’ सिनेमा तयार केला होता. (Entertainment mix masala)
एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चनने सांगितले होते की, जेव्हा अभिषेक स्वित्झर्लंडमध्ये होता, तेव्हाच अमिताभ बच्चन यांना त्यांच्या व्यवसायात कोट्यवधी रुपयांचा मोठा तोटा झाला. त्यांची कंपनी बंद पडली आणि अमिताभ बच्चन यांची आर्थिक परिस्थिती खालावली. तेव्हा अभिषेकला वाटले की आपण या वाईट काळात आपल्या वडिलांसोबत राहून त्यांची शक्य ठेवढी मदत केली पाहिजे. म्हणून तो त्याचे शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतला. (Bollywood Masala)
अभिषेक बच्चनने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अनेक लहान सहान कामं केले. अभिषेकला चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी एलआयसी एजंट बनायचे होते. मात्र ते त्याला शक्य झाले नाही. त्याने अनेक चित्रपटांच्या सेटवर प्रॉडक्शन बॉय म्हणूनही काम केल्याचे त्यानेच एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. शिवाय अभिषेकने चित्रपटाच्या सेटवर चहा बनवण्याचे देखील काम केले आहे. पुढे तो निर्मिती सहाय्यक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सिनेमाच्या सेटवर काम करायचा. याच दरम्यान त्याला चित्रपटाबद्दल ओढा निर्माण झाला आणि त्याने अभिनेता होण्याचे ठरवले. (Abhishek Bachchan Journey)

अभिषेक एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता की, “अमिताभ बच्चन यांच्या नावाचा मला कामं मिळण्यास अजिबात फायदा झाला नाही. मला माझा पहिला सिनेमा मिळवण्यासाठी अनेक नकार पचवावे लागले. दोन वर्ष मी कामं मिळवण्यासाठी झगडत होतो तेव्हा मला माझा पहिला सिनेमा मिळाला.” जे.पी.दत्ता दिग्दर्शित ‘रेफ्युजी’ या चित्रपटाद्वारे अभिषेकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याचा हा सिनेमा ३० जून २००० रोजी प्रदर्शित झाला होता. त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूरने देखील चित्रपटांमध्ये पदार्पण केले. मात्र अभिषेकचा हा सिनेमा सुपर फ्लॉप ठरला. असे असूनही हा सिनेमा त्यावर्षीचा ५वा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला.
अभिषेकचा ‘रेफ्युजी’ सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर त्याने कुछ ना कहो, धाई अक्षर प्रेम के, मुंबई से आया मेरा दोस्त, ओम जय जगदीश, रन, जमीन, मैं प्रेम की दिवानी हू, एलओसी कारगिल आदी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या मात्र त्याचे सर्वच सिनेमे फ्लॉप ठरले. या दरम्यान २००४ साली त्याने मणी रत्नम यांच्या ‘युवा’ या सिनेमात काम केले आणि त्याचे समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी खूपच कौतुक केले. या सिनेमासाठी त्याला पुरस्कार देखील मिळाले.
पुढे त्याने धूम सिनेमात भूमिका केली जी कमालीची गाजली. त्यानंतर त्याचा २००५ साली आलेला ‘बंटी और बबली’ हा पहिला सोलो हिट सिनेमा ठरला. या सिनेमाने कमालीची लोकप्रियता मिळवली आणि अभिषेक बच्चन देखील यामुळे चांगलाच नाही. पुढे त्याने सरकार, कभी अलविदा ना केहना’, दस, धूम २. सरकार राज, दोस्ताना आदी या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. यादरम्यान त्याला विविध चित्रपटांसाठी अनेक नॉमिनेशन आणि पुरस्कार देखील मिळाले.

२००९ साली आलेल्या आर बल्की यांच्या ‘पा‘ सिनेमात अभिषकने अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी प्रोजेरिया या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलाची भूमिका साकारली होती. हा सिनेमा कमालीचा हिट झाला आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. अभिषेकने त्यांच्या करियरमध्ये अनेक चढ उतार पाहिले आणि हिट, फ्लॉप सिनेमे देखील दिले. अभिषेक त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील कमालीचा गाजला.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या दिवशी अभिषेक-करिश्मा कपूर यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. त्यावेळी सर्वांना अभिषेक-करिश्माच्या प्रेमाविषयी समजले. दोघांचा साखरपुडा देखील झाला. मात्र मधेच माशी शिंकली आणि अभिषेक करिश्मा यांचे नाते संपुष्टात आले. मीडियामधील काही वृत्तांनुसार हे नाते तुटण्यासाठी करिश्माच्या आईला बबिताला कारणीभूत मानले जाते. त्यांना आधीपासूनच अभिषेक आवडत नव्हता. तो यशासाठी संघर्ष करत होता तर करिश्मा एक सुपरस्टार अभिनेत्री होती. यामुळेच त्यांच्यात काही वाद झाले आणि त्यांचे नाते तुटले असे सांगितले जाते.

पुढे २००७ साली जानेवारीमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी साखरपुडा केल्याचे जाहीर केले. त्यानंतर २० एप्रिल २००७ साली त्यांनी मुंबईमध्ये एका खासगी सोहळ्यात लग्न केले. त्यांना २०११ साली एक मुलगी आराध्य देखील झाली. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा २००० साली ‘ढाई अक्षर प्रेम’ हा सिनेमा आला. तेव्हा त्यांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर त्यांनी २००३ मध्ये ‘कुछ ना कहो’ चित्रपटात एकत्र काम केले. २००६ मध्ये ‘धूम 2’ आणि ‘उमराव जान’मध्येही दोघे एकत्र दिसले होते. तेव्हा अभिषेकला ऐश्वर्याबद्दल भावना जाणवल्या आणि त्याने २००७ साली न्यूयॉर्कमधील एका हॉटेलच्या बाल्कनीत ऐश्वर्याला प्रपोज केले. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिषेकने नकली हिऱ्याची अंगठी घालून ऐश्वर्याला प्रपोज केले असल्याचे सांगितले जाते.
======
हे देखील वाचा : Chhaava छावामधला ‘तो’ सीन शूट करताना घडला मोठा योगायोग; दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी सांगितला किस्सा
======
अभिषेकला सुरुवातीपासूनच अभिनयासोबतच खेळाचीदेखील आवड होती. ही आवड लोकांना देखील अनेकदा विविध खेळांच्या सामन्यांच्या वेळेस दिसून आली आहे. हीच आवड जपण्यासाठी अभिषेकने ‘जयपूर पिंक पँथर्स कबड्डी संघ’ नावाने एक कबड्डी संघ खरेदी केला आहे. सोबतच तो चेन्नई फुटबॉल क्लबचा मालक देखील आहे. अभिषेकचे ‘सरस्वती एंटरटेनमेंट’ नावाचे प्रोडक्शन हाऊस असून या अंतर्गत त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली.