
Chhaava : बॉक्स ऑफिसवर Animal चित्रपटालाही ‘छावा’ने टाकलं मागे
ऐतिहासिक चित्रपट करणं फार जोखमीचं आणि जबाबदारीचं काम आहे. त्यातही तो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, शौर्य जर का मोठ्या पडद्यावर मांडायचा असेल तर अभिमानाने उर भरुन येतो आणि त्यांची गौरवगाथा येणाऱ्या पिढीपुढे चित्रपटाच्या स्वरुपात मांडली जाते. छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर यावा असा अट्टहास मनाशी बाळगून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ‘छावा’ या चित्रपटाचं शिवधनुष्य हाती घेतलं आणि लिलया पेललं. शिवाय, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल अक्षरश: जगला आहे. आणि आता त्याचचं फळ हे बॉक्स ऑफिसवर बहरलेलं दिसत आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ‘बाहुबली २’, ‘अॅनिमल’ या चित्रपटांचेही बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड मोडले आहेत. (Chhaava)
‘छावा’ (Chhaava) चित्रपट देशभरात आपला डंका वाजवत आहे. मराठीच काय अमराठी प्रेक्षकांशी आवर्जून हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करतायत. सॅकनिल्कच्या माहितीनुसार १२ दिवसांत ‘छावा’ चित्रपटाने ३६३.३५ कोटींची कमाई करत यशस्वीरीत्या दुसऱ्या आवड्यातही छप्पर फाड कमाई केली आहे. १२ व्या दिवसाच्या कमाईची यापुर्वी आलेल्या चित्रपटांच्या कमाईसोबत तुलना केल्यास कल्की २८९८ एडी आणि अॅनिमल या दोन्ही चित्रपटांना ‘छावा’ने मागे टाकलं आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘कल्की’ चित्रपटाने १२व्या दिवशी १०.०४ कोटी, ‘अॅनिमल’ने १२.७२, तर ‘बाहुबली २’ ने १५.७५ कोटी कमावले होते. आणि ‘छावा’ने १२व्या दिवशी १८ कोटींची कमाई केलीये. दरम्यान, जगभरातील कमाईची आकडेवारी छावा चित्रपटाने ५०० कोटींच्या पुढे पार कधीच केली आहे. (Vicky Kaushal)

‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी कलाकृती मीडियाने दिलेल्या विशेष मुलाखत दिली. यावेळी छत्रपती शिवरायांचे अस्तित्व वेगळ्या पद्धतीने मांडण्याच्या प्रयोगाबद्दल बोलताना लक्ष्मण उतेकर म्हणाले की, “बरं, छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की त्यांचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पुर्ण होऊच शकत नाही. मग, छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्तित्व वेगळ्या पद्धतीने कसं मांडता येईल याचा विचार करत केवळ त्यांचा आवाज शंभु महाराजांना क्षणोक्षणी ऐकू येतो ही एक निराळी पद्धती छावाच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच दाखवण्याचा प्रयत्न केला”.
===========
हे देखील वाचा : Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय
===========
पुढे ते म्हणाले की, “शिवाय, संभाजी महाराज २ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाल्यामुळे आपली आई कशी दिसत असेल हे देखील त्यांना ठाऊक नव्हते. त्यामुळे ते कायम आपल्या आईच्या शोधात कसे असतील हे दाखवण्यासाठी आम्ही बालपणी ते रडत आपल्या आईचा शोध घेत असतात पण त्यांना जरी आईसाहेब भेटल्या नसल्या तरी आबासाहेब म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कायम त्यांच्यासोबत आहेत हा विचार वेगळ्या पद्धतीने दाखवला”. (Chhaava box office collection)