
Sholay : स्पर्धेत टिकले कोण? गळपटले कोण?
एखादं पिक्चर एकदम भारी सुपरहिट ठरते तेव्हा त्याच्या तडाख्यातून वाचणे अनेक चित्रपटांना अवघड जाते. चित्रपट रसिक त्याच हाऊसफुल्ल गर्दीतील पिक्चरकडे धावतात. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले'(१९७५)च्या जणू चक्रीवादळासारख्या यशात कोणते चित्रपट तगले आणि कोणते गळपटले यावर फोकस हवाच. ‘शोले’ची देश विदेशात पन्नास वर्ष साजरी होत असताना तर ही गोष्ट जास्त महत्वाची. १९७५ हे मराठी व हिंदी चित्रपटासाठीचे अतिशय महत्वाचे वर्ष. इतके की, हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीवर ‘फोकस’ टाकताना ‘शोले’पूर्वीचा व नंतरचा चित्रपट अशी विभागणी होते. अभ्यास केला जातो. तपशील दिले जातात. तात्पर्य, ‘शोले’ हा ट्रेण्ड सेटर चित्रपट. सामाजिक सांस्कृतिक माध्यम क्षेत्रावर विलक्षण प्रभाव टाकलेला चित्रपट आहे.

‘शोले’ मुंबईत १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाला हे वेगळे सांगायलाच नको. ते नाते घट्ट आहे. (तर दिल्ली, उत्तर प्रदेश, बंगाल व हैदराबाद येथे २२ ऑगस्ट १९७५ रोजी आणि मग त्यानंतर अन्य शहरात,राज्यात टप्प्याटप्प्याने म्हणजेच तेव्हाच्या पध्दतीनुसार प्रदर्शित झाला). मुंबईत शोलेच्या स्पर्धेत म्हणजेच त्याच शुक्रवारी आर.के.मिथा दिग्दर्शित ‘गरीबी हटाव’ हा अगदीच नगण्य चित्रपट प्रदर्शित झाला. मला आठवतयं ग्रॅन्ड रोडच्या शालिमार चित्रपटगृहात मॅटीनी शोला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची तशी कोठेच नोंद नाही. १९७३ साली सेन्सॉर संमत झालेला हा चित्रपट प्रदर्शित झाला एवढेच विशेष. या चित्रपटात राजवंश नावाचा कोणी नवा चेहरा होता इतकेच. अशा फ्लॉप चित्रपटांची कोणीच दखल घेत नाहीत. बरं घ्यायची तरी का?

‘शोले’ प्रदर्शित होईपर्यंत १९७५ साली गल्ला पेटीवर (अर्थात बॉक्स ऑफिसवर) अतिशय उत्तम जम बसवलेले चित्रपट असे, गुलशन रॉय निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’ (मुंबईत प्रदर्शित २४ जानेवारी) याचा मिनर्व्हात रौप्य महोत्सवी आठवडा झाल्यावर तो मेट्रो चित्रपटगृहात शिफ्ट करण्यात आला. ‘दीवार’ चा दबदबा आजही कायम आहेच म्हणा. ‘दीवार’नंतर प्रदर्शित झालेल्या महत्वाच्या चित्रपटात गुलजार दिग्दर्शित ‘आंधी’ व रामदास फुटाणे निर्मित जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना’ (दोन्ही १४ फेब्रुवारी), शक्ती सामंता दिग्दर्शित ‘अमानुष’ व रवि चोप्रा दिग्दर्शित ‘जमीर (दोन्ही २१ मार्च), ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘चुपके चुपके’ (११ एप्रिल), के. एस. सेतूभमाधवन ‘ज्युली’ ( १८ एप्रिल), ब्रीज दिग्दर्शित ‘चोरी मेरा काम’ (२ मे).
================================
हे देखील वाचा: Waves Summit 2025: “प्रियांकाप्रमाणे हॉलिवूडमध्ये काम का करत नाही?”; करिना म्हणते….
=================================
फिरोज खान दिग्दर्शित ‘धर्मात्मा’ व दादा कोंडके दिग्दर्शित ‘पांडू हवालदार’ ( दोन्ही ९ मे), रवि टंडन दिग्दर्शित ‘खेल खेल मे’ (१६ मे), मनोहर नाथ दिग्दर्शित ‘जान हाजिर है’ (२३ मे), सतराम रोहरा दिग्दर्शित ‘जय संतोषी मा’ (३० मे), नरेशकुमार दिग्दर्शित ‘दो जासूस’ (६ जून), गुलजार दिग्दर्शित ‘खुशबू’ (२० जून), ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘मिली’ (२० जून) , प्रयाग राज दिग्दर्शित ‘पोंगा पंडित’ व राजा ठाकूर दिग्दर्शित ‘जखमी’ (दोन्ही १ ऑगस्ट), यांनी चांगलीच वाटचाल सुरु ठेवली. तर याच वेळेस ए. सुब्बा राव दिग्दर्शित ‘सुनहरा संसार’ (२१ फेब्रुवारी), दिनेश रमणेश दिग्दर्शित रफ्तार’ (१४ फेब्रुवारी), राज खोसला दिग्दर्शित ‘प्रेम कहानी’ (७ मार्च), रवि टंडन दिग्दर्शित ‘अपने रंग हजार’ (२५ एप्रिल), होमी वाडिया दिग्दर्शित ‘तुफान और बिजली’ (१६ मे), एस. एस. बालन दिग्दर्शित ‘एक गाव की कहानी (१३ जून), रामसे बंधु दिग्दर्शित ‘अंधेरा’ (१ ऑगस्ट), ए. सलाम दिग्दर्शित ‘आखरी डाव’ (८ ऑगस्ट) अशा अनेक चित्रपटांना रसिकांनी नाकारले. सगळेच चित्रपट यशस्वी कसे हो ठरतील?

‘शोले’ प्रदर्शित होत असताना वातावरण सर्वसाधारण असेच होते. देशात २५ जून रोजी आणीबाणी लागू झाली होती. ‘सामना’,’आंधी’ या चित्रपटांचे प्रदर्शन रोखले होते. ‘शोले’ प्रदर्शित होत असताना रुपेरी पडद्यावर एक भारी वादळ येतेय असे वरकरणी वाटत तर नव्हते. अर्थात वादळ सांगून येत नाही. चित्रपटाच्या बाबतीत तर नवीन चित्रपटाचा शुक्रवारचा फर्स्ट शोचा पब्लिक रिपोर्ट त्या चित्रपटाचे व्यावसायिक यशापयश स्पष्ट करते ( ही दीर्घकालीन हुकमी परंपरा. कार्पोरेट युगात प्रत्येक दिवशी किती कोटी कमावले यावर यशापयश कसे बरे ठरते? केवळ आकडेवारीनुसार? ते आकडे खरेच असतात का? पडद्यावर सिनेमा सुरु असताना समोर मोजकेच प्रेक्षक तर असतात. तरी सुपरहिट म्हणे.
पडद्यावर पिक्चर सुरु असतानाच पब्लिकमधून मनसोक्त मनमुराद टाळ्या शिट्ट्या म्हणजे पिक्चर एकदम भन्नाट सुपरहिट ) शोले प्रदर्शित होतेय तोच पडला पडला अशीच हवा होती. पण पब्लिकच्या मनात काही वेगळेच होते. त्यांना शोले असा व इतका आवडला, आणि मग असा व इतका डोक्यात व डोक्यावर घेतला की आजही त्याची भन्नाट क्रेझ कायम आहे. त्यावर अजून चर्चा होतेय. शोले’ प्रदर्शित झाल्यावर पुढच्याच शुक्रवारी रवि नगाईच दिग्दर्शित रानी और लालपरी प्रदर्शित झाला.हा फॅण्टसी चित्रपट रसिकांना अजिबात आवडला नाही. त्यानंतर श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘निशांत’ (५ सप्टेंबर), फिरोज खान दिग्दर्शित ‘काला सोना’ (१९ सप्टेंबर), हिरेन नाग दिग्दर्शित ‘गीत गाता चल’ (१६ ऑक्टोबर), दुलाल गुहा दिग्दर्शित ‘प्रतिज्ञा’ (३१ ऑक्टोबर) , सोहनलाल कंवर दिग्दर्शित ‘संन्यासी’ (५ डिसेंबर), रणधीर कपूर दिग्दर्शित ‘धरम करम'(१२ डिसेंबर), या चित्रपटांचा ‘शोले’च्या चक्रीवादळात बर्यापैकी निभाव लागला. टिकून राहिले. तर सी. व्ही. राजेंद्रन दिग्दर्शित ‘दुल्हन’ (१६ ऑक्टोबर), कुमार दिग्दर्शित ‘मजाक’ (५ डिसेंबर) हे चित्रपट गळपटले.

आणखीन काही चित्रपटांचा शोलेमय वातावरणात निभाव लागला नाही. राजश्री प्रॉडक्शन्सच्या वितरण विभागाने गीत गाता चल मुंबईत एकमेव चित्रपटगृह मेट्रोत प्रदर्शित केला. आणि तेथे सुपरहिट ठरल्यावर दहा आठवड्यानंतर त्याची चित्रपटगृहे वाढवली.. ..तर प्रत्येक सोमवारी मिनर्व्हा चित्रपटगृहावर आगाऊ तिकीट विक्रीसाठी हमखास लांबलचक रांग आणि कधीही पहावे तर आठवडाभरातील सगळेच्या सगळे चित्रपट हाऊसफुल्ल. या स्पर्धेत जे टिकले ते महत्वाचे.’शोले’च्या स्पर्धेत टिच्चून वाटचाल केली ती जय संतोषी मा या सामाजिक पौराणिक चित्रपटाने. शोले प्रदर्शित होईपर्यंत त्याचा चांगलाच जम बसला होता आणि शोले”च्या चक्रीवादळातही तो असा काही टिकून राहिला की आज पन्नास वर्षांनंतरही शोलेच्या यशाची तुलना जय संतोषी मा या चित्रपटाशी होते. एकिकडे प्रचंड हिंसक सूडकथा तर दुसरीकडे भाबडे कथानक. शोलेचे तरुणाईला विलक्षण आकर्षण होते तर संतोषी माता महिला वर्गात अफाट लोकप्रिय ठरली. या दोन्ही चित्रपटांबाबत मोठ्याच प्रमाणावर कथा, दंतकथा, गोष्टी, अफवा केवढ्या तरी पसरल्या आणि आज पन्नास वर्षांनंतरही डिजिटल मिडियात रंगवून खुलवून मसालेदार मनोरंजक पध्दतीने सांगितल्या जातात.
================================
हे देखील वाचा: Kapoor Family : कपूर कुटुंबाच्या निळ्या डोळ्यांचं रहस्य काय आहे?
=================================
‘शोले’च्या स्पर्धेतील वेगळा व महत्वाचा चित्रपट श्याम बेनेगल दिग्दर्शित निशांत. सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटात समांतर अथवा नवप्रवाहातील चित्रपट चळवळ रुजण्यातील हा एक अतिशय महत्वाचा बुध्दीवादी चित्रपट. या चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग वेगळा होता. शोलेच्या स्पर्धेत हा चित्रपट अतिशय सावकाश पण निश्चित आपल्या संथगतीने वाटचाल करत करत मार्गक्रमण करत होता. ते मसालेदार मनोरंजक चित्रपटांचे हुकमी दिवस होते. प्रयोगशीलता अभावानेच होत होती. म्हणूनच निशांत महत्वाचा. तात्पर्य, ‘शोले’च्या यशाच्या चक्रीवादळात ‘जय संतोषी मा’ व ‘निशांत’ हे दोन भिन्न स्वरुपातील चित्रपट विशेष उल्लेखनीय.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi