
Chala Hava Yeu Dya Season 2: ‘चला हवा येऊ द्या’ च्या दुसऱ्या सिझनचं धमाकेदार टायटल सॉंग प्रदर्शित !
झी मराठीवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि घराघरात पोहोचलेला हास्यविनोदी कार्यक्रम चला हवा येऊ द्या आता नव्या रूपात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ‘कॉमेडीचा गँगवॉर’ या उपशीर्षकांसह या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनची घोषणा करण्यात आली असून, या नव्या पर्वाचं टायटल सॉंग नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सणासुदीच्या काळात हास्याची मेजवानी देण्यासाठी हा सिझन प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. या नव्या शीर्षकगीतात शोमधील कलाकार एकमेकांविरोधात हास्याच्या युद्धासाठी सज्ज झाल्याचे मजेशीर आणि रंगतदार रूपात पाहायला मिळतंय. हे गाणं संगीतकार आणि गायक ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा आणि गायिका पावनी वासा यांच्या आवाजात आहे. त्यांनीच या गीताचं लेखन आणि संगीत संयोजन केलं असून त्यातून ‘गँगवॉर’चा मजेदार थाट उमटतो.(Chala Hava Yeu Dya Season 2)

या पर्वात अनेक बदल झाले असून सर्वात मोठा बदल म्हणजे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत. डॉ. निलेश साबळे यांच्याऐवजी अभिनेता अभिजीत खांडकेकर या सिझनमध्ये सूत्रसंचालन करणार आहे. त्यांच्या प्रवेशामुळे कार्यक्रमात एक नवा ताजेपणा आणि उत्सुकता आली आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांची लाडकी मंडळी म्हणजेच कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे हे कलाकारही नव्या रूपात आणि नव्या जोशात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे या सिझनमध्ये सामान्य प्रेक्षकांना देखील मंचावर येण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी विशेष ऑडिशन्स घेतल्या गेल्या असून नवोदित हास्यकलाकारांचा सहभाग कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हास्याची ही लढत यंदा अधिक रंगतदार होणार यात शंका नाही.

हा नवा सिझन २६ जुलैपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे. ट्रेलर आणि टायटल सॉंग पाहिल्यानंतर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सोशल मीडियावर गाण्याबाबत भरभरून कौतुक होत आहे. गौरव मोरे आणि कुशल बद्रिके यांच्या संवादांवर प्रेक्षकांनी खास प्रेम व्यक्त केलं आहे. मात्र काही प्रेक्षकांनी भाऊ कदम, सागर कारंडे आणि डॉ. निलेश साबळे यांच्या अनुपस्थितीबाबत हळहळ व्यक्त केली आहे.(Chala Hava Yeu Dya Season 2)
===============================
===============================
‘चला हवा येऊ द्या- कॉमेडीचा गँगवॉर’ हा सिझन एक नवीन स्पर्धात्मक फॉर्मॅट घेऊन येत असून जुन्या आठवणी आणि नव्या गमतीच्या मिश्रणातून प्रेक्षकांना ताज्या हास्याचा अनुभव देणार आहे. नव्या सिझनमध्ये नेहमीपेक्षा अधिक जोश, नव्या कल्पना आणि नव्या चेहऱ्यांनी भारलेली हास्ययात्रा आता पुन्हा सुरू होणार आहे. तर २६ जुलैपासून शनिवार आणि रविवारची संध्याकाळ ठरवून ठेवा कारण हास्याचा गँगवॉर तुमच्या टीव्हीवर येणार आहे.