
बापरे ! KBC 17 साठी Amitabh Bachchan घेणार तब्बल ‘एवढे’ कोटी; आकडा ऐकुन तुम्हाला ही बसेल धक्का…
सिनेइंडस्ट्रीचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर ‘कौन बनेगा करोडपती’च्या १७ व्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. गेली अनेक वर्षं या शोशी जोडले गेलेले अमिताभ पुन्हा एकदा त्यांच्या खास शैलीत प्रेक्षकांसमोर प्रश्न विचारताना दिसणार आहेत. सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की यंदा ‘केबीसी’च्या १७ व्या पर्वाचं सूत्रसंचालन अमिताभ बच्चन करणार नाहीत, ज्यामुळे अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता खुद्द बिग बीच पुन्हा एकदा या शोचे सूत्रधार असणार, हे निश्चित झाल्यानं चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.या नव्या पर्वासाठी अमिताभ बच्चन यांनी किती मानधन घेतलंय, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. माध्यमांतून आलेल्या माहितीनुसार, ते ‘केबीसी १७’ च्या प्रत्येक भागासाठी तब्बल पाच कोटी रुपये घेत असल्याचं बोललं जातंय. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यंदा ‘केबीसी १७’ हे लोकप्रिय पण टीआरपी कमी असलेलं ‘सीआयडी २’ या शोच्या जागी दाखवलं जाणार आहे. त्यामुळे ‘सीआयडी २’ बंद होण्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. शिवाजी साटम, दयानंद शेट्टी आणि आदित्य श्रीवास्तव या लोकप्रिय कलाकारांच्या टीमला प्रेक्षक मिस करणार, हे नक्की.(Amitabh Bachchan)

‘केबीसी १७’ मध्ये अभिनेत्री सुंबुल तौकीर खान देखील झळकणार असून, तिच्यासोबतचा एक छोटासा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या प्रोमोमध्ये अमिताभ आणि सुंबुल यांची जुगलबंदी पाहायला मिळाली आणि ती झलक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. शोच्या नव्या पर्वाबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘कौन बनेगा करोडपती’चा पहिला भाग तब्बल २५ वर्षांपूर्वी, ३ जुलै २००० रोजी प्रेक्षकांसमोर आला होता. हा क्विझ शो केवळ माहितीवर आधारित नसून, अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली ताकद, त्यांच्या खास ‘नमस्ते’ करण्याची पद्धत, आणि प्रेक्षकांशी जोडलेलं त्यांचं भावनिक नातं यामुळे तो घराघरात पोहोचला. केवळ तिसऱ्या पर्वात शाहरुख खान यांनी सूत्रसंचालन केलं होतं, त्याव्यतिरिक्त प्रत्येक सीझनमध्ये अमिताभ बच्चन यांनीच होस्ट केलं आहे.(Amitabh Bachchan)
===============================
===============================
अमिताभ बच्चन यांचे आगामी प्रोजेक्ट्सही तितकेच लक्षवेधी आहेत. ‘सेक्शन 84’ या चित्रपटात ते प्रमुख भूमिकेत झळकणार असून, त्यांच्या सोबत निमरत कौर, डायना पेंटी आणि अभिषेक बनर्जी यांच्याही भूमिका असणार आहेत. याशिवाय, ‘ब्रह्मास्त्र 2’ आणि ‘कल्कि 2898 ए.डी.’ च्या पुढील भागांची तयारीही सुरू असून, बच्चन यांचा बहुप्रतीक्षित अंदाज पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. संपूर्ण देशाला ज्ञानाची प्रेरणा देणारा आणि लाखो लोकांच्या स्वप्नांना हात घालणारा ‘केबीसी’ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे, आणि याचे यजमान पुन्हा एकदा बिग बीच असतील, हे ऐकून प्रेक्षकांचं समाधान द्विगुणित झालंय.