Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

अगदी खरं खरं सांगा, Saiyaara पाहून रडलात की नाही?
तुम्ही देखील मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैय्यारा’ पाहून रडणार्या युवक युवतींची, प्रेमी युगुलांची रिळ अथवा व्हिडिओ पाहून मनातल्या मनात म्हणत असाल, असं रडण्यासारखे या मुव्हीजमध्ये आहे तरी काय? (आजची डिजिटल पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणते) तेही आजच्या गतिमान, व्यवहारी व आत्मकेंद्रित युगात रडते? तेवढ्या ताकदीचा हा मुव्हीज आहे?

याला कोणी सायलेन्ट मार्केटिंग असेही म्हणतात. म्हणजेच फर्स्ट शोपासूनच आपणच काही चित्रपट रसिक मल्टीप्लेक्समध्ये पाठवायचे आणि त्यांना चित्रपट पाहत असतानाच वा संपल्यावर खरं (कमी) खोटे (जास्त) रडायला सांगायचे, त्याची रिळ वा व्हिडिओ काढायचे, ते सोशल मिडियात व्हायरल करायचे, त्याच्या बातम्या प्रसिद्ध करुन आणायच्या. पहिले तीन चार दिवस हाच खेळ पुन्हा पुन्हा करुन वातावरण निर्मित करायची आणि त्याचा मुव्हीजला फायदा करुन घ्यायचा. तो तसा झाली देखिल. मुव्हीजमधील एखाद्या जबरदस्त डायलॉगला टाळ्या आणि शिट्यानी जो फायदा होणार असतो त्यापेक्षा चित्रपट रसिकांचे डोळे पाणावल्यावर जास्त होतो. फक्त ते अश्रू खरे वाटले पाहिजेत.

पडद्यावरील घटनांशी एकरुप होत प्रेक्षकांनी भावूक होणे, त्यांच्या डोळ्यात पाणी येणे हे नवीन नाही. पण पूर्वी ती भावना व त्यातून आलेले अश्रू, डोळावलेले पाणी खरे असे. एक पिढी अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित ‘दाग’ मधील दिलीप कुमारच्या बेहतरीन अशा दु:खी प्रसंगाना पडद्यावर पाहत असताना रडली. दिलीप कुमार ट्रॅजेडी किंग म्हणूनच तर ओळखला गेला. त्याने आपल्याला भावनिकदृष्ट्या सद्गदित करावे यासाठी त्याचे चाहते त्याचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहत. बिमल रॉय दिग्दर्शित ‘देवदास’ या चित्रपटाचा याबाबत खास उल्लेख करावा लागेल. यातील प्रेमभंग झालेल्या देवदास (पडद्यावर दिलीप कुमार) च्या दु:खात त्या काळातील चित्रपट रसिक एकरुप होत. तो आपले दु:ख दारुच्या एकच प्यालामध्ये विसरु इच्छितो. पण त्याचे चाहते मात्र त्याच्यावरचे दु:ख आपले मानत आणि डोळ्याला रुमाल लावत. आता ही मानसिकता नेमकी कसली असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पडद्यावरच्या गोष्टीशी इतके एकरुप व्हायचे की आपल्याला अश्रू अनावर व्हावेत?
================================
हे देखील वाचा: Sholay : स्पर्धेत टिकले कोण? गळपटले कोण
=================================

ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’च्या वेळेसही असेच! आपले आयुष्य आता काही दिवसांपुरतेच आहे अशा वेळेस आपले उर्वरित आयुष्य अतिशय दिलखुलासपणे, हसत खेळत जगू, त्यात इतरांनाही सहभागी करुन घेऊयात हे या चित्रपटाचे मध्यवर्ती कथासूत्र. राजेश खन्नाच्या विलक्षण क्रेझचे ते दिवस होते. त्याच्या केस रचनेपासून त्याच्या गुरु शर्टला मोठ्याच प्रमाणावर फॉलो केले जात असे. त्याने ‘आनंद’ असा साकारला की चित्रपट रसिक प्रचंड भावूक झाले. “बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नही….” हा संवाद चित्रपटाचा प्राण ठरला. संपूर्ण पडदाभर राजेश खन्नाचे जीवनविषयक तत्वज्ञान चित्रपटाची ताकद ठरली. आणि चित्रपटाचा क्लायमॅक्स तर डोळ्यातून हमखास अश्रू काढणारा ठरला. ‘आनंद’ कितीही वेळा आपण पाहावा तीच संवेदनशीलता, तेच भावूक होणे. ही त्या चित्रपटाची ताकद आहे. हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू येणे काहीसे स्वाभाविक.

विजय कोंडके निर्मित व दिग्दर्शित ‘माहेरची साडी’ पाहून खास करुन ग्रामीण भागातील महिला प्रेक्षकांना अश्रू अनावर होत. मुंबई, पुण्यातील काही चित्रपट समीक्षकांनी “ही रडकथा म्हणजे हा चित्रपट बटबटीत आहे” असे म्हटले. त्यांना हा चित्रपट अतिशय सामान्य दर्जाचा वाटला. पण सासूने केलेला सूनेचा छळ चित्रपट प्रेक्षकांना हेलावून टाकणारा ठरला. राज्यभरात हा चित्रपट लोकप्रिय ठरला. इतका की काही शहरात त्याचे काही दिवस राऊंड शो लावावे लागले आणि तेदेखील हाऊसफुल्ल ठरत. खेड्यापाड्यातील प्रेक्षक जमेल त्या अथवा मिळेल त्या वाहनानी तालुक्यातील थिएटरवर गर्दीने येत. अनेक गावांत एस. टी. अगोदर थिएटरवर जाई आणि मग डेपोत जाई. तिकीट काढून प्रेक्षक डोळ्यात अश्रू आणण्यास तयार आहेत हीदेखील एक चित्रपट रसिक संस्कृती. जे घडलयं वा आताही ‘सैय्यारा’ या चित्रपटाबाबत घडतेय तो ‘रिॲलिटी शो’ आहे. कदाचित ‘सैय्यारा’ ची रडकथा ही व्यावसायिक रणनीती असेल. पण ती पहिल्या तीन दिवस प्लॅन करता येईल. नंतर मात्र युवा पिढीतील चित्रपट रसिक खरोखरच रडताहेत.
================================
हे देखील वाचा : Shole : ‘शोले’ १९५३ सालीही पडद्यावर आला होता…
=================================
चित्रपट व प्रेक्षक यांच्या नात्यात रडगाणे हादेखील एक पैलू आहे. आता कोणी त्याला हसण्यावारी नेते तर कोणी म्हणते, तिकीटासोबत एक नॅपकिन द्यायला हवा… प्रेक्षक मात्र आपल्या रुमालाने डोळे पुसत आहेत. पूर्वी त्याच्या बातम्या होत आता त्याचे रिळ होते. आणि ते व्हायरलही होते. त्यामुळे मुव्हीजची गर्दी वाढतेय. तीच तर महत्वाची….आणि एकदा का चित्रपट पाहून रडण्याचे दिवस आले की एकाचे रडणे पाहून दुसराही आपोआप रडू लागतो…