Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
सत्तरच्या दशकामध्ये सलीम जावेद हे नाव एका सुपरस्टार पेक्षाही मोठं होतं. कारण हे नाव म्हणजे त्या काळात मिडास टच असं झालं होतं. सलीम जावेद यांनी लिहिलेला चित्रपट म्हणजे शंभर टक्के यशाची खात्री असं जणू समीकरण च झालं होतं. अमिताभ बच्चन यांची कारकीर्द घडवण्यामध्ये या जोडीचा फार मोठा वाटा आहे. परंतु सत्तरच्या दशकाच्या अखेरीस या जोडीमध्ये काही मतभेद सुरु झाले आणि त्यांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला. यानंतर जावेद अख्तर यांची गीतकार म्हणून सेकंड इनिंग सुरू झाली. ही सुरू होण्यामागे नेमकं काय कारण होतं? जावेद अख्तर खरंतर गीतकार बनणार नव्हतेच. परंतु निर्माता दिग्दर्शक यश चोप्रा यांनी त्यांना बळजबरीने गीतकार बनवले आणि गीतकार म्हणून जावेद अख्तर यांनी जबरदस्त असे धवल यश मिळवले. कोणता होता तो पहिला चित्रपट आणि जावेद अख्तर गीतकार बनायला कां तयार नव्हते? मोठा धमाल किस्सा आहे. (Bollywood Retro News)

निर्माता दिग्दर्शक यश चोप्रा यांनी सत्तरच्या दशकाच्या अखेरीस एका रोमॅण्टिक लव्ह ट्रँगल सिनेमाची सुरुवात केली होती. हा चित्रपट होता ‘सिलसिला’. यात अमिताभ बच्चन, रेखा आणि जया भादुरी ही स्टार कास्ट होती. त्या काळात रील आणि रियल लाईफमध्ये अमिताभ आणि रेखा ही जोडी प्रचंड गाजत होती. याच लोकप्रियतेचा फायदा कॅश करून घेण्यासाठी यश चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांना हा चित्रपट एक हळवी प्रेम कथा बनवायचा होता. त्यामुळे त्यांनी या चित्रपटाला संगीतकार म्हणून शिव हरी यांना निवडले.( शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरसिया) या सिनेमासाठी त्यांनी तब्बल पाच गीतकार घ्यायचे ठरवले.
================================
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
================================
राजेंद्र कृष्ण, निदा फाजली,डॉ. हरिवंश राय बच्चन, संत मीरा आणि हसन कमाल. शिवहरी यांना त्यांनी सॉफ्ट रोमँटिक धून बनवायला सांगितल्या आणि प्रत्येक गीतकाराकडे त्यांनी त्या ट्यून पोहचवल्या. आणि त्यावर शब्द लिहायला सांगितले. सर्व गाणी जेव्हा त्यांच्याकडे आली; त्यावेळेला त्यांना काहीतरी कमतरता वाटू लागली. या चित्रपटातून त्यांना हवा असलेला रोमँटिक फ्लेवर या गाण्यांमधून मिळत नव्हता. म्हणून ते आपले नेहमीचे गीतकार साहिर लुधियानवी यांच्याकडे गेले. परंतु साहीर यांची तब्येत त्या काळात बरी नव्हती त्यामुळे ते गाणे लिहू शकले नाही. यश चोप्रा यांचे युनिट मधील एकाने जावेद अख्तर यांचे नाव सुचवले कारण जावेद अख्तर हे चांगले शायर होते हे सर्वांना माहीत होते. (Entertainment News)

यश चोप्रा जावेद यांना भेटले आणि त्यांनी या सिनेमाची गाणी लिहिण्याची विनंती केली. त्यावर जावेद अख्तर म्हणाले,” चोप्रा साहेब तुम्हाला माहित आहे मी गीतकार नाही. मी स्क्रिप्ट रायटर आहे . तुमच्या कितीतरी चित्रपटाच्या स्क्रिप्ट मी लिहिल्या आहेत. असे असताना तुम्ही मला गीतकार का बनवत आहात?” त्यावर यश चोप्रा म्हणाले ,”तुम्ही खूप चांगली शायरी करता हे मला माहित आहे आणि मला सध्या तुमच्या गीतांची गरज आहे कारण मी एक रोमँटिक सिनेमा बनवत आहे.” जावेद यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. परंतु यश चोप्रा यांच्या वारंवार केलेल्या आग्रहामुळे शेवटी ते गाणं लिहायला तयार झाले. त्यांनी चित्रपटाची सिच्युएशन, कलाकार समजावून घेतले. यश चोप्रा यांनी सांगितले चित्रपटाचे नाव ‘सिलसिला’ आहे. या सर्व माहितीवर त्यांनी शिवहरीच्या एका ट्यूनवर ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए..’ हे गाणं लिहिलं. यश चोप्रा यांना हे गाणं आणि ते शब्द खूप आवडले. त्यांनी या चित्रपटातील आणखी दोन गाणी त्यांना सांगितली.” तुम्ही लिहिलेली गाणी चित्रपटात अमिताभ आणि रेखा यांच्यावर चित्रित होणार आहेत.” (Amitabh Bachchan And Rekha Movie)

जावेद त्यांनी या चित्रपटासाठी आणखी दोन गाणी लिहिली. ‘नीला आसमान सो गया…’ आणि ‘ ये कहा आ गये हम युही साथ साथ चलते..’ या पैकी ‘नीला आसमा सो गया’ हे गाणं अमिताभ बच्चन आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात स्वतंत्र ध्वनिमुद्रित झाले. यश चोप्रा यांच्या म्हणण्यानुसार “यातील नायक हा स्वतः शायर आहे त्यामुळे त्याच्या स्वरात या भावना जास्त नैसर्गिक वाटतील.” त्याचप्रमाणे ‘ये कहा आ गये हम..’ या गाण्यात अमिताभ बच्चन यांनी लता मंगेशकर यांना साथ दिली होती. अमिताभ यांच्या धीरगंभीर आवाजात ‘मै और मेरी तन्हाई अक्सर ये बाते करते है…’ हे कर्ण सुखद होते. दोन्ही गाणी खूप चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड झाली.

‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुये…’ हे गाणं तर ऑल टाइम हिट रोमँटिक गाणे आहे. हे गाणे किशोर-लता यांनीच गावे असा जावेद अख्तर यांचा आग्रह होता. यातील सुरुवातीचे किशोर कुमार यांचे हमिंग गुणगुणणे खूप मनाला भिडते. यश चोप्रा यांनी हे गाणे अँमस्टरडॅम ट्युलिप्सच्या गार्डनमध्ये चित्रित केले. ‘सिलसिला’ या चित्रपटातील अन्य गाणी देखील खूप छान बनली होती. ‘सर से सरके’ हे गाणं हसन कमाल या लिहिलं होतं. तर ‘पहली पहली बार देखा ऐसा जलवा लडकी है या शोला’ हे गाणं राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलं होतं. डॉ. हरिवंश राय बच्चन यांनी लिहिलेले ‘रंग बरसे भीगी चुनरिया..’ हे गाणं तर आज देखील प्रत्येक होळीच्या सणाला हमखास आठवले जाते. त्याचप्रमाणे या चित्रपटात संत मीराबाई यांची ‘जो तुम तोडो पिया मै नाही तोडू रे..’ ही पारंपारिक रचना देखील होती.
================================
हे देखील वाचा: अभिनेता अशोक कुमार यांनी चाळीस दशकात घेतली होती फेरारी कार!
=================================
याच काळामध्ये सलीम आणि जावेद अलग झाले. यानंतर त्यांनी फक्त ‘जमाना’ आणि ‘मिस्टर इंडिया’ या दोन चित्रपटासाठी एकत्र काम केले. कारण हे दोन्ही सिनेमे त्यांनी खूप आधी साइन केले होते. जावेद अख्तर यानंतर चोटीचे गीतकार बनले आणि हिंदी सिनेमा त्यांच्या शब्दांनी आणखी रोमँटिक टवटवीत बनला. दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या आग्रहामुळे जावेद हक्क पहिल्यांदा गीतकार बनले हे मात्र नक्की!