
मालिकेच्या निर्मात्यावर पुन्हा एकदा भडकला Shashank Ketkar म्हणाला, ‘चॅनेलनं पेमेंट केलं, पण पैसे आमच्यापर्यंत आलेच नाही…’
मराठी मालिकांच्या दुनियेत नेहमीच सामाजिक आणि व्यावसायिक विषयांवर आपलं मत मांडणारा अभिनेता शशांक केतकर (Acto Shahsank Ketkar) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही वर्षांपूर्वी ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत काम केलेल्या कलाकारांना मानधन न मिळाल्याच्या मुद्द्यावर त्याने आवाज उठवला होता. आता पुन्हा एकदा तोच वाद नव्यानं समोर आला आहे. या मालिकेच्या दिग्दर्शक आणि निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर कलाकारांचे पैसे न दिल्याचा आरोप आहे. शशांकसह शर्मिष्ठा राऊत, मृणाल दुसानिस, विजय पटवर्धन यांसारख्या अनेक कलाकारांनी याविरोधात आवाज उठवला आहे. मालिकेला ५ वर्षे झाली तरीही कलाकारांना अद्याप मानधन मिळालेलं नाही, ही खंत अजूनही ताजीच आहे.(Shashank Ketkar)

अलीकडेच विजय पटवर्धन यांनी फेसबुकवर पोस्ट करत या मुद्द्याला पुन्हा एकदा उजाळा दिला. त्यांनी सांगितलं की, मालिकेच्या शेवटी त्यांना तीन लाखांचा चेक देण्यात आला होता, पण तो बाऊन्स झाला. त्यानंतर एका आठवड्यात संपर्क करण्याचं आश्वासन देण्यात आलं, पण प्रत्यक्षात कोणताही फोन आलेला नाही. त्यांच्या पत्नीच्या कॅन्सरच्या उपचारांसाठी त्यांना पैशांची तातडीने गरज असतानाही, मंदार देवस्थळी यांनी कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागल्याचं त्यांनी भावनिक शब्दांत लिहिलं.

या पोस्टखाली शशांक केतकरने कमेंट करत आपला संताप व्यक्त केला. त्याने लिहिलं की, “आपण अनेक कलाकार याच अवस्थेत आहोत. प्रत्येकाची रक्कम लाखात आहे. मालिका संपल्यानंतर काही महिने वाट पाहून आम्ही सोशल मीडियावर याबाबत व्यक्त झालो. त्यावर मंदार दादाने एका मुलाखतीत सांगितलं की, पुढच्या ६ महिन्यांत सगळ्यांना पैसे दिले जातील. पण आता त्या मुलाखतीलाही ५ वर्षे झाली आहेत.”(Shashank Ketkar)
======================================
=======================================
शशांकने स्पष्ट शब्दांत म्हटलं आहे की , “मंदार दादा एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहे, यात शंका नाही. पण निर्माते म्हणून त्याने आम्हाला फसवलं. आपण याबाबत वाहिनीला पत्रही दिलं होतं, पण काहीच उपयोग झाला नाही. वाहिनीने त्याला पेमेंट केलं, पण त्या पैशांचं काय झालं, याचं उत्तर अजून मिळालेलं नाही.” त्याने पुढे अस ही लिहिलं आहे की , “तेव्हा इंडस्ट्रीमधील काही कलाकार आम्हालाच दोष देत होते. ‘निर्मात्याने संधी दिली आणि आता तुम्ही त्याच्यामागे लागलात पैशांसाठी’ असं म्हणणाऱ्यांना माझं एवढंच सांगायचंय , नुसत्या शब्दांत नव्हे, तर कृतीतून सपोर्ट दाखवा. मंदार दादाला पाठींबा द्यायचाच आहे, तर तुमच्या खात्यातून प्रत्येकीने ५ लाख रुपये द्या त्याला, म्हणजे तो आम्हाला पैसे देऊ शकेल. तोच खरा सपोर्ट!”