Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट
सचिन पिळगांवकर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे त्रिकूट म्हटलं की एक चित्रपट हमखास डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे अशी ही बनवाबनवी… कोणत्याही मराठी माणसाला विचारलं की, त्याचा आवडता मराठी चित्रपट कोणता तर सगळ्यांचे एकच उत्तर असेल आणि ते म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. या चित्रपटाने अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. ३०-३५ वर्ष रिलीजला उलटून गेली असली तरी या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे. या चित्रपटाने जी लोकप्रियता मिळवली तो कोणत्याही दुसऱ्या सिनेमाच्या नशिबात नाही. आजही या सिनेमाचे सर्व संवाद किंबहुना सर्वच चित्रपट सगळ्यांना तोंडपाठ आहे.

सचिन पिळगांवकर यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातील प्रत्येक डायलॉग अजरामर आहे… त्यावर नेहमीच विविध प्रकारचे मीम्स देखील नेहमीच बनतात. याच चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग म्हणजे ‘७० रुपये वारले’. या संवादावर तर नेहमीच प्रेक्षकांचा हशा पिकतो. असा हा सुपरहिट डायलॉग लेखकाला सुचला कसा असेल? असा प्रश्न अनेकदा बऱ्याच लोकांना पडतो. नुकतेच या प्रश्नाचे उत्तर या सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या सचिन यांनी एका मुलाखतीदरम्यान दिले आहे.
सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीमध्ये या प्रश्नाचे उत्तर देत ७० रुपये आणि इस्त्रायलचं औषध यामागची खरी कहाणी सांगितली आहे. बनवाबनवी सिनेमाचे लेखक वसंत सबनीस यांच्या खऱ्या आयुष्यात घडलेली ही खरी घटना होती. वसंत सबनीस यांना डायबिटीस होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या मित्राला ७० रुपये देऊन डायबिटीसचे औषध मागवले होते. आयुष्यात घडलेल्या या खऱ्या घटनेचा वापर लेखक वसंत सबनीस यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ त केला आहे.

‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटामध्ये हा सीन असा आहे की, धनंजय माने (अशोक सराफ) यांचे घरमालक विश्वास सरपोतदार (सुधीर जोशी) यांना डायबिटीस असतो. एकदा धनंजय माने खोटे कारण देत विश्वास सरपोतदार यांच्याकडून ७० रुपये उकळतो. मित्र इस्त्रायलला असून तो तिकडून डायबिटीसचे औषध पाठवेल, अशी थाप तो मारतो. पुढे जेव्हा धनंजय माने सरपोतदारांचे घर सोडतात तेव्हा विश्वास सरपोतदार त्यांना ७० रुपये परत मागत इस्त्रायलच्या औषधाबद्दल विचारतात. तेव्हा माझा मित्र इस्त्रायलला वारला, त्यासोबत तुमचे ७० रुपयेही वारले, असे खोटे सांगतो. हा डायलॉग आजही ऐकला की आपल्या चेहऱ्यावर हसू येतं.
================================
हे देखील वाचा : Rajinikanth : सामान्य माणसाचा बुलंद रुपेरी आवाज!
=================================
हा चित्रपट म्हणजे मराठी मनोरंजनविश्वातील एक कल्ट सिनेमा ओळखला जातो. फक्त मराठीच नाही तर अनेक इतर भाषांतील लोकांचा बनवाबनवी हा आवडता सिनेमा आहे. या सिनेमाने जे यश आणि लोकप्रियता पाहिली ती कोणालाही मिळालेली नाही. सचिन यांनी आजवर ‘श्रीकृष्ण लीला’, ‘नदिया के पार’, ‘शोले’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘अखियों के झरोको से’, ‘अष्टविनायक’, ‘माँ बेटी’, ‘अशा बऱ्याच हिंदी मराठी चित्रपटांमध्ये कामं केली आहेत… शिवाय, दिग्दर्शक, गायक आणि निर्माते म्हणूनही ५० वेळांपेक्षा अधिक काळ ते मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत… त्यांना वाढदिवसानिमित्त कलाकृती मीडियाच्या खुप खुप शुभेच्छा…!
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi