
Madhubala : रोमँटिक ड्यूएट गाण्याची चाल चक्क अंधेरीच्या रेल्वे स्टेशनवर सुचली होती!
भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्ण युगातील गाणी हे खरं आपल्या सिनेमाचं वैभव आहे. चित्रपटात गाणी असणे हे भारतीय सिनेमाचं एक वैशिष्ट्य आहे. या गोल्डन इरा मध्ये प्रत्येक कलावंत आपल्या प्रतिभेतून चांगली निर्मिती कशी होईल याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे जोवर ती कलाकृती दर्जेदार होत नाही तोपर्यंत त्यावर प्रयत्न चालू असायचे. त्यामुळेच या काळात बनलेले सिनेमे असतील किंवा गाणी असतील आज सत्तर ऐंशी वर्षानंतर देखील लोक आवडीने पाहत असतात; ऐकत असतात. ही कमाल त्या काळातील कलावंतांची होती. त्यांनी घेतलेल्या मेहनतीची होती. त्या काळात गाणी बनण्याची प्रक्रिया देखील खूप इंटरेस्टिंग असायची. कधीकधी दोन दोन महिने एखादं गाणं बनत नसायचं तर कधी अक्षरशः मिनिटांमध्ये गाणं तयार होत असे. गाणं बनण्याचा कालावधी किती का असेना पण ते दर्जेदारच असायचं. असंच एकदा एका झटक्यात तयार झालेला गाणं जे आज देखील टॉप टेन रोमँटिक सॉंगमध्ये ज्याचा समावेश होतो त्या गाण्याची मेकिंगची गोष्ट भन्नाट आहे.

हा चित्रपट १९५१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांमध्ये दिलीपकमार आणि मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचे नाव होतं ‘तराना’ . या सिनेमातील गाणी अनेक गीतकारांनी लिहिली होती आणि या सर्व गाण्यांना संगीतकार अनिल विश्वास यांनी संगीत दिले होते. हा एक तरल प्रेम कथा असलेला चित्रपट होता. दिलीप आणि मधुबालाचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटातील गाणी रोमँटिक आणि तरल भावना व्यक्त करणारी असावीत असं दिग्दर्शक राम दरीयानी यांनी गीतकार प्रेम धवन यांना सांगितलं होतं. या चित्रपटातील एक युगलगीत जे तलत मेहमूद आणि लता मंगेशकर यांनी गायलं होतं. या गाण्याच्या मेकिंग च स्टोरी खूप भन्नाट आहे. हे गाणं लिहिलं होतं गीतकार प्रेम धवन यांनी.
प्रेम धवन जेव्हा मुंबईमध्ये आले तेव्हा त्या दिवशी त्यांना सुरिंदर कौर या गायिकेला भेटायचं होतं. म्हणून ते संगीतकार अनिल विश्वास यांना म्हणाले की “ तुम्ही माझ्यासोबत दादर हून अंधेरीला चला आपण लोकल ट्रेनमध्ये गप्पा मारत आपल्या आगामी ‘तराना’ चित्रपटातील गाण्यांची चर्चा करू.” त्याप्रमाणे हे दोघे दादर हून अंधेरी ला जाण्यासाठी लोकल ट्रेन मध्ये बसले. अनिलदा यांनी गाण्याची सिच्युएशन सांगितली आणि ताबडतोब गाडीच्या गतीच्या लय मध्ये प्रेम धवन यांनी गाण्याचा मुखडा लिहून टाकला. ‘ सीने मे सुलगते है अरमा आंखो मे उदासी छायी है…’ आणि तो कागद त्यांनी अनिल विश्वासाला दाखवला. त्या ओळी पाहून अनिल विश्वास एकदम खूष झाले. त्यांच्या मनात तिथल्या तिथे गाण्याला चाल उमटायला सुरुवात झाली. तोपर्यंत अंधेरी स्टेशन आले.
================================
हे देखील वाचा : दिलीपकुमारला पहिल्यांदा पाहिल्यावर सायरा बानू का किंचाळली होती?
=================================
स्टेशनवर उतरल्यानंतर संगीतकार अनिल विश्वास गीतकार प्रेम धवन यांना म्हणाले ,” तुम्ही तुमच्या गायिकेला भेटायला जा. मी इथेच स्टेशनवर बसून या गाण्याला चाल लावतो!” आणि तिथेच स्टेशन वरील बाकड्यावर बसत त्याच्या अंतऱ्याच्या चाली बाबत विचार करू लागले. प्रेम धवन एकटेच सुरिंदर कौर हिला भेटायला गेले. इकडे अंधेरीच्या लोकल ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर बसत यांनी गाण्याचे नोटेशन्स लिहायला सुरुवात केली. त्यांना गाण्याच्या या पहिल्या ओळी खूप आवडल्या होत्या. अनिल विश्वास यांनी लगेच यमन कल्याण या रागात गाण्याची धून तयार केली.
या गाण्याला तलत मेहमूद आणि लता मंगेशकर यांनी गावे अशी त्यांच्या मनात इच्छा झाली. त्या पद्धतीने त्यांनी दोघांच्याही व्हाईस स्किल आणि स्केल चा विचार करत अंतऱ्याच्या चाली देखील तयार केल्या. शब्द अजून यायचेच होते. सर्व गाणे तयार झाल्यानंतर ते खुषीत प्रेम धवन यांची वाट पाहू लागले. संध्याकाळी प्रेम धवन अंधेरी स्टेशनवर आले आणि पुन्हा त्यांचा प्रवास सुरू झाला. अनिलदांनी त्यांना नोटेशन्स ऐकवले आणि त्यावर शब्द लिहायला सांगितले. प्रेम धवन यांनी त्यावर अतिशय सॉफ्ट असे शब्द लिहिले आणि गाणं तयार झाले. दिग्दर्शकाला निर्मात्याला ती ट्यून आणि ते शब्द खूप आवडले. तलत मेहमूद आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गाणं रेकॉर्ड झालं. या चित्रपटामध्ये एकूण दहा गाणी होती आणि सर्वच गाणी प्रचंड सुंदर बनली होती.

सीनेमे सुलगते हे अरमान… हे गाणं तर त्या काळातील तरुणाईचा अतिशय लाडके गाणे झाले होते अतिशय हळुवार शब्दांमध्ये प्रेमभावना व्यक्त करणारे हे गाणं आज देखील तितकंच लोकप्रिय आहे. तलत आणि लता यांच्या युगलगीतातील हे कदाचित सर्वोत्कृष्ट गाणे ठरावे. मार्च १९५१ मध्ये या चित्रपटाचा शूटिंग सुरू झालं आणि ५ ऑक्टोबर १९५१ या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले. दिलीप कुमार आणि मधुबाला यांची केमिस्ट्री या चित्रपटात खूप चांगली जमली होती. असं म्हणतात या दोघांच्या मनाची तार देखील याच चित्रपटापासून जुळली.
================================
हे देखील वाचा : Shammi Kapoor : शम्मी कपूर मधुबालावरील (एकतर्फी) प्रेमात अक्षरशः पागल झाला होता!
=================================
मधुबालाने दिलीपकुमार गुलाबाचे फूल देऊन आपल्या प्यार का इजहार केला होता असे देखील म्हणतात. एरवी प्रत्येक सिनेमाला बदडून काढणाऱ्या बाबुराव पटेल यांनी त्यांच्या फिल्म इंडिया या मासिकात या चित्रपटाबद्दल खूप चांगलं लिहिलं होतं. दिलीप कुमार आणि मधुबाला यांची प्रेम कहानी पुढची सात-आठ वर्षे चालली. ’मुगल ए आजम’ हा या जोडीचा शेवटचा चित्रपट. तरल प्रेम कहानी म्हणून तराना हा चित्रपट खूप गाजला आणि ‘सीने में सुलगते है अरमा…’ या अप्रतिम युगल गीताने जादू केली जे अवघ्या काही तासात बनले!