Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Heer Ranjha या सिनेमाचे सर्व संवाद काव्यात्मक शैलीत (Poetic Form)

Kantara 1 ओटीटीवर कधी येणार?

ManaChe Shlok चित्रपट अखेर नव्या नावासह पुन्हा होणार प्रदर्शित!

‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Makadchale Marathi Drama: बाल प्रेक्षकांना मनसोक्त आनंद देणाऱ्या ‘माकडचाळे’ नाट्याचा दिवाळीत शानदार

Manthan Movie : काय कनेक्शन होते ‘या’ गाण्याचे प्रिन्स चार्ल्स

तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।; Abhanga Tukaram

Chiranjeevi Hanuman – The Eternal या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार राजेश

…जेव्हा नीतू कपूर यांनी Rishi Kapoor यांच्या अफेअर्सना One Night

Prasad Jawade आणि अमृताने अचानक सोडले राहते घर,व्हिडिओ पोस्ट करत

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

निमित्त Amitabh Bachchan-Rekha यांच्या वाढदिवसाचे; फोकस त्यांच्या पडद्यावर न आलेल्या चित्रपटावर

 निमित्त Amitabh Bachchan-Rekha यांच्या वाढदिवसाचे; फोकस त्यांच्या पडद्यावर न आलेल्या चित्रपटावर
कलाकृती विशेष

निमित्त Amitabh Bachchan-Rekha यांच्या वाढदिवसाचे; फोकस त्यांच्या पडद्यावर न आलेल्या चित्रपटावर

by दिलीप ठाकूर 10/10/2025

मला कायमच असे वाटत आले आहे, काही ना काही कारणास्तव पडद्यावर येऊ न शकलेले चित्रपट पडद्यावर आले असते तर चित्रपटाचा इतिहास, भूगोल, गणित, भूमिती सगळेच बदलले असते. आणि प्रत्येक कलाकाराच्या प्रगती पुस्तकात असे न आलेले चित्रपट आहेत. ते कोणालाही चुकलेले नाही. आणि त्यातही मी तब्बल चार दशकं प्रत्यक्षात या चित्रपटसृष्टीत चौफेर वावरत असल्याने अशा पडद्यावर न आलेल्या अशा अनेक चित्रपटाच्या मुहूर्त आणि चित्रीकरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यामुळे माझ्या काही आठवणी वेगळ्या आहेत…. अशा दोन सेलिब्रिटींच्या बाबतीतही ते झाले आहे. यातून कोणाचीही सुटका नाही म्हटलं ना?

सर्वकालीन बहुचर्चित रेखा (१० ऑक्टोबर) व सर्वकालीन कार्यरत अमिताभ (११ ऑक्टोबर) यांचे वाढदिवस पाठोपाठच्या दिवशी असतात हे कोणत्याही पटकथेत नाही. त्यात काहीच नवीन नाही. ते सर्वज्ञात आहेच. हे आपोआप घडलंय. या जोडीच्या ‘पडद्यावर न आलेल्या चित्रपटां’ची गंमत गोष्ट मात्र वेगळीच आहे. ते एकत्र आलेले चित्रपट सर्वज्ञात आहेत. ते चित्रपट कायमच चर्चेत असतात. त्या चित्रपटांनी सिंगल स्क्रीन थिएटर्स ते यू ट्यूब असा मोठाच प्रवास केला आहे.

पण त्यांच्या न आलेल्या पिक्चर्सबद्दल तसं नाही. ती गोष्टच वेगळी. अमिताभ व‌ रेखा म्हटल्यावर काही वेगळे असे हवेच. तुमची उत्सुकता वाढवणारा किस्सा सांगतो, गाणे एक अथवा सेम टू सेम…. रेखा देखिल एकच. ‘दुसरी रेखा’ असूच शकत नाही. ‘रेखा’ नावातच सगळं वलय, वादळ व  व्यक्तिमत्व भरलयं. पडद्यावरचे आणि ‘ती स्टार असल्यानेच गॉसिप्स मॅगझिनमधील’ असा संयुक्त मामला आहे. रेखा एके रेखाच. दुसरं कोणी असणे शक्य तरी आहे का?

पण हीरो मात्र दोन. बरं हे हीरो कोण बरं हेही पाहायला हवे. पहिला अमिताभ बच्चन आणि दुसरा संजय खान. नेमका संदर्भ काय असा तुमचा प्रश्न असेलही. की कोड्यात टाकणारी गोष्ट वाटते?    तुम्हालाही नक्कीच माहित आहे, अमिताभ व संजय खान एकाही चित्रपटात एकत्र आले नाहीत आणि तसे ते एकत्र आले नाहीत हेही फार बरेच झाले हो. न घडलेल्या अनेक गोष्टी फार चांगल्याही असतात. कोणाही निर्माता आणि दिग्दर्शकाला या दोघांना एकत्र आणणे सुचले नाही हेही तितकेच महत्त्वाचे.

संजय खान एकेकाळी चलनी नाणे होता हेदेखील खरं आहे. अमिताभचे सुरुवातीचे दिवस. फार संघर्षाचे होते. तो आहे म्हणजे हमखास पिक्चर फ्लॉप हे कोणाही ज्योतिषाने कुंडली न मांडताही घडत होते (अशा आठवणी नकोतच.). त्याला कसेबसे पिक्चर्स मिळत होते. चलनी नाणे मिळत नसेल तर मिळेल ते नाणे घेऊन पिक्चर निर्मितीचा जुगार खेळणारे प्रत्येक काळात फायनान्सर, निर्माता व दिग्दर्शक असतातच. ‘बस्स एक छोटी पिक्चर बना रहा हू’ असे म्हणत ते इतरांचे समाधान करण्याचा प्रयत्न करतात.

अशाच ‘पडत्या काळात’ अमिताभला निर्माता व दिग्दर्शक कुंदनकुमारने साईन केले. जोडीला नायिका रेखा. १९७२ च्या सुरुवातीची ही गोष्ट आहे. तेव्हा या दोघांत ‘असं तसं’ काहीही नव्हते. अमिताभ तोपर्यंत कोणीही नव्हता त्यामुळे ‘रेखा’ ओलांडली जाण्याची सुतराम शक्यता नव्हतीच. फरक इतकाच की, रेखाची ‘सावन भादो’ या पहिल्याच पिक्चरपासून लक्षवेधक सुरुवात झाली होती. आणि रेखा ‘बरखा बहार’,‌’धर्मा’, ‘ऐलान’, ‘अंजाना सफर’, ‘मेहमान’, ‘सांज और सनम’ असा मिळेल तो पिक्चर साईन करुन स्वतःला फिल्म इंडस्ट्री, मिडिया व पब्लिकसमोर ठेवत होती. प्रत्येक काळातील नवीन पिढीतील कलाकारांनी यातून जमलंच तर काही शिकावे. रेखाकडून शिकण्यासारखे बरेच काही नक्कीच आहे.

================================

हे देखील वाचा : जया, रेखा यांच्याआधी ‘या’ मुलीवर होतं Amitabh Bachchan यांचं प्रेम

=================================

 ‘दुनिया का मेला ‘चे शूटिंग सुरु झाले. चांदिवली स्टुडिओत प्रेम गीताचे शूटिंग ठरले. हा स्टुडिओ आजही कार्यरत आहे, बरं का? ‌‌या गाण्याचे बोल, ये चेहरा ये जुल्फे, जादू सा कर रहे है, तौबा तौबा…. अमिताभ व रेखा यांनी ‘प्रेमाचा अभिनय वठवून’ हे गाणे साकारले. आणखीन काही छोट्या मोठ्या प्रसंगाचे शूटिंग झाले आणि या पिक्चरचे पहिले शूटिंग सत्र संपले. त्या काळात‌ अशाही बातम्या असत. त्यातूनच चित्रपटाची प्रगती समजत असे. फार महत्त्वाचे असते ते.

दोन अडिच महिन्यांनी याच चांदिवली स्टुडिओत याच पिक्चरचे आणखीन एक शूटिंग सत्र असल्याने रेखा स्टुडिओत पोहचली तेव्हा तिला ‘आज संजय खानसोबत शूटिंग आहे’ हे समजल्याने आश्चर्याचा फारसा धक्का बसला नाही. तोपर्यंत तरी ‘मी पटकथा वाचून पिक्चर साईन करते’ अशा पोझिशनला ती आली नव्हती. (त्या स्टेजला खरोखरच कमी कलाकार पोहचतात. बाकीचे ‘माझी भूमिका, माझा पैसा’ असा पवित्रा घेतल्यानेच टिकून राहू शकतात. वर म्हणतात मी ‘दिग्दर्शकाचा कलाकार ‘चित्रपटसृष्टीचे अंतरंग फार फार वेगळे आहे. हीच तर या क्षेत्रातील गंमत आहे.) पण आज संजय खानसोबत ‘ये चेहरा ये जुल्फे तौबा तौबा’ याच गाण्यावर ‘प्रेमाचा अभिनय’ करायचाय हे समजताच ती दचकली. आपला हीरो बदललाय हे तिच्या लक्षात आले. (सुरुवातीच्या काळातील तिचे प्रेमेन्द्र वगैरे हीरो बदलले गेले असते तर बरेच झाले असते. अमिताभच्या जागी संजय खान ही निवडही कशीशीच म्हणा. पण तेव्हाची सिच्युएशनच तशी होती, त्याला अमिताभ काय आणि रेखा काय काहीही करु शकत नव्हते. स्टारच्या आयुष्यात असंही काही घडतं बिघडतं,  बरं का? चित्रपटसृष्टीतील ‌असे रंग केवढे तरी. आणि न संपणारे.)

‘दुनिया का मेला’ निर्मितीवस्थेत असताना रेखा बिझी होत गेली आणि चित्रपट रखडत राहिला. अमिताभला मिळत असलेल्या पिक्चरमध्ये प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’, ह्रषिकेश मुखर्जी ‘दिग्दर्शित ‘नमक हराम’ , नरेन्द्र बेदी दिग्दर्शित ‘बेनाम’ होते. ११ मे १९७३ रोजी ‘जंजीर ‘ रिलीज झाला (मुंबईत मेन थिएटर इंपिरियल) आणि पहिल्याच शोपासून पब्लिकला हा अन्ग्री यंग मॅन आपलासा वाटला आणि अमिताभ बच्चन स्टार झाला. पिक्चर खणखणीत हिट म्हणजे अनेक गोष्टींना महत्त्व येते. त्या गोष्टी एक वेगळीच स्टोरी आहे. यशाची गोष्ट न संपणारी असते.

तर १९७४ सालच्या मध्यावर  याच इंपिरियल थिएटरमध्ये ‘दुनिया का मेला ‘ रिलीज झाला. (त्या काळात मेन थिएटर हा व्यावसायिकदृष्ट्या भारीच महत्त्वाचा फंडा होता.) आणि तोपर्यंत गल्ली गल्लीत बातमी पोहचली होती, याच ‘दुनिया का मेला ‘मधून अमिताभला काढले आणि संजय खानला घेतले. समजा, असे घडले नसते तर? असा विचार करण्यात आता अर्थ नाही. कुंदनकुमारला कुठे माहित होते की, अमिताभ ‘स्टार’ बनेल आणि आपल्या पिक्चरचे नशीब फळफळेल? अमिताभ स्टार बनूनही अगोदरच्या काही चित्रपटांना गोड फळे आली नाहीत त्याचे हो काय?

आता तुमचा प्रश्न असेल, अमिताभ व रेखावरच्या त्या गाण्याचे पुढे काय झाले? आता यू ट्यूबचे युग आले आणि हे सेम गाणे अमिताभ व रेखा आणि संजय खान व रेखा या दोघांवरचे गाणे त्यावर उपलब्ध झाले आहे. बघा तर हे दुर्मिळ गाणे… ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला ही एक अशा अनेक गोष्टी पाहण्याची‌ उत्तम संधी.‌ सगळे कसे झटपट. पटापट. बरं काळ कितीही वेगाने पुढे सरकला तरी बीग बी व रेखा जोडीचे चित्रपट आणि गाॅसिप्स यांची सतत रंजक चर्चा सुरुच असते.  पण आणखीन काही चित्रपटांमध्ये ते एकत्र येऊ शकले असते याची तुम्हाला कल्पना आहे का?  तेच सांगायचे आहे.

याच काळात अमिताभला विश्वजीतने ‘रॉकी’ नावाच्या सिनेमासाठी साईन केला होता याची तुम्हाला कल्पना नसेल.‌ त्या काळात  विश्वजीतची रेखा एक फेवरेट हिरोईन होती. म्हणजे ‘अंजना सफर’, ‘मेहमान’, ‘दो ऑखे’ अशा काही चित्रपटांमध्ये रेखाने विश्वजीत ची नायिका साकारली (‘अंजाना सफर’च्या सेटवर कोणाच्याही ध्यानीमनी नसताना विश्वजीतने रेखाचे चुंबन घेतले याची गोष्ट  आजही सांगितली जाते.)  

रेखा आपले हे चित्रपट विसरलीही असेल. त्यात‌ तिने व आपण लक्षात ठेवावे असे काहीही नव्हतेच. विश्वजीतने निर्मिती दिग्दर्शित केलेल्या ‘कहते है मुझको राजा’ मध्ये सुद्धा रेखाच विश्वजीतची नायिका होती. पिक्चर फ्लॉप झाला. आता हीच कंटीन्यूटी कायम राह्यला नको का?  रेखाला विश्वजीतने रॉकी मध्ये अमिताभची नायिका म्हणूनच साइन गेलं. ट्रेड पेपरमध्ये जाहिरातही आली.  पण विश्वजीतचा त्यावेळेला अतिशय पडता काळ असल्याने आणि त्याने त्यानंतर अभिनयापेक्षा जास्त लक्ष हेमंत कुमारने आपल्यासाठी जी रुपेरी पडद्यावर गाणी गायली ती गाणी आपण गात गात नवा आर्केस्ट्रा त्याने सुरु केला आणि त्याचा  गायक म्हणून उदय झाला.  त्यामध्ये ‘रॉकी’ दुर्दैवाने बंद. अरेरे.

================================

हे देखील वाचा : अभिनेत्री रेखाने नववीत असतानाच का शाळा सोडली?

=================================

काही वर्षांपूर्वी एका पार्टीमध्ये माझी विश्वजीतची भेट झाली असता त्याला माझ्याकडे ‘रॉकी’ची असलेली  जाहिरात आवर्जून दाखवताच तो अगदी थक्क झाला. माझ्याकडे कलेक्शनमध्ये अशा पद्धतीची एक बावन्न त्रेपन्न वर्षांपूर्वीची एखाद्या चित्रपटाची जाहिरात असणं हा त्याच्यासाठी एक प्रकारचा “कल्चरल शॉक” होता. विश्वजीत म्हणाला,  मी इम्पात नाव रजिस्टर केलेलं परंतु चित्रपट बनू शकला नाही.  कालांतराने सुनील दत्त यांनी माझ्याकडून आपल्या अजंठा आर्ट्ससाठी ‘रॉकी’ नाव घेतलं आणि संजय दत्तला ‘रॉकी’च्या रुपात रुपेरी पडद्यावर आणले. ही गोष्ट एक्सलुझिव्ह आहे. म्हटलं ना, पडद्यावर न आलेल्या चित्रपटाचा इतिहास भूगोल वेगळाच.

अमिताभ आणि रेखा यांच्या न बनलेल्या, न शिजलेल्या, न घडलेल्या, न पडदा पाहिलेल्या चित्रपटांबद्दलच्या गोष्टी अशा सुरस आणि चमत्कारिक आहेत. आणि त्याच्यात तर गंमत आहे. असाच एक या जोडीचा चित्रपट होता तो निर्माता व दिग्दर्शक कुंदनकुमार याचाच ‘अपना पराया’.  परंतु आता अमिताभ बच्चन प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ (१९७३) नंतर स्टार झाल्याने आपल्याला ज्याने पडत्या काळामध्ये चित्रपटातून बाहेर काढलं अशा निर्माता दिग्दर्शकाच्या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन  भूमिका साकारेल असं तुम्हाला वाटतं का? भले त्याने अमिताभ व रेखाची नावे देत चित्रपटाची  घोषणा केली असेल. तशा नवीन चित्रपटाच्या अनेक घोषणा होतच असतात. आणि चित्रपट तेथेच थांबतो. आपल्या

संघर्षाच्या काळात किंवा धडपडीच्या काळात जो आधार देतो अशांचीच साथ सोबत करणं हा एक मानवी स्वभाव आहे. तो विश्वास दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी जया भादुरी यांनी अमिताभ बच्चनवर दाखवला. ‘अपना पराया’  चित्रपट सुद्धा डब्यात गेला याचं आश्चर्य वाटत नाही.एकेक. करत करत अशा न बनलेल्या चित्रपटाची संख्या मात्र वाढतेय.

दिग्दर्शक राकेश कुमार हा तसा अमिताभ बच्चनच्या मर्जीतील. दिग्दर्शक प्रकाश मेहरांकडे सहायक दिग्दर्शक म्हणून उमेदवारी करत असताना प्रकाश मेहरा यांनी आपल्या प्रॉडक्शनच्या ‘खून पसीना’चे दिग्दर्शन राकेश कुमारकडे सोपवलं. अमिताभ रेखा विनोद खन्ना अशी‌ स्टार कास्ट. हा चित्रपट अमिताभ बच्चनच्या अँग्री अँड मॅन इमेजला सूट होणारा असल्याने चित्रपटाने मुंबईत अलंकार थिएटरमध्ये रौप्य महोत्सवी यश संपादलं. आणि अमिताभ बच्चनचा राकेश कुमारवर विश्वास बसला. या जोडीने ‘मिस्टर नटवरलाल’,  ‘याराना’,’ दो और दो पाच’ असे आणखीन तीन चित्रपट दिले. ‘मिस्टर नटवरलाल’ मध्ये पुन्हा एकदा अमिताभ बच्चन आणि रेखा ‘परदेसिया सच है पिया ‘ अशी गीत संगीत व नृत्यातून धमाल उडवली.

आता चार चित्रपटानंतर दिग्दर्शकासोबत केले आणि राकेश कुमार व अमिताभ जोडी पुन्हा जमली तर आश्चर्य ते काय? जो हिट है, वो सेट है, वो फिट्ट है. राकेशकुमारने  चित्रपट जाहीर केला ‘टायगर’. बच्चनच्या ‘सूडनायक ‘इमेजला परफेक्ट नाव. नायिका रेखा. ते स्वाभाविक म्हणायचे.अमिताभ कमालीचा बिझी असल्याने ‘टायगर ‘साठी तारखाच मिळत नव्हत्या. असा उशीर होत असतानाच  मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘कुली’च्या बंगलोर येथील सेटवर अमिताभला अपघात झाला आणि त्याच्या एकूणच वाटचालीचे शेड्युल  बिघडलं आणि त्याच्यामध्ये ‘टायगर’  चित्रपट दुर्देवाने घोषणेपुरताच राहिला. अन्यथा ‘टायगर’ हे अमिताभ बच्चनच्या इमेजला अतिशय सूट होणारे  नाव घेऊन एक जोरदार चित्रपट आपल्यासमोर येऊ शकला असता.

 अमिताभ बच्चन आणि रेखा एकत्र येऊ शकले नाहीत असेही काही पिक्चर्सच्या कुंडलीत होतं म्हणायचं. आता हेही पिक्चर बनले असते तर अमिताभ व रेखाला एकत्र भूमिका साकारण्याची, सहवासाची आणखीन संधी मिळाली असतीच. प्रत्येक कलाकाराच्या प्रगती पुस्तकात ‘पडद्यावर न आलेले चित्रपट’ असतातच. तोही एक खेळाचाच भाग. खुद्द कलाकार अशा पडद्यावर न आलेल्या चित्रपटाबाबत भावूक होत असतील का? हा एक खेळाचाच भाग आहे असे मानतच पुढील वाटचालीवर फोकस ठेवत असतील. अमिताभ तेच करतोय हे आजही छोट्या मोठ्या पडद्यावर दिसतेय तर रेखा आजही कोणत्याही इव्हेन्टसला गेली रे गेली धडाधड फ्लॅश उडतात, रिल बनतात. सोशल मिडियात त्यांना विक्रमी लाईक्स मिळतातच.

================================

हे देखील वाचा : अमिताभ बच्चन पेक्षा जास्त मानधन सलीम जावेद यांनी घेतले !

=================================

आपण या दोघांना वाढदिवसानिमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा द्याव्या. तेवढचं आपल्या हाती असले तरी आपल्या रुपेरी कारकिर्दीच्या पन्नाशीनंतरही दोघेही आपापल्या शैली व क्षमतेने ॲक्टीव्ह आहेत यातून बरेच काही शिकण्यासारखे. दोघांसाठीही वय म्हणजे एक आकडा. तर मग आणखीन काय हवे? अमिताभ बच्चन असो वा रेखा, एकदा का त्यांचे चाहते झाल्यावर दुसरं कोणाचेही आपण चाहते व्हावे असे फारसे कोणालाच वाटत नाही ही त्यांची मोठीच मिळकत म्हणायचे. कौन बनेगा करोडपतीमथील शाळकरी मूलेही बच्चनघ जबरा चाहते आहेत आणि वयाची सत्तरी ओलांडलेही बच्चनचे चाहते आहेत, रेखा आज क़ोणत्याही इव्हेंटसला गेली रे गेली धडाधड फ्लॅश उडतात आणि ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच लाईक्स, कॉमेन्टस भरभर वाढतात.

स्टार असावै तर हे असे.

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amitabh Bachchan amitabh birthday Entertainment News rekha rekha and amitabh bachchan affair rekha and amitabh bachchan birthday rekha birthday
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.