‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

काय घडलं होतं Kishore Kumar यांच्या निधनाच्या दिवशी?
आज १३ ऑक्टोबर. किशोरकुमार यांचा स्मृतीदिन. त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीदिनाच्या दिवशी घडलेल्या घटनांचा आढाव. अष्टपैलू गायक आणि हरफन मौला कलावंत किशोर कुमार यांचा सिनेमाच्या दुनियेत प्रवेश भलेही चाळीसच्या दशकाच्या शेवटी झाला असला तरी त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता १९६९ सालच्या ‘आराधना’ नंतर मिळाली. त्यानंतर मात्र प्रत्येक संगीतकार, प्रत्येक अभिनेता किशोर कुमारच्या प्लेबॅकसाठी धडपडत होता. सत्तर आणि ऐंशीचे दशक पूर्णत: किशोरचे होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण किशोर कुमार यांनी गायलेल्या एकूण गाण्यांच्या जवळपास पंचाहत्तर टक्के गाणी ही या वीस वर्षातली आहे.

१९७६ साली पार्श्वगायक मुकेश आणि १९८० साली पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचे निधन झाले. आता किशोर कुमार वर प्लेबॅकचा लोड वाढत गेला. १९८१ सालापासून किशोर कुमार यांना देखील हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांनी देखील आपली गाणी काहीशी कमी केली. तरी पण सर्वांची पहिली पसंती ही किशोर कुमार हेच होते. दोन हृदयविकाराचे झटके आल्यानंतर किशोर कुमार यांनी आपल्या सिंगिंग करिअर लक्ष थोडे कमी केले होते. पण त्यांचे स्टेज शोज मात्र चालूच होते. देश आणि परदेशात ते फिरत होते. रसिकांचा फार मोठा फॅन फॉलोइग त्यांच्या मागे होता. परंतु अनपेक्षितपणे १३ ऑक्टोबर १९८७ या दिवशी किशोर कुमार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आणि रसिकांचा लाडका किशोरकुमार अनंताच्या प्रवासाला निघून गेला. खरंतर १३ ऑक्टोबर हा दिवस किशोर कुमार यांचे मोठे बंधू अशोक कुमार यांचा वाढदिवस. पण दुर्दैवाने याच दिवशी किशोर कुमार यांचे निधन झाले. अशोक कुमार यांनी यानंतर त्यांचा वाढदिवस पुढे आयुष्यात कधीही साजरा केला नाही.

अशोक कुमार म्हणायचे,”किशोर कुमार मला माझ्या मुलासारखाच होता!” दोघांच्या वयामध्ये तब्बल १८ वर्षांच्या अंतर होते. किशोर कुमार लहानपणापासूनच खूप खोड्या करून अशोक कुमार सोबत मस्ती करत असे. किशोर कुमार अशोक कुमार आणि अनुप कुमार या तिघांच्या आचरटपणाचा कळस म्हणजे ‘चलती का नाम गाडी’. या चित्रपटाप्रमाणे वास्तविक जीवनात देखील तिघेजण प्रचंड मस्तीखोर आणि धमाल करत असायची. १९८७ सालच्या एप्रिल महिन्यात अशोक कुमार यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यामुळे अशोक कुमार या वर्षी जरा दुःखातच होते. परंतु १३ ऑक्टोबर १९८७ या दिवशी किशोर कुमारने सकाळीच अशोक कुमार यांना फोन करून सांगितले की,” दादा, आज तुमचा वाढदिवस आपण एकत्र साजरा करूयात.” त्यावर दादा मुनी म्हणाले,” अरे मी कुठलाही वाढदिवस साजरा करणार नाही. तुला माहितीच आहे तुझ्या वहिनीचे निधन होऊन काही दिवस झाले आहेत.”
परंतु किशोर कुमारने असं काही इमोशनली दादा मुनी यांना सांगितले की दादा मुनी अशोककुमार किशोर कुमार यांच्या घरी यायला तयार झाले. किशोर कुमार खूप खूष झाले. त्याने लगेच पत्नी लीना चंदावरकरला बोलून सांगितलं,”आज दादा मुनी यांचा वाढदिवस आपल्याकडे आहे. आजच्या जेवणातील सगळ्या डिशेस ह्या त्यांना आवडतील अशाच बनायला पाहिजेत.” असे म्हणून त्याने कुक ला बोलावून अशोक कुमारच्या आवडीच्या पदार्थांची यादीच त्यांच्याकडे दिली. बाजारातून काही गोष्टी आणण्यासाठी लोकांना पिटाळले. घर आवरायला घेतले. लीना चंदावरकर सांगते, “त्या दिवशी किशोर कुमार खूप आनंदात होते. त्यांच्या अंगात खूप उत्साह आला होता. तो खूप आनंदी दिसत होता. कारण अशोक कुमारचा वाढदिवस हा त्याच्या बंगल्यावर साजरा होणार होता. या सर्व गडबडीत त्याने सकाळचा नाष्टा आणि दुपारचे जेवण सुद्धा कमीच केले”. लीना चंदावरकरला किशोरकुमार म्हणाले ,”हे बघ आता मी कमी खातोय पण संध्याकाळी बघ माझ्या भावासोबत कसा ताव मारतो ते.” त्यानंतर लीना चंदावरकर लहानग्या सुमितला घेऊन पहिल्या मजल्यावर गेली. किशोर कुमार आपल्या स्टडी रूममध्ये गेला. आणि तिथून त्याने काही मित्रांना फोन केले आणि संध्याकाळच्या पार्टीचे निमंत्रण दिले.

पण तितक्यात त्याला छातीमध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या. तो एका हाताने आपले छाती दाबत लीना चंदावरक च्या रूममध्ये शिरला. त्याला प्रचंड घाम आला होता आणि तो तिथे बेडवर कोसळला. लीना चंदावरकर हिने बाका प्रसंग ओळखला. मागच्या वेळी जेव्हा किशोरला असाच हार्ट अटॅक आला होता. तेव्हा अशोक कुमार यांनी होमिओपॅथिक गोळ्यांचे एक बॉटल तिच्याकडे दिली होती. या गोळ्या खूप प्रभावी आहेत असे त्यांनी सांगितले होते. त्या गोळ्या शोधण्यासाठी ती हॉलमध्ये गेली. पण या गोंधळात तिला त्या गोळ्या काही सापडल्यास नाहीत. ती ताबडतोब पुन्हा किशोर कुमार असलेल्या रूममध्ये आली आणि डॉक्टरला फोन करायचा प्रयत्न करू लागली. किशोर कुमारला दरदरून घाम आला होता. तो हातानेच तिला सांगत होता,”डॉक्टरला बोलावू नको काही होत नाही. मला काही होत नाही….” आणि असे म्हणून तो कोसळला आणि संपला!

लीना चंदावरकरच्या डोळ्यासमोर त्याचा प्राण गेला. ताबडतोब डॉक्टरला बोलावण्यात आले. पण तोवर वेळ निघून गेली होती. मग सर्व मित्रांना फोन झाले. मीडियाला कळवले गेले. सर्वांनाच हा मोठा धक्का होता. कुणाचाच विश्वासच बसत नव्हता. हळूहळू सर्वजण किशोर कुमारच्या गौरी कुंज बंगल्यावर पोचू लागले. संध्याकाळी सात वाजता अशोक कुमार आले. आपल्या धाकट्या भावाचे पार्थिव शरीर पाहून ते त्याला बिलगून हुंदके देऊन रडू लागले. एकाच वर्षांमध्ये त्यांना हा दुसरा शॉक होता. अशोक कुमारच्या मित्रांनी त्यांना बाजूला केले आणि सावरले. किशोर कुमारचा मुलगा अमित कुमार तेव्हा भारताच्या बाहेर होता. त्याला फोन करून सांगितले गेले. त्याला येण्यासाठी दोन दिवस लागणार होते. त्यामुळे किशोर कुमारचा पार्थिव हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले.
================================
हे देखील वाचा: अभिनेता अशोक कुमार यांनी चाळीस दशकात घेतली होती फेरारी कार!
=================================
अमित कुमार आल्यानंतर पुन्हा किशोर कुमारचे पार्थिव घरी आणले. राज कपूरने सांगितले की किशोर कुमारची बॉडी आर के स्टुडीओमध्ये ठेवा म्हणजे लोकांना तिथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येता येईल. १५ ऑक्टोबरला किशोर कुमारचे पार्थिव शरीर आर के स्टुडिओमध्ये ठेवण्यात आले. लाखो चाहत्यांनी साश्रू नयनांनी किशोरच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर १६ ऑक्टोबरला चेंबूर होऊन किशोर कुमारचे पार्थिव खांडवा मध्य प्रदेश येथे नेण्यात आले. तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. खांडवा बद्दल किशोर कुमार याला खूपच आकर्षण होते. तो लीना चंदावरकर ला नेहमी म्हणायचा,”आता हे गाणं वगैरे सगळं सोडून आपण खंडाळ्याला जाऊन राहू..” पण तो तसं काही करू शकला नाही. त्याची लाख इच्छा होती पण तो जावू शकला नाही त्याचं पार्थिव मात्र खांडव्याला गेलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी खांडवा मध्य प्रदेश येथे किशोर कुमार यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले!