
कहाणी Kishore Kumar यांच्या पहिल्या लग्नाची आणि संसाराची!
अभिनेता आणि पार्श्वगायक किशोर कुमार यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आजवर खूप लिहिलं गेलं आहे. त्याच्या चार चार लग्नांची माहिती सर्व रसिकांना आहे. पण त्यातील मधुबाला, योगिता बाली आणि लीना चंदावरकर यांच्या लग्नाबद्दल रसिकांना जास्त माहिती आहे. किशोर कुमार यांचे त्यापूर्वी पहिले लग्न रुमा गुहा यांच्यासोबत झाले होते. पण या वैवाहिक जीवनाबद्दल फारशी माहिती नाही. किशोर कुमार जेव्हा बॉम्बे टॉकीज मध्ये सुरुवातीचा स्ट्रगल करत होते त्यावेळेला त्यांच्या या प्रेम कहानी ची सुरुवात झाली. रुमा गुहा यांचा जन्म २ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला होता. त्या ब्रह्म समाजाच्या होत्या. त्यांची आई सती देवी ह्या मुंबईच्या प्रसिद्ध पृथ्वी थिएटर मध्ये गायिका होत्या.

याच काळात वयाच्या दहाव्या वर्षी रुमा गुहा बॉम्बे टॉकीज मध्ये आली. तेव्हा देविका राणी यांच्याकडे तीन चाइल्ड आर्टिस्ट काम करत होत्या. एक होती मधुबाला दुसरी रुमा गुहा आणि तिसरी शशिकला. रुमा गुहा पहिल्यांदा बॉम्बे टॉकीज च्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटात चमकली. यात दिलीप कुमार यांची प्रमुख भूमिका होती. रुमा गुहा हि अतिशय देखणी, गोड गळ्याची, नृत्य निपुण अशी कलाकार होती. अशोक कुमार यांच्या ‘मशाल’ (१९५०) या चित्रपटात देखील रुमाने भूमिका केली होती. नवकेतनचा पहिला चित्रपट ‘अफसर’ या चित्रपटात रुमा गुहा सेकंड लीड अभिनेत्री होती. यात देव आनंद आणि सुरय्या यांची प्रमुख भूमिका होती.
१९४७ साली जेव्हा बॉम्बे टॉकीज च्या म्युझिक रूम मध्ये किशोर कुमार हार्मोनियम वर सहगल यांचे गाणे गात होता त्यावेळेला पहिल्यांदा रूमाने किशोर कुमार यांना बघितले या कोवळ्या वयातच तिच्या मनात किशोर कुमार बद्दल अंकुर फुलला. दोघांची नजरा नजर झाली. दोन तरुण मने एकत्र आले. किशोर कुमार तिच्या प्रेमातच पडला. आणि १९५१ साली वयाच्या अवघ्या २२ वर्षी त्या दोघांनी बांद्रा कोर्टात जाऊन चक्क रजिस्टर मॅरेज केले! जेव्हा यांच्या लग्नाची खबर अशोक कुमार यांना कळाली तेव्हा ते प्रचंड चिडले. त्यांच्या मते किशोर कुमारने आधी आपल्या करिअर कडे लक्ष द्यायला पाहिजे होते.

रुमा गुहा ही सर्वार्थाने किशोर कुमार पेक्षा श्रेष्ठ होती असे त्यांना वाटत होते. एकतर ती उच्चशिक्षित होती. इंग्रजी उत्तम बोलत होती. चांगली अभिनेत्री होती. गायिका होती. आणि नृत्यांगना होती. किशोर कुमार तिच्यापुढे काहीच नव्हता. त्यामुळे अशोक कुमार यांचा या लग्नाला विरोध होता. ते स्वतः कोर्टामध्ये जाऊन त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट चेक केले आणि या मग या लग्नाला नाईलाजाने परवानगी दिली. नंतर मात्र हळूहळू गोष्टी सुधारत गेल्या. रुमा गुहा हिची मावशी सत्यजित राय यांची पत्नी (बिजोया रॉय) होती. त्यामुळे सत्यजित रे यांची ती भाची झाली होती. रुमाचे घराणे सर्व बाबतीत किशोर कुमारच्या घराण्याला वरचढ होते.
================================
================================
लग्नानंतर मात्र किशोर कुमारने देखील अभिनयाचे करिअर सिरीयस ली घ्यायला सुरुवात केली. त्या काळात तो स्वतःसाठी आणि देव आनंद साठी पार्श्वगायन देखील करत होता. थोड्याच दिवसात तो आघाडीचा अभिनेता बनला. याच काळात ३ जुलै १९५२ रोजी अमित कुमार यांचा जन्म झाला. किशोर कुमार आणि रुमा घोष यांच्या संसाराला आता एक चांगला अर्थ प्राप्त झाला. रुमा गुहा ने लग्नानंतर आपल्या करिअर कडे लक्ष देणे बंद केले आणि ती पूर्ण अर्थाने घर सांभाळू लागली.
या काळात किशोर कुमार प्रचंड बिझी आर्टिस्ट होता. तीन-तीन शिफ्ट मध्ये तो काम करत होता. त्यामुळे साहजिकच त्याचे घराकडे लक्ष देणे होत नव्हते. हळूहळू रुमा ला घरात बसने कठीण होवू लागले. तिच्यातील कलावंत तिला स्वस्थ बसू देत नव्हता. यातूनच मग किशोर कुमार आणि रुमा गुहा यांच्यामध्ये कुरकुरी सुरू झाला. किशोर कुमारला रुमा गुहा हिने घर सांभाळावे असे वाटत होते. रुमा ला मात्र आपलं करिअर पूर्ण करायचं होतं.
यातूनच वाद वाढत गेले आणि १९५८ साली दोघांच्या सहमतीने रीतसर घटस्फोट झाला. अमित कुमारला घेऊन रुमा गुहा कलकत्त्याला निघून गेली. दोघांमध्ये घटस्फोट जरी झाला असला तरी त्यांच्यातले संबंध चांगले राहिले. दोघे एकमेकांच्या कलांना प्रोत्साहन देत होते. १९६० साली रुमाने अरूप गुहा ठाकूरता यांच्यासोबत दुसरे लग्न केले आणि तिने आपला स्वतंत्र संसार सुरू केला. याच वर्षी किशोर कुमारने देखील मधुबाला सोबत लग्न करून आपला नवा डाव मांडला. रुमा गुहा ठाकूरता बंगाली सिनेमा आणि गायकीमध्ये मोठी स्टार बनली. किशोर कुमार देखील आपले अभिनयाची यात्रा साठच्या दशकात चालूच ठेवली.

साठच्या दशकाच्या उत्तरार्धात मात्र त्याला नवीन भूमिका मिळणे कमी झालं. त्याने ही खंत एकदा रुमा जवळ बोलून दाखवली. त्यावेळी रुमा गुहान त्याला एक पत्र पाठवून सांगितले ,”अभिनयाच्या भूमिका मिळत नसल्या म्हणून काय झालं? तुझ्याकडे इतका चांगला आवाज आहे . तो तू तुझ्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तू आता इतर नायकांसाठी पार्श्वगायन करायला सुरुवात कर.” रुमा गुहा यांचा सल्ला किशोर कुमार यांनी ऐकला आणि ‘आराधना’(१९६९) या चित्रपटापासून त्यांनी पार्श्वगायन या क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ काम करायला सुरुवात केली.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
‘आराधना’ नंतर किशोर कुमारचा कम्प्लीट मेक ओव्हर झाला आणि सत्तर आणि ऐंशीच्या दशकातला तो आघाडीचा प्लेबॅक सिंगर बनला. दरम्यान किशोर कुमारने मधुबालाच्या निधनानंतर आधी योगिता बाली आणि नंतर लीना चंदावरकर यांच्यासोबत लग्न केले. १३ ऑक्टोबर १९८७ रोजी किशोर कुमार यांचे निधन झाले. रुमा घोष यांचे पती आरूप ठाकूरता यांचे २००४ साली निधन झाले. त्यानंतर अमित कुमार आपली आई रुमा घोषला घेऊन ‘गौरी कुंज’ मुंबई मध्ये राहायला आला. लीना आणि रुमा या एकत्र राहू लागल्या. रुमा घोष यांचे ३ जून २०१९ रोजी वयाच्या वयाच्या ८५ व्या वर्षी यांचे निधन झाले.