
कमबॅक Akshaye Khanna आणि विनोद खन्ना यांचा
सगळ्यांनाच कमबॅक शक्य नसतोच, ज्यांना तो शक्य होतो त्यांची गोष्टच वेगळी. पुत्राचा कमबॅक आणि पित्याचा कमबॅक वेगळा असतो ती गोष्ट तर फारच वेगळी आणि त्यात एक काॅमन फॅक्टर असतो, तो म्हणजे गुणवत्ता. तीच कामी येते. २०२५ अक्षय खन्नाचे वर्ष यावर शिक्कामोर्तब झालेय. चित्रपटाच्या जगात यशासारखे सुंदर आणि महत्वाचं असे काहीही नाही. पिक्चर सुपरहिट है, तो सबकुछ फिट्ट है. या वर्षाची सुरुवात लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’च्या खणखणीत यशाने होताना अक्षय खन्नाने साकारलेल्या क्रूर, कपटी, कावेबाज, हिंसाप्रिय औरंगझेबाच्या भूमिकेचे भारी कौतुक झाले. या भूमिकेसाठी त्याने भरपूर मेहनत घेतल्याचे पडदाभर दिसले. आता वर्ष संपताना आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंदर’ मधील त्याचा असाच कमालीचा क्रूर, हिंसाचारी रहेमान डकैत गाजतोय. तो सगळ्यांनाच भारी ठरलाय.

सोशल मीडियातून अक्षय खन्नाचे अफाट कौतुक सुरू आहे. त्यांच्याबद्दलची प्रत्येक बातमी, स्फूट, रिल, व्हिडिओ भरभरून लाईक्स मिळवतेय. त्याचे अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे स्वतःचे फार्म हाऊस आहे यावरचे रिलही भरपूर व्हायरल झाले. अक्षय खन्ना चक्क ट्रेडिंगवर आहे. काळ बदलला, लोकप्रियता दिसण्याची, गाजण्याची माध्यमे बदलली. आज आपण ग्लोबल युगातील डिजिटल पिढीत वावरतोय. विशेष उल्लेखनीय गोष्ट, अक्षय खन्नाचा पहिला चित्रपट ‘हिमालयपुत्र’च्या डलहौसी येथील चित्रीकरणाच्या वेळेस मुंबईतील आम्हा आठ निवडक सिनेपत्रकाराचा विशेष दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यात मराठीतील मी एकमेव होतो. त्यावेळी अक्षय खन्नाच्या भेटीचा सुखद योग आला. मला आजही आठवतेय, विनोद खन्ना पटकन म्हणाले, “उसको पहले हिंदी सिखनी होगी”… डलहौसी दौऱ्यातील माझ्या मनात आठवणी अनेक. १९९४ च्या डिसेंबरमध्ये आमचा हा दौरा झाला होता…. विनोद खन्ना निर्मित आणि पंकज पराशर दिग्दर्शित हा चित्रपट फार रखडून पडद्यावर आला…

आज अक्षय खन्नाच्या कमबॅकच्या वातावरणात मला त्याचा पिता विनोद खन्नाचा कमबॅक आठवतोय. विनोद खन्ना म्हणजे चित्रपटसृष्टी आणि त्याच चित्रपटसृष्टीत कायमच भटकंती करीत असलेल्या आम्हा सिनेपत्रकारांसाठीचा व्हीके. याच शॉर्ट फॉर्मने तो जास्त ओळखला जाई. व्हीके एकदम हॅन्डसम पर्सनॅलिटीचा देखणा अभिनेता. प्रत्यक्षात असो वा पडद्यावर असो, त्याला चालताना पाहावे, त्याची चाल डौलदार होती. त्यात कमालीचा आत्मविश्वास दिसे. मिडियात असल्यानेच गुलजार दिग्दर्शित ‘लेकिन’ चित्रपटाचा परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओतील मुहूर्त, मुकुल आनंद दिग्दर्शित ‘इन्साफ’ आणि ‘महासंग्राम’, कल्पतरु दिग्दर्शित ‘हमशकल’, रणजित दिग्दर्शित ‘कारनामा’ या चित्रपटांच्या सेटवर शूटींग रिपोर्टीगसाठी जाण्याचा सुखद योग असो, विनोद खन्ना लाईव्ह अनुभवलाय.

सेटवर तो उशीरा येई, पण तो येताच सेटवरचे वातावरण बदलून जाई. स्टार होता हो तो ऐसा. सत्तरच्या दशकात तर त्याची विलक्षण क्रेझ होती. त्याचा स्वतःचा मोठाच चाहतावर्ग होता. त्याना तर विनोद खन्ना अमिताभ बच्चनपेक्षा जास्त आवडे. विशेषतः गॉसिप्स मॅगझिनमधून या दोघांची तुलना केली जाई. दोघं एकमेकांच्या तोडीसतोड. याच काळात त्याचे आपली पत्नी गीतांजली हिच्याशी पटत नाही आणि तो आचार्य रजनीश भक्तीत रममाण झाल्याचेही गॉसिप गाजलं. या दोन्ही गोष्टी खाजगी. पण सेलिब्रिटी शिंकला अथवा त्याने जांभई दिली तरी त्याची बातमी होते तेथे पत्नीशी वाद आणि मनःशांतीसाठी रजनीश आश्रम या गोष्टी फार गाजल्या आणि अशातच एके दिवशी व्हीके चित्रपटसृष्टीतून बाजूला झाला आणि रजनीश भक्तीत रममाण झाला. त्याची भूमिका असलेल्या संदीप सेठी दिग्दर्शित ‘शत्रूता’ (नायिका रेखा) वगैरे चित्रपट पुरते लटकले. ‘गल्ला पेटी’वर लोकप्रिय असलेला हिरो असा ग्लॅमर दुनियेपासून दूर जातो हा जणू सांस्कृतिक धक्काच.

सत्तरच्या दशकातील त्याचे अनेक चित्रपट मॅटीनी शोला प्रदर्शित होत असल्याने तो आता ऐंशीच्या दशकात प्रेक्षकांसमोर होता. एका पिढीतील चित्रपट पुढील पिढीलाही आकर्षित करीत असतातच. अशातच ऐंशीच्या दशकाच्या मध्यास व्हीके चित्रपटसृष्टीत परतला. आता आवश्यकता होती ती त्याला निर्माता आणि दिग्दर्शकांनी करारबद्ध करून त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि त्याला चित्रपटसृष्टीत बिझी ठेवणं. रणजितने मध्यंतरी मला एका मुलाखतीत सांगितले, “व्हीकेने कमबॅक करताच आम्ही सगळेच मित्र सुखावलो आणि त्याला चित्रपटात असा काही बिझी केला की त्याच्याकडे बरेच दिवस तारखाच शिल्लक नव्हत्या”. व्हीकेने मुकुल आनंद दिग्दर्शित ‘इन्साफ’, राज एन्. सिप्पी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’, महेश भट्ट दिग्दर्शित ‘मार्ग’, रणजित दिग्दर्शित ‘कारनामा’, फिरोज खान दिग्दर्शित ‘दयावान’, गुलजार दिग्दर्शित ‘लेकिन’ असे चित्रपट एकामागोमाग एक स्वीकारले आणि त्याचा कमबॅक सुकर झाला.

यातील रणजित दिग्दर्शित ‘कारनामा’ या चित्रपटाचे खोपोली येथील रणजितच्या फार्म हाऊसवर चित्रीकरण असताना मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकाराना शूटींग रिपोर्टीगसाठी खास आमंत्रित करण्यात आले होते. यातील ‘इन्साफ’ सर्वप्रथम प्रदर्शित होत सुपरहिट ठरला आणि पुढच्याच शुक्रवारी ‘सत्यमेव जयते’ पडद्यावर आला. व्हीकेच्या फॅन्सनी त्याचेही स्वागत केले. व्हीकेने पुनरागमनात अनेक चित्रपट स्वीकारत आपलं पूर्वीचे स्थान पुन्हा पटकावले. अर्थात त्यासाठी कसून मेहनत घेतली, या सेटवरुन त्या सेटवर पोहोचला, स्वतःला फिट्ट ठेवले, स्वतःला सिद्धदेखिल केले. आपलं नाणं खणखणीत आहे हे पुन्हा दाखवून दिले.
================================
हे देखील वाचा : Bollywood Celebrity : कलाकाराचा मृत्यू …. कधी खेळ मांडला, कधी गांभीर्य
================================
अक्षय खन्नाने अगदी मोजके चित्रपट स्वीकारत आपली भूमिका चोख बजावली. हे जास्त आव्हानात्मक. त्यानेही स्वतःला एकदम फिट्ट ठेवले, व्हीलन साकारण्यात जास्त आव्हान असते आणि ते पेललं तर सगळीकडेच व्वा व्वा व्वा हे सिद्धही केले. ‘ताल’, ‘दिल चाहता है’ अशा काही चित्रपटांत त्याने लक्ष वेधून घेतले होते पण त्याचं अस्तित्व जाणवू लागले, त्याचं भारी कौतुक होऊ लागले ते छावा, धुरंदर अशा महामनोरंजक सुपर डुपर हिट चित्रपटापासून…. प्रत्येकाचा कमबॅक वेगळा असतो हेच खरे. खन्ना असला तरी पुत्राचा वेगळा आणि पित्याचा कमबॅक वेगळा असतो…. आणि असेच असायला हवे. तर गोष्ट वेगळी ठरते.