
‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’मध्ये Nirmiti Sawant-Prarthana Behre झळकणार सासू-सुनेच्या भूमिकेत
बऱ्याच दिवसांपासून ज्या चित्रपटाची आणि त्यातील कलाकारांची चर्चा सुरु होती त्या ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटातील स्टारकास्ट अखेर रिव्हील करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरने या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. पाठमोऱ्या दिसणाऱ्या सासू-सुनेच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण केला होता, तो म्हणजे ही जोडी नेमकी कोणाची? आणि आता या प्रश्नाचं उत्तर देत, मनोरंजनाची पूर्ण तयारी करत चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रार्थना बेहरे आणि निर्मिती सावंत एकत्र पडद्यावर झळकणार असून, सासू-सुनेची एक हटके, ताकदवान आणि तितकीच खमंग जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे . टीझरमध्येच दोघींची जुगलबंदी, टोमणे, मिश्किल संवाद आणि भावनिक क्षण यांचा सुरेख मेळ पाहायला मिळतोय. प्रार्थना बेहरे आधुनिक, आत्मविश्वासू आणि स्पष्टवक्ती सून म्हणून दिसत आहे, तर निर्मिती सावंत पारंपरिक, ठाम मतांच्या आणि अनुभवसंपन्न सासूबाईंच्या भूमिकेत लक्ष वेधून घेत आहेत. (Marathi Movie 2026)

दोन पिढ्या, दोन विचारधारा आणि दोन कणखर स्त्रिया यांच्यातील नात्याचं गोड–तिखट, हलकंफुलकं तरीही अर्थपूर्ण चित्रण या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे. समाजात नेहमी म्हटलं जातं की, ”प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते”, परंतु एका स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री ठामपणे उभी राहिली तर, ती नाती किती बळकट होऊ शकतात, हाच विचार हा चित्रपट अतिशय सहज आणि प्रभावीपणे मांडतो.
दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, ” ही कथा आजच्या काळातील सासू–सुनेच्या नात्याची आहे. दोघीही स्वतंत्र विचारांच्या आहेत, स्वतःच्या मतांवर ठाम आहेत. त्यामुळे मतभेद होतात, नोकझोक होते, परंतु त्याचबरोबर दोघींच्या समजूतदारपणाची आणि त्यांच्या तरल नात्याची सुंदर कहाणी यात आहे. सासू आणि सून एकमेकींच्या आयुष्यात आधार बनू शकतात, ही भावना या चित्रपटाचा गाभा आहे.” (Kedar Shinde Movies)
================================
हे देखील वाचा : Suraj Chavan : ‘झापुक झुपूक’ बायोपिक आहे का?; केदार शिंदेंचा मोठा खुलासा
================================
कधी हसवणारी तर कधी मनाला भिडणारी आणि आजच्या काळातील सासू सुनेच्या नात्यातील बंध उलगडणारी ही कथा, दोन पिढ्यातील स्त्रियांच्या नातेसंबंधाचं सामर्थ्य अधोरेखित करते. झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई !काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सना शिंदे, उमेश कुमार बन्सल यांची निर्मिती आहे. १६ जानेवारी २०२६ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi