Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

Ankhen: भारतातील पहिला गाजलेला ॲक्शन पॅक्ड थ्रिलर स्पाय सिनेमा
निर्माता दिग्दर्शक रामानंद सागर १९६५ सालच्या ‘आरजू’ या यशस्वी चित्रपटानंतर नव्या चित्रपटाची आखणी करत होते. ‘आरजू’ हा रोमॅंटीक चित्रपट होता. राजेंद्र कुमार, साधना, फिरोज खान अभिनित या चित्रपटाने त्या वर्षी प्रचंड मोठे यश मिळवले होते. आता मात्र रामानंद सागर यांना ॲक्शन पॅक्ड थ्रिलर स्पाय मुव्ही बनवायची होती. कथा त्यांनीच लिहिली होती. या चित्रपटात नायक म्हणून त्यांच्या डोक्यात राजकुमार होता. कथा जबरदस्त होती. नायक डॅशिंग हवा होता राजकुमारसाठी हा रोल परफेक्ट होता. पण राजकुमारने हा रोल नाकारला. नुसता नाकारला नाही तर रामानंद सागर यांचा अपमान देखील त्याने केला. राजकुमार यांची वक्तव्य आणि त्यांची कृती ही कायमच चर्चेत राहायची. या चित्रपटाच्या वेळी असेच झाले रामानंद सागर आपल्या सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन राजकुमार यांना भेटायला गेले.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
================================
राजकुमार यांनी रामानंद सागर यांच्यासोबत यापूर्वी ‘पैगांम’ या चित्रपटात काम केले होते. रामानंद सागर यांना खात्री होती की ही कथा त्यांना नक्की आवडेल. सुरुवातीला राजकुमार यांनी शांतपणे ती कथा ऐकून घेतली आणि नंतर त्यांना काय लहर आली कळाले नाही. ही कथा ऐकताना त्यांचा लाडका कुत्रा त्यांच्या जवळच बसला होता. कथा पूर्ण ऐकल्यानंतर राजकुमारने आपल्या कुत्र्याला विचारले ,”तुला ही कथा आवडली का? तू या चित्रपटात काम करशील का?” कुत्र्याने नकारार्थी मान हलवली. राजकुमार रामानंद सागर यांना म्हणाला ,”बघा, माझा कुत्रा देखील या चित्रपटात काम करायला तयार नाही मग मी कसा करू शकेल?” रामानंद सागर शांतपणे उठले आपली स्क्रिप्ट घेतली आणि निघून गेले. राजकुमारच्या या अशा तऱ्हेवाईक वागण्याची ही कथा समाज माध्यमावर आजही खूप फिरताना दिसते. यात तथ्याचा भाग किती माहिती नाही पण राजकुमारला रामानंद सागर या सिनेमासाठी अप्रोच झाले होते हे नक्की.

यानंतर रामानंद सागर यांनी हे कथानक धर्मेंद्र यांना ऐकवले आणि तो लगेच तयार झाला चित्रपटाचं नाव ठरले ‘आँखें’. हा चित्रपट भारतातील पहिला गाजलेला स्पाय सिनेमा होता. कथानक जबरदस्त होते. स्वातंत्र्यानंतर भारताच्या पूर्वेकडे राज्यांमध्ये अतिरेकी कारवाया वाढल्या होत्या. भारताच्या अनेक भागांमध्ये हिंसाचार देखील होत होता. यामागे परकीय शक्ती आहेत याची सरकारला खात्री होती. याचा शोध घेण्यासाठी सरकारने आपल्या इंटेलिजन्स ब्युरो कडून काही गुप्तहेर दुसऱ्या देशात पाठवले होते. हाच प्लॉट घेवून रामानंद सागर यांनी कथानक लिहिले होते. या सिनेमाचा होतो सिनेमाचे बरेचसे कथानक बैरुत येथे घडते. चित्रपटात धर्मेंद्रची नायिका माला सिन्हा होती धर्मेंद्रचा यात जबरदस्त डॅशिंग रोल केला होता. माला सिन्हा देखील कुठेच कमी नव्हती. आंतरराष्ट्रीय कुटिल राजकारण, तिथल्या कुरबुरी, भारताला कमजोर करण्याचा कट आणि त्याला आपल्या इंटेलिजन्स ने दिलेला शह हे जबरदस्त कथानक प्रेक्षकांना देखील खूप आवडले.

या चित्रपटातील गाणी साहीर लुधियानवी यांनी लिहिली होती. तर संगीत रवी यांचे होते. ‘मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी’, ‘गैरो पे करम अपनों पे सितम ऐ जाने वफा ये जुर्म ना कर’ हे लताची गाणी जबरदस्त होती. यात नायकाच्या तोंडी एकही गाणे नव्हते. रफीच्या स्वरातील ‘उस की मुल्क सरहद को कोई छू नही सकता जिस मुल्क की सरहद की निगे बान है आंखे ‘ हे गाणं टायटल च्या वेळी पार्श्वभूमीवर होते. मेहमूद ने ‘दे दाता के नाम तुझको अल्ला रखे ..’ या गाण्यात धमाल आणली होती.
================================
हे देखील वाचा : प्लेबॅकसाठी Kishore Kumar यांच्याच नावाचा आग्रह पंचम यांनी का धरला होता?
================================
20 सप्टेंबर 1968 या दिवशी ‘आँखें’ प्रदर्शित झाला आणि सुपरहिट झाला. अवघ्या ऐंशी लाखात बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या रिलीजला तीन कोटी वीस लाखाचा बिजनेस केला. 1968 सालचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट म्हणून या सिनेमाची नोंद झाली. हा चित्रपट नाकारला याची खंत राजकुमार यांना कायम वाटत राहिली . खरंतर राजकुमार यांनी नाकारलेले सर्वच चित्रपट पुढे सुपरहिट झाले याचे आणखी एक उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन यांचा ‘जंजीर’. ‘आँखें’ या चित्रपटाला तब्बल सात फिल्म नामांकन मिळाली होती पैकी दिग्दर्शक रामानंद सागर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले!