
New Year 2026 : सबको मुबारक नया साल…
आज १ जानेवारी २०२६ ! नवीन वर्षांचा पहिला दिवस . आपल्या सर्व वाचकांना हे नूतन वर्ष आनंदाचे, सौख्याचे आणि भरभराटी चे जावो हीच शुभ कामना. आपल्या हिन्दी सिनेमात नवीन वर्षाच्या स्वागताची खूप कमी गाणी आहेत. पण पहिल्या तारखेच्या गाण्याची जादू आजही कायम आहे. रेडिओ सिलोनने दोन गोष्टींचा पायंडा कित्येक वर्ष मोडला नाही. एक म्हणजे दररोज सकाळी सात वाजून सत्तावन मिनिटांना लागणारे सैगलचे गीत आणि दर महिन्याच्या पहिल्या तारखेला लागणारे ’दिन हैं सुहाना आज पहली तारीख है’ हे किशोरकुमारचे गीत!
किशोरच्या या गीताचा किस्सा मनोरंजक आहे. हे गाणे ज्या सिनेमात होते तो सिनेमा मराठी कलावंत राजा नेने यांच्या प्रॉडक्शन हाऊसचा १९५४ साली आलेला ’पहली तारीख’ हा होता. सिनेमाचे दिग्दर्शक व नायक राजा नेने होते. हा तो काळ होता ज्या वेळी कष्टकरी समाजाला महिनाभर प्रचंड हार्ड वर्क केल्यानंतर हार्ड कश पगार मिअलात असे. त्या काळात सबंध भारतात प्रत्येक घरात कमावणारा एक आणि खाणारी तोंडे अनेक असे विषम चित्र होते. त्या मुळे एक तारखेला मिळणाऱ्या पगाराचे सर्व कुटुंबियांना मोठे अप्रूप असायचे. खरं तर या सिनेमात नोकरदार पुरुषाची कुचंबना दाखवायची होती. पण हि तारेवरची कसरत दाखविताना दिग्दर्शक राजा नेने यांनी विनोदाचा आधार घेतला.

सिनेमात हे गाणं हास्य कलाकार मारूती यांच्यावर चित्रित होणार होतं. पुण्याच्या डेक्कन स्टुडिओत या संपूर्ण सिनेमाचे शूटींग झाले होते. सिनेमाचे कथानक अगदी साधे सरळ होते.नोकरी करणार्या व्यक्तीच्या हातात एक तारखेला पगार पडतो पण महागाई, कुटुंबाचा भार, कर्ज यामुळे लगेच संपून ही जातो. पुन्हा सुरू होतो एक तारखेचा इंतजार. गीतकार कमर जलालाबादी यांनी सुरूवातीला हे गाणं गंभीरतेच्या वळणावर जाणारं लिहिलं होतं.पण किशोर कुमार यांनी या गाण्याला वेगळं वळण द्यावं असं सुचविलं.या कामी दादामुनी यांनी ही गीतातील गंभीर भावना काढून त्या जागी खेळकर पणा आणायचा सल्ला दिला.गीतकाराने मग दोनही भावना ठेवत गाणं दोन भागात लिहिलं.
एका भागात सिनेमातील नायक नायिकांची नाव जोडत (नर्गीस राजकपूर है दिलीप कुमार है निम्मी गीताबाली है अशोककुमार है!) त्या काळातील पिढीवर सिनेमाचा असलेला प्रभाव दाखविला. तसेच एक तारखेला सिनेमाचा होणारा काळाबाजार सांगण्यासाठी ‘पाच आनेका दस आणा अरे वापस नही जाना आज पहली तारीख है…. या ओळी जोडल्या होत्या. या दोन भागातील गाण्याला तब्बल सहा कडवी आहेत. रेडीओ सिलोनवर प्रत्येक एक तारखेला यातील दोन्ही भागातील गाणे ऐकवले जाई. दुसर्या भागात ’बंदा बेकार है किस्मत कि मार है…’ म्हणत याही भावना व्यक्त केल्या.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
किशोरने त्याच्या खास स्टाईल मध्ये गाणं गायलं व एका टेक मध्ये ध्वनीमुद्रीत ही झालं या गाण्याला संगीत होतं सुधीर फडके यांच! फडक्यांच्या एकूण संगीत प्रकृतीला छेद देणारं असं हे गाणं होतं.( हे म्हणजे सुनील गावस्कर सारख्या शास्त्रशुध्द खेळी साठी प्रसिध्द असणाऱ्या फलंदाजाने अचानक एम एस धोनी सारखी धुआंधार फलंदाजी केल्यासारखे होते! ) अशा लाईट मूडचे गाणे त्यांनी परत कधी केल्याचे दिसत नाही. हे गाणं आधी सी रामचंद्र यांनी गावं अशी इच्छा राजा नेनेंची होती पण हि कल्पना मागे पडली अशी आठवण राजा नेनेंची कन्या अनुपमा देशमुख (ज्यांनी या सिनेमात बाल कलाकाराची भूमिका केली होती.) यांनी सांगितली होती.