
Bollywood लाही जमलं नाही ते मराठी मातीतल्या अहिराणी गाण्यांनी करुन दाखवलं!
तुम्ही ‘रस प्यायला ये म्हटलं माय’ हे गाणं ऐकलंय ना? हो, तेच गाणं, ज्यामुळे अहिराणी गाण्यांनी संपूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. मध्यंतरी इंस्टावर तुमचं फीड याच गाण्याने भरलं असेल आणि याचं मेन रिझन म्हणजे त्यात असलेली तृतीयपंती कलाकार मोगरा पवार आणि गाण्याचे हिट लिरिक्स. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? केवळ हे एक गाणं नाही, त्याआधीपासूनच अहिराणी म्युझिक इंडस्ट्रीत मोठी क्रांती सुरू झाली होती. जे बॉलिवूडलाही जमलं नाही ते मराठी मातीतल्या या अहिराणी गाण्यांनी करुन दाखवलंय !
तसं पाहिलं तर बॉलिवूड आणि पंजाबी गाण्यांचा दबदबा फार पूर्वीपासूनच होता. मग साऊथच्याही गाण्यांचाही बोलबाला झाला. त्यामुळे दर्जेदार गाणी असूनही मराठी म्युझिक इंडस्ट्री यात मागे पडत होती. पण याच्या पलीकडे एक छोटी, पण दमदार गाण्यांची इंडस्ट्री उभी राहिली आणि ती म्हणजे अहिराणी म्युझिक इंडस्ट्री! या अहिराणी भाषेला हजारो वर्षाचा इतिहास आहे. बहिणाबाई चौधरीमुळे त्या भाषेला खरी ओळख मिळाली. आज सुद्धा ही भाषा बिहार, राजस्थान, सौराष्ट्र, उत्तर प्रदेश या भागात बोलली जाते. पण जेव्हा अहिराणी भाषिक गाणी मार्केटमध्ये आली तेव्हा बाकी सगळ्या भाषिक गाण्यांची हवा अहिराणी भाषिकांनी काढून घेतली. इकस केसावर फुगे, चैत्र महिना मा, खानदेशी रॅप, देख तुनी बायको यासारखी 20/25ं अहिराणी गाणी फेमस झाली. काही गाण्यांनी मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळवले. ‘हाई झुमका वाली पोर हाई नदी थडी ले चालनी’ या गाण्याने तर यूट्यूबवर अक्षरशः धुमाकूळ घातला.

पण तुम्ही कधी विचार केलं आहे का, की ही अहिराणी गाणी इतकी व्हायरल कशी होतायत? याचं उत्तर खूप साधं आहे. अहिराणी गाण्यांमध्ये Rawness आहे, गावरान शैली आहे. कुठेही बडेजाव नाही, इथे जे आहे ते तसंच प्रेझेंट केल जातं. त्यात असलेले लोकल शब्द, गावातील परिसर, त्या परिसरातील लोक आणि त्यांचा सहभाग हे सगळं एकदम रिअल आहे. शिवाय त्यांनी तयार केलेलं म्युझिक, या म्युझिकमधला रिदम अनेकांना ठेका धारायला लावतोय. हा रिदम या गाण्याचा आत्मा आहे .ही गाणी हिट होण्याचं आणखी एक कारण म्हणजे या गाण्यांचे लिरीक्स खूप रिअॅलिस्टिक वाटतात आणि त्यात बॉलिवूडच्या गाण्यांमध्ये जसा कोरस डान्स असतो तसाच बनवण्याचा प्रयत्न केला जातो म्हणूनच ही गाणी इतकी व्हायरल होतात आणि लोकांच लक्ष वेधून घेतात.
================================
हे देखील वाचा : Dharmaveer 2 मधील शिवरायांची ‘ती’ फ्रेम खास का आहे?
================================
अहिराणी गाणी म्हणजे फक्त मनोरंजन नाही, तर उत्तर महाराष्ट्राच्या खानदेशी संस्कृतीची खरी झलक आहे. बरं ही गाणी आताच फेमस होतायत असंही नाही. पूर्वी ही गाणी गावांत ढोलकी-ताशावर गायली जायची. मग ९०च्या दशकात काही लोककवी, गायकांनी कॅसेट्स बनवायला सुरुवात केली. रामदास कोर्हाळकर, प्रकाश सोनवणे, शिवाजीराव वाघ यांसारख्या कलाकारांनी अहिराणी गाणी घराघरात पोहोचवली आणि आज युट्यूबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची साथ मिळाल्यामुळे सचिन कुमावत, विनोद कुमावत, साईनाथ लोखंडे, संजय पाटील, भावना साटम यांसारखे नव्या दमाचे कलाकार सर्वांसमोर येतायत आणि कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतायत. त्यामुळे गावातला कलाकार आज लाखोंच्या मोबाईलमध्ये दिसतो हीच खरी क्रांती आहे. थोडक्यात काय तर आपल्या अहिराणी गाण्यांनी इतिहास घडवला, आणि आता सोशल मीडियावर ती गाणी धुमाकूळ घालतायत.
-श्रेया अरुण