
Bigg Boss Marathi 6: ८०० खिडक्या ९०० दारं; बिग बॉस मराठीच आलिशान घर पाहिलं का?
प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा क्षण अखेर आला आहे. ‘Bigg Boss Marathi ’च्या नव्या सीझनचं काऊंटडाऊन संपत असून, आजपासून हा बहुचर्चित रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शो सुरू होण्याआधीच कलर्स मराठीने बिग बॉसच्या भव्य घराची पहिली झलक समोर आणली असून, ती पाहून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून “यंदाचं घर कसं असेल?” याबाबत चर्चा रंगत होती आणि अखेर हे रहस्य उलगडलं आहे. यंदाचं बिग बॉसचं घर केवळ आकाराने मोठं नाही, तर रचनेत आणि संकल्पनेतही पूर्णपणे वेगळं आहे.

या घरात प्रवेश करताच गार्डन एरिया, बाल्कनी, प्रशस्त लिव्हिंग रूम, सुसज्ज किचन, वॉशरूम परिसर, बेडरूम, कॅप्टन रूम यांसह जिम आणि स्विमिंग पूलसाठी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. बाहेरून हे घर एखाद्या आलिशान रिसॉर्टसारखं भासत असलं, तरी आतमध्ये शांतता टिकेल, याची खात्री मात्र नाही. कारण इथे प्रत्येक कोपऱ्यातून वाद, रणनीती आणि ड्रामाच उफाळून येणार आहे.(Bigg Boss Marathi 6)

यंदाच्या सीझनमध्ये बेडरूम हा सगळ्यात चर्चेचा विषय ठरणार, असं दिसतंय. कारण पहिल्यांदाच बिग बॉस मराठीच्या घरात बंक बेड्सची एंट्री झाली आहे. वरचा बेड कोण घेणार? खाली झोपणाऱ्याला जास्त सोय मिळणार का? सामान ठेवायचं नेमकं कुठे? या सगळ्या प्रश्नांमुळे घरात प्रवेश करताच वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या बंक बेड्समुळे बेडरूममध्ये काय सुरू आहे, हे प्रत्येकाच्या नजरेस पडणार असून, कोणाचंही खासगीपण उरणार नाही. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यंदाच्या सीझनमधील आणखी एक अनोखा प्रयोग म्हणजे ‘टेलिफोन’ नावाची खास स्टोअर रूम. बिग बॉस मराठीच्या इतिहासात याआधी असा प्रयोग कधीच पाहायला मिळाला नव्हता. या खोलीत प्रत्यक्षात फोन असणार आहे की फक्त स्पर्धकांची दिशाभूल करण्यासाठी हा सगळा प्रकार आहे, याबाबत सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. हा फोन संवाद साधण्यासाठी वापरला जाणार की घरात वाद आणि गैरसमज वाढवण्यासाठी, याचं उत्तर येणाऱ्या भागांतूनच समोर येणार आहे.

घराच्या सजावटीकडे पाहिलं, तर तब्बल 800 खिडक्या आणि 900 दारांनी सजलेलं हे घर पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल. प्रत्येक कोपरा भव्य आणि रंगीबेरंगी ठेवण्यात आला आहे. कॅप्टन रूमला खास राजेशाही लूक देण्यात आला असून, दर आठवड्याला जो स्पर्धक कॅप्टन बनेल, त्यालाच या आलिशान खोलीत राहण्याचा मान मिळणार आहे. अर्थात, ही सोय जितकी आकर्षक आहे, तितकीच ती इतर स्पर्धकांच्या मनात असूया आणि स्पर्धा वाढवणारी ठरणार आहे.(Bigg Boss Marathi 6)
=============================
=============================
दरम्यान, आज 11 जानेवारीपासून ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू होत असून, घराचं दार उघडताच कोणते नवे ट्विस्ट समोर येतील, कोणते वाद पेटतील आणि किती ड्रामा रंगेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा या शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार असून, दररोज रात्री 8 वाजता हा शो प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.

एकंदरीत पाहता, यंदाचा ‘बिग बॉस मराठी’ म्हणजे लक्झरी, रणनीती, वाद आणि मनोरंजन यांचा जबरदस्त संगम असणार आहे. त्यामुळे हा सीझन नक्कीच प्रेक्षकांच्या लक्षात राहील, यात शंका नाही.