
Aandhi चित्रपटाच्या रिलीजला ५१ वर्ष पूर्ण; राजकारण बदलले पण चित्रपटाचा क्लास कायम!
चित्रपटाचे संवाद कधी खूपच अर्थपूर्ण असतात, बोलके असतात, बोचरे असतात. त्यातच तो संवाद गुलजार यांनी लिहिलेला असेल तर, ‘आंधी’ मधील गुलजार यांचा असाच एक संवाद आहे. तो फारच गाजला. फार बोलका आहे तो संवाद. चित्रपटातील राजकीय पक्षाचा कारभार सांभाळणारा चंद्रसेन ( ओम शिवपुरी) एका वृत्तपत्राच्या संपादकास म्हणतो, इलेक्शन के पहले आप हमारा खयाल रखिये, उसके बाद हम आपका.. या संवादाचा अर्थाअर्थी संबंध जोडायचा का हा वेगळा विषय.
जे. ओम प्रकाश निर्मिती आणि गुलजार दिग्दर्शित ”आंधी ” हा क्लासिक ( आशयपूर्ण ) व व्यावसायिकता ( गल्ला पेटीवरील यश) यांचा सुवर्ण मध्य गाठणार चित्रपट. राजकीय पत्रकार याकडे आजही राजकीयपट म्हणून पाहतात,( नवीन पिढीतील राजकीय पत्रकारांनी हा चित्रपट आवर्जून पहावा. काही वेगळे जाणवेल). राजकीय विश्लेषक या चित्रपटावर आणीबाणीत बंदी घालण्यात आली होती याची आठवण नक्कीच करुन देतात ( तो संदर्भ कायमच चर्चेत असणारा.)
चित्रपट माध्यमाची जाण असणारे गुलजार यांच्या कल्पक दिग्दर्शनाचं विशेष कौतुक करणार (गुलजार दिग्दर्शित चित्रपट हा एक वेगळा पैलू),चित्रपट रसिक याकडे राजकारणाच्या पाश्र्वभूमीवरील परिपक्व ( मॅच्युअर्ड) प्रेमकथा म्हणून पाहतात आणि ते बरोबरच आहे. ‘आंधी’ चित्रपट तेच दाखवतोय. पण कायम चर्चा होत असते ती हा ” राजकीय चित्रपट” आहे अशीच! चित्रपट संगीत शौकीन या चित्रपटातील श्रवणीय गाणी एव्हाना गुणगुणायला लागले असणारच, काहींनी ती ऐकायला घेतली असणार. फिल्मी गाॅसिप्समधून विशेष रस घेणारे या चित्रपटाच्या काश्मिरमधील चित्रीकरणाच्या वेळेस झालेली एक गोष्ट रंगवून सांगणार.
फिल्म क्राफ्ट या निर्मिती संस्थेचा ‘आंधी ‘ ( रिलीज गुरुवार १३ फेब्रुवारी १९७५ मुंबईत मेट्रो थिएटर…१४ फेब्रुवारीपासून मुंबई व उपनगरात)च्या प्रदर्शनास यशस्वी एकावन्न वर्षे पूर्ण होत आहेत. काळ बदलला, राजकारण केवढे तरी बदलले. तरी या चित्रपटाचा ताजेपणा मात्र आजही कायम आहे आणि ते फारच महत्वाचे आहे. १९७५ हे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, माध्यम क्षेत्रासाठीचे अतिशय महत्वाचे वर्ष. अनेक घडामोडींचे वर्ष. त्यातील अनेक गोष्टींवर आजही उलटसुलट चर्चा होत असते. इतिहासात डोकावणे ही तर स्वाभाविक गोष्ट.त्यातूनच बरेच काही शिकता येते. आणि चित्रपट इतिहासात हा चित्रपट विशेष उल्लेखनीय.
अतिशय महत्वाकांक्षी राजकीय नेत्या आरतीदेवी ( सुचित्रा सेन) आणि त्यांचे पती जे. के. (संजीवकुमार) यांच्या हळूवार नातेसंबंधाची ही गोष्ट राजकीय चित्रपट म्हणून चर्चेत राहिली. या चित्रपटात संजीवकुमार आणि सुचित्रा सेन यांच्यासह ओम शिवपुरी, मनमोहन, कमलदीप, ए. के. हनगल, हरीश, रणवीर, सी. एस. दुबे इत्यादींच्या भूमिका आहेत. गुलजार दिग्दर्शित चित्रपटात कायमच लहान मोठ्या कलाकारांची नेमकी निवड दिसते. ( तरी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांना कधीच का बरे संधी मिळाली नसावी?
गुलजार हे सुचित्रा सेन नायिका असेल अशा एका वेगळ्याच पटकथेवर निर्माता सोहनलाल कंवर ( बेईमान , पहेचान, संन्यासी इत्यादी चित्रपटांचे निर्माते व दिग्दर्शक) यांच्यासाठी चित्रपट दिग्दर्शित करणार होते. पण सुचित्रा सेनने सुचवलेले बदल गुलजार यांनी अमान्य केले व तो चित्रपट तेथेच थांबला. गुलजार आपल्या कलाकृतीबाबत ठाम असणे विशेष उल्लेखनीय. लेखक कमलेश्वर यांच्याकडे राजकीय नेत्या तारकेश्वरी सिन्हा यांच्या आयुष्यावर आधारित एक गोष्ट होती. गुलजार यांना ती आवडताच त्यांनी व भूषण वनमाली यांनी पटकथा लेखन केले. आणि नाव ठरले, ‘आंधी’. ते इतके आणि असे नेमके ठरले की आज एकावन्न वर्षांनंतरही “ॴधी” असे म्हणताक्षणीच अनेक गोष्टी लगेचच डोळ्यासमोर येतात.

परिचय (१९७२), कोशिश (१९७३) या चित्रपटांच्या वेळेस संजीवकुमारशी गुलजार यांचे सूर जुळल्याने आणि आता त्यांच्याच ‘मौसम’ मध्येही तो भूमिका साकारत असतानाच ‘आंधी’साठी तोच निश्चित होताच. एखाद्या कलाकारावरचा दिग्दर्शकाचा विश्वास खूपच महत्वाचा असतोच. (त्यानंतर गुलजार दिग्दर्शित अंगूर, नमकीन या चित्रपटात संजीवकुमार दिसला. संजीवकुमारने कधीच वयाचे व भूमिकेचे बंधन ठेवले नाही). यातील ‘मौसम’ची निर्मितीमागची गोष्ट वेगळीच. त्या चित्रपटाचे निर्माते मल्लिकार्जुन राव यांना कमलेश्वर यांनी सांगितलेले ‘आंधी’चे कथासूत्र फारसे आवडले नाही. पण ‘मौसम’चे आवडले.
निर्मात्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. १९७५ या एकाच वर्षात गुलजार दिग्दर्शित आंधी, मौसम ( संजीवकुमार, शर्मिला टागोर), व खुशबू (जितेंद्र, हेमा मालिनी, फरिदा जलाल. निर्माता प्रसन्न कपूर. हा जितेंद्रचा भाऊ ) असे तीन भिन्न स्वरुपातील चित्रपट प्रदर्शित झाले हे विशेषच. ‘मेरे अपने ‘पासूनच गुलजार यांनी दिग्दर्शनात विविधता दाखवली… तरीही त्यांनी चित्रपट दिग्दर्शनातून खूप लवकर थांबणे पसंत का केले असेल? नव्वदच्या दशकात वाढत गेलेले स्टारचे नखरे त्यांना मान्य नसावेत. आणि आता चित्रपट निर्मातीही फार महाग होत होत गेली होती.
================================
हे देखील वाचा : NFDC : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची वैशिष्ट्यपूर्ण पन्नाशी….
================================
‘आंधी’तील आरती देवी या भूमिकेसाठी गुलजार यांनी आपणास विचारले होते असे खूप वर्षांनी म्हणजेच २०११ साली वैजयंतीमालाने एका मुलाखतीत भाष्य केले हा सुखद धक्काच. तोपर्यंत या गोष्टीची कधीच चर्चा झाली नव्हती. गुलजार यांनी कोलकात्यात जावून सुचित्रा सेनची भेट घेऊन तिचा “आंधी” साठी होकार मिळवला. वैजयंतीमालानेही ही भूमिका नक्कीच कसदारपणे साकारली असती. आपण एकदा चित्रपटसृष्टीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याने पुनरागमनाची आपणास इच्छा नाही असे वैजयंतीमालाचे म्हणणं होते.
‘आंधी’ची काही दृश्य व गाणी काश्मिरमधील सौंदर्य स्थळावर चित्रीत करण्यात आली. या चित्रीकरण सत्रात राखी गुलजार आपली अगदी छोटी मुलगी मेघना ( बोस्की) हिला घेऊन काश्मिरला गेली. दिवसभराचे शूटिंग संपल्यावर रात्री ‘श्रमपरिहार’ आणि त्यात ‘बाटली फुटणे’ हे स्वाभाविकच. एके रात्री (म्हणे) चित्रपटात घडते अगदी तशीच गोष्ट प्रत्यक्षात घडली असे गाॅसिप्स मॅगझिनमधून बरेच रंगवून रंगवून लिहिले गेले. एका रात्री (म्हणे) पार्टी संपल्यावर संजीवकुमारने सुचित्रा सेनचा हात धरला आणि तो तिला आपल्या खोलीत येण्याचा आग्रह धरत असतानाच गुलजार यांनी सुचित्रा सेनची त्याच्यापासून सुटका केली आणि ते सुचित्रा सेनला तिच्या रुमपर्यंत सोडावयास गेले आणि तेथून परतत असतानाच राखीने त्यांना पाहिले आणि तिचा काही गैरसमज झाला आणि ती प्रचंड रागावली (म्हणे). या सगळ्याचा परिणाम असा झाला की काश्मिरवरुन परतताना ते एकत्र नव्हते. पडद्यामागच्या गोष्टी अशा अनेक आणि रंजकही. डिजिटल युगात त्या फारच रंगवून खूलवून वाढवून समोर येत आहेत.

‘आंधी’ने शंभर दिवसांचे यशही गाठले होते आणि अशातच एक बातमी पसरली. सुचित्रा सेनने साकारलेली भूमिका तात्कालिक पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्यावर बेतली आहे. गुलजार यांनी एका मुलाखतीत भाष्य केले, असे अजिबात नाही. हा गैरसमज आहे. चित्रपट लिहिताना व दिग्दर्शित करताना असा कोणताही विचार नव्हता. गुलजार यांचे म्हणणे काहीसं बाजूला पडले. अशातच गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुक आली आणि त्यात या चित्रपटात एका दृश्यात आरती देवी दारु सेवन करते या दृश्याचा विरोधी पक्षाकडून वापर करण्यात आला. आणीबाणीतील ही गोष्ट. हा चित्रपट निवडणूक आचार संहितेचा भंग करतोय या कारणास्तव या चित्रपटावर बंदी घालण्यात आली.
या चित्रपटाची गीते गुलजार यांनी लिहिली असून संगीत आर. डी. बर्मन यांचे आहे. या चित्रपटातील तेरे बिना जिंदगी से कोई (अनंतनाग), तुम आ गये हो ( परीमहल गार्डन) , इस मोड से जाते है (पहेलगाव) ही काश्मिरमध्ये चित्रीकरण झालेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटाचे मुंबईतील मेन थिएटर मेट्रो होते. ‘आंधी’ दिल्लीत प्रदर्शित होताना पोस्टरवर म्हटले होते, आजाद भारत की एक महान महिला नेता की कहानी… तर हैदराबाद येथील पोस्टरवर म्हटले होते, परदे पर देखिए अपने प्रधानमंत्री को… ( त्या काळात मराठी असो वा हिंदी टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होत.)
================================
हे देखील वाचा : विक्रम भट्टच्या Kasoor चित्रपटाची पंचवीशी….
================================
देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू झाली आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आली. एका कसदार कलाकृतीची कोंडी झाली. प्रसार माध्यमातून याची बरीच उलटसुलट चर्चा झाली. देशात १९७७ साली जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यावर ‘आंधी’ रि-सेन्सॉर करताना काही दृश्ये कापून तो पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. आणिबाणीत गुलजार दिग्दर्शित ‘आंधी’ आणि जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना’ (पुण्यात रिलीज १० जानेवारी १९७५)च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली.
विशेष उल्लेखनीय गोष्ट, मुंबईत १४ फेब्रुवारी १९७५ या एकाच शुक्रवारी ‘आंधी’ व ‘सामना’ (जानेवारीत पुणे शहरात ९ जानेवारीला प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला ‘सामना’ त्यानंतर आता गिरगावातील सेन्ट्रल चित्रपटगृह) हे प्रदर्शित झाले आणि दोन्ही चित्रपट रिपीट रनला म्हणजेच पुन्हा प्रदर्शित झाले. ‘आंधी’ चित्रपट म्हणजे एक सांस्कृतिक सामाजिक वादळच! त्यातील अनेक संवाद हे अतिशय समर्पक आणि बोलके. ती किमया गुलजार यांची!