
Lata Mangeshkar आणि साहिर लुधियानवी यांच्यात का मतभेद झाले होते?
लता मंगेशकर यांचे आपल्या करीयरमध्ये अनेक संगीतकार/ गीतकार यांच्या सोबत मतभेद झाले होते. या मतभेदांच्या प्रश्नावरून लता काही वर्षात त्यांच्यासोबत काम देखील करत नव्हती. संगीतकार ओपी नय्यर यांच्याकडे तर लता मंगेशकर यांनी एक देखील गाणे गायले नाही. संगीतकार सचिन देव बर्मन यांच्यासोबत झालेल्या मतभेदांमुळे लता मंगेशकर ‘सितारो से आगे’(१९५७) या सिनेमा नंतर पुढची तीन-चार वर्ष त्यांच्याकडे गात नव्हती. आणखी एक गीतकार होते ज्यांच्या सोबत लताचे मतभेद झाले होते. हे गीतकार होते साहिर लुधियानवी. या मंतभेदानंतर ते दोघे एकमेकांसोबत काम करत नव्हते.

खरं तर हे दोघे १९५० पासून एकत्र काम करत होते. अगदी सुरुवातीपासून एकत्र काम करत होते. ‘ठंडी हवाये लहराके आये’ (नौजवान), ‘पिघला है सोना’ (जाल), ‘फैली हुयी है सपनो की बाहे’ (घर नं ४४), ‘तुम न जाने किस जहां में खो गये’ (सजा), पण पन्नासच्या दशकाच्या मध्यावर एक निर्माता लताच्या स्वराची स्तुती करता ना साहिर समोर बरळून गेला. तो म्हणाला की, “साहिर साब आपकी शायरी तो बेजान होती है जब तक लता उसे अपने आवाज से जिंदा न कर दे!”. स्वाभिमानी आणि प्रतिभावंत साहिर यांना हा खूप मोठा अपमान वाटला. आपली शायरी आपले शब्द हे कुणाच्यातरी स्वरामुळे जर जिवंत होत असतील तर असल्या शायरीला काय अर्थ आहे असे त्यांना मनोमन वाटले. आणि त्यांनी तिथल्या तिथे एक प्रण केला की “जो पर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत माझी गाणी लता मंगेशकर गाणार नाहीत. लता शिवाय मी माझी लोकप्रिय करून दाखविणार!” आणि पुढची काही वर्षे खरोखरच साहिर यांची गाणी लता मंगेशकर गात नव्हत्या.

साहिर निर्माता आणि संगीतकारांना तसे आधीच सांगत होता की माझी गाणी लता मंगेशकर गाणार नाहीत. या काळात साहिरच्या गीतांनी नटलेले अनेक चित्रपट आले. ‘चंद्रकांता’, ‘लाईट हाऊस’ (एन दत्ता), ‘फंटूश’ (एस डी) ….. या दोघांच्या एकत्र काम न करण्याने भारतीय संगीताचं मात्र मोठं नुकसान होऊ लागलं. कारण तो भारतीय चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ होता. या काळात साहिर यांचे तीन महत्त्वकांक्षी चित्रपट प्रदर्शित झाले होते. ‘फिर सुबह होगी’, ‘नया दौर’ आणि ‘प्यासा’ या तीनही चित्रपटांमध्ये लताचे एक देखील गाणे नव्हते. ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटाला संगीत खय्याम यांचे होते. ‘नया दौर’ या चित्रपटाला संगीत ओपी यांचे होते, तर ‘प्यासा’ हा चित्रपट सचिन देव बर्मन यांनी स्वरबद्ध केला होता. हे तिन्ही चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर साहिर यांनी सिद्ध करून दाखवले की त्यांची शायरी कुठल्या एका आवाजाची ‘मोहताज’ नाही!! त्यानंतर मात्र १९५८ सालच्या ‘साधना’ या सिनेमापासून लता मंगेशकर आणि साहिर पुन्हा एकत्र आले. या सिनेमाचे संगीतकार होते एन दत्ता. या सिनेमाची सर्वच गाणी अतिशय मार्मिक, काळजाला घर करणारी होती.
================================
हे देखील वाचा : साहिर लुधियानवी यांच्यामुळे मिळाली गीतकारांना स्वतंत्र ओळख!
================================
सर्वात गाजले ‘औरंत ने जन्म दिया मर्दो को मर्दो ने उसे बाजार दिया..’ यानंतर मात्र ही जोडी अबाधित राहिली. लाटणे साहिर च्या लेखणी तून उतरलेली १६० गाणी गायली! यानंतर च्या काळातील या दोघांची लोकप्रिय गाणी, ‘इंतजार और अभी’ (चार दिल चार राहे), ‘मै तेरे प्यार का फूल हू’ (धूल का फूल), ‘अल्ला तेरो नाम’ (हम दोनो), ‘नदी नारे न जाओ श्याम पैया पडू’ (मुझे जीने दो), ‘संसार से भागे फिरते हो’ (चित्रलेखा), ‘नगमा ओ शेर की बारात’ (गजल), ‘मिलती है जिंदगी मे मुहोब्बत’ (आंखे), ‘चला भी आ’ (मन की आंखे), ‘एक चेहरे पे कई चेहरे’ (दाग), ‘कोई पत्थर से ना मारे’ (लैला मजनू), ‘ये आंखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है’ (धनवान).