
Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा प्रवास!
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पंधरा दिवस आधी या अभिनेत्रीचा जन्म झाला. बालपण अतिशय कष्टा मध्ये गेलं. सिनेमात आल्या नंतर सुरुवातीची दहा वर्ष प्रचंड स्ट्रगल करण्यामध्ये गेली. बी ग्रेड सिनेमाची ती नायिका म्हणत तिला हिणवले गेले! पण नंतर तिच्या आयुष्यात एक ‘सुहाना मोड’ आला आणि ती सुपरस्टार बनली. सत्तर च्या दशकात ती सेक्स सिंबॉल सोबतच स्टाईल आय कॉन बनली होती. तिची घट्ट साडी नेसण्याची प्रचंड लोकप्रिय झाली होती. ही अभिनेत्री होती मुमताज. 31 जुलै 1947 या दिवशी तिचा हैद्राबाद येथे जन्म झाला. तिचं लहानपण खूप कष्टप्रद होतं. तिच्या आईने घटस्फोट घेतला त्या वेळी मुमताज अवघ्या एक वर्षाची होती. अगदी लहान वयात मुमताज ने चेहऱ्याला रंग लावला आणि सिनेमांमध्ये काम करू लागली.
सोने की चिडिया, लाजवंती (१९५८) नंतर तिला चाइल्ड आर्टिस्ट म्हणून बरेच चित्रपट मिळाले या काळात तिने बहिणीच्या , नायिकेच्या मैत्रिणीच्या भूमिका केल्या. व्ही शांताराम यांनी तिला आपल्या स्त्री , सेहरा या सिनेमात भूमिका दिल्या. सोळाव्या वर्षी १९६३ साली तिला दारासिंग सोबत एका सिनेमासाठी साइन केले. (मुमताजच्या मोठ्या बहिणीने दारासिंग चा भाऊ रंधवा सोबत लग्न केले होते) दारासिंग च्या चित्रपटांची त्या काळात मोठी चलती होती. प्रचंड मारधाड असलेल्या या चित्रपटांमध्ये नायिका म्हणजे केवळ शोपीस असायची. सर्व फोकस हा दारासिंगवरच असायचा. फौलाद, राका टारझन कम टू दिल्ली, डाकू मंगल सिंग, सॅमसन, रुस्तम कौन? या आणि अशा तब्बल १६ चित्रपटांमध्ये ती दारासिंगच नायिका होती.

बलाढ्य धिप्पाड दारासिंग च्या समोर मुमताज छोटी बाहुलीच वाटायची! या स्टंट आणि बी ग्रेड सिनेमा मुळे तिला ए ग्रेड चे सिनेमे मिळत नव्हते तिच्यावर बी ग्रेड सिनेमाची नायिका असे स्टॅपिंग झाले. साठच्या दशकाच्या मध्यावर तिने काही वॅम्प टाइप भूमिका देखील केल्या मेरे सनम काजल या चित्रपटातून. यानंतर मुमताज मेन स्ट्रीम सिनेमात दिसू लागली पण सहाय्यक अभिनेत्रीच्या रूपात! खानदान ,बहू बेटी, सावन की घटा,ये रात फिर न आयेगी…. तिच्यात टॅलेंट होते ती चांगल्या संधीच्या शोधात होती आणि ती तिला मिळाली थेट दिलीप कुमारची नायिका बनून! राम और शाम (१९६८) या चित्रपटात मुमताज चक्क दिलीप कुमारची नायिका बनली! काल पर्यंत दारासिंग सोबत बी ग्रेड सिनेमात चमकणारी मुमताज आता थेट दिलीप कुमारची नायिका बनली होती त्यामुळे तिचा टीआरपी प्रचंड वाढला! नंतर १९६९ साली ती राजेश खन्ना सोबत राज खोसला यांच्या ‘दो रास्ते’ या चित्रपटात ती चमकली. हा सिनेमा सुपर डुपर हिट झाला आणि राजेश खन्ना मुमताज ही जोडी जमली!
================================
हे देखील वाचा : Rakesh Roshan: पित्याच्या गाण्याच्या चालीतून बनवले ‘हे’ सुपर हिट गीत!
================================
याच वर्षी एल व्ही प्रसाद यांनी त्यांच्या महत्त्वकांक्षी ‘खिलौना ‘या चित्रपटासाठी तिला साइन केले.(हा सिनेमा गुलशन नंदा यांच्या ‘पत्थर के होठ ‘ या कादंबरीवर आधारीत होता.) या चित्रपटातील भूमिकेसाठी मुमताजला सर्वोत्कृष्ट नायिकेचा फिल्मफेअर चा पुरस्कार मिळाला. (हा तिचा एकमेव फिल्मफेअर पुंरस्कार) शम्मी कपूर सोबतचे तिचे अफेयर याच काळात चालू होते त्यांचा ‘ब्रह्मचारी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. शम्मी कपूरने मुमताजला प्रपोज देखील केले होते. पण त्याने लग्नानंतर चित्रपटात काम करायचं नाही अशी अट घातली होती. ही अट मुमताजला मान्य होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांची प्रेम कहाणी तिथेच थांबली.
सत्तरच्या दशकात राजेश खन्ना आणि मुमताज ही जोडी बॉक्स ऑफिस वरचे सर्वात सफल जोडी होती. दो रास्ते, बंधन, दुश्मन, सच्चा झूठा’, आप की कसम, रोटी, अपना देश, प्रेम कहानी…. हे त्यांचे चित्रपट सुपर डुपर हिट ठरले. मुमताजला स्ट्रगल पिरेडमध्ये नायिका म्हणून तिच्यासोबत काम करायला कोणी तयार नसायचे. शांताराम बापू साठच्या दशकाच्या मध्यावर ‘बूंद जो बन गई मोती’ हा चित्रपट बनवत होते’ या चित्रपटात राजश्री आणि जितेंद्र ही जोडी होती’ परंतु राजश्री हिचे Greg Chapman सोबत प्रेम प्रकरण सुरू झाल्यामुळे तिला सिनेमात इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे शांताराम बापूंनी आपल्या मुलीला या चित्रपटातून काढून टाकले आणि मुमताजची निवड केली. मुमताज सिनेमात आल्यानंतर जितेंद्रने तिच्यासोबत काम करायला नकार दिला कारण ती बी ग्रेडची सिनेमाची अॅक्ट्रेस होती. शांताराम बापूंनी जितेंद्रला निक्षून सांगितले, ”तुला सिनेमा सोडायचा तर तू सोडू शकतोस. मुमताजलाच मी या सिनेमाची नायिका ठेवणार आहे.“

जितेंद्रचा नाईलाज झाला आणि तो या चित्रपटात राहिला. पुढे याच मुमताज ने आपली नायिका व्हावे म्हणून तिच्या मिन्नतवाऱ्या जितेंद्र ला कराव्या लागल्या. 1970 साली मनमोहन देसाई ‘सच्चा झूठा’ या चित्रपटाची निर्मिती करत होते. आधी सिनेमाची स्टार कास्ट शशी कपूर-मुमताज होती. पण शशी कपूर ने देखील मुमताज बी ग्रेड सिनेमाची नायिका म्हणून तिच्या सोबत काम करायला नकार दिला आणि त्याने तो चित्रपट सोडला. नंतर तिथे राजेश खन्नाचा वर्णी लागली! पण नंतर हाच शशी कपूर मुमताज हिट झाल्यानंतर तिच्या सोबत काम करण्यासाठी तिच्या कडे विनंती कराव्या लागल्या तिला भरपूर रिक्वेस्ट केल्यानंतर शेवटी ती ‘चोर मचाये शोर’ या चित्रपटात शशी कपूरची नायिका बनली! काळाचा महिमा असा अगाध असतो.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
या काळात मुमताज हरे रामा हरे कृष्णा , तेरे मेरे सपने (देव आनंद) लोफर , झील के उस पार (धर्मेंद्र) मेला, अपराध (फिरोज खान), धडकन (संजय खान), बंधे हाथ (अमिताभ) यांच्यासोबत चित्रपटात चमकली या काळातील सर्वच आघाडीच्या कलावंतांनी मुमताज सोबत काम केले. प्रत्येक जण तिच्या सोबत काम करण्यासाठी उत्सुक असायचा. सुरुवातीला बी ग्रेड सिनेमाची नायिका म्हणून नाकारणारे पुढे तिने आपल्या सोबत काम करावे म्हणून तिच्यापुढे शरणागती पत्करून विनंती करत होते ‘कर्मा हिट्स बॅक’ असे म्हणतात ते बरोबर आहे!