‘रिपीट रन संस्कृती’ ते ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म – चित्रपटसृष्टीचा अनोखा प्रवास
रिपीट रन! शीर्षकामधला हा शब्द वाचून पूर्ण होईपर्यंत एव्हाना वयाची पंचावन्न अथवा साठी ओलांडलेले चित्रपट रसिक जुन्या आठवणीत रमलेही असतील आणि छान हास्यही त्यांच्या चेहऱ्यावर उमटले असेल. तर ,आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला मात्र ‘रिपीट रनचा चित्रपट’ म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न पडला असेल आणि ते अगदी स्वाभाविक आहे. असे कुतूहल हवेच.
काळासोबत अनेक गोष्टी मागे पडतात, काहींचे स्वरुप बदलते, काही आज गरजेच्या वाटत नाहीत तसेच आज हा रिपीट रनचा चित्रपट ९९ टक्के प्रमाणात फ्लॅशबॅकचा एक भाग झाला आहे आणि अवघ्या एक टक्का प्रमाणात त्याचे अस्तित्व राहिले आहे. पण त्याच वेळेस त्याचा सांस्कृतिक रंगढंगही बदलला आहे.
रिपीट रनचा चित्रपट म्हणजे पहिल्यांदा रिलीज होऊन गेलेला चित्रपट पुन्हा काही वर्षांनी नियमित खेळाला प्रदर्शित होतो (अथवा व्हायचा) त्याला ‘रिपीट रन’ चित्रपट म्हणतात. अगदी वेगळ्या भाषेत सांगायचे तर, त्या काळातील मॅटीनी शोचा मोठा भाऊ म्हणजे रिपीट रनचा चित्रपट होय.
मॅटीनी शो हे वेगळे आणि शहरी समाजात त्या काळात छान रुजलेले कल्चर होते. तो एक वेगळा रंजक विषय आहे. रिपीट रन काहीसा त्याच्यासारखाच तरीही वेगळा प्रकार होता. पण हे दोन्ही प्रकार आवश्यकही होते. एकदा का फस्ट रनचा चित्रपट जे काही यशापयश प्राप्त करुन चित्रपटगृहातून गेला की, तो नंतर पाहण्यासाठी रसिकांना पूर्वी संधी ती काय होती? दूरदर्शनच्या आगमानापूर्वीच्या काळाबाबत मी हे म्हणतोय. गल्ली चित्रपट संस्कृती होती. पण ती श्रीगणेशोत्सव आणि काही सण अथवा निमित्ताने असे. पण जर एकादा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये रिलीज झाला तर? यातूनच मॅटीनी शो आणि रिपीट रन ही संस्कृती आली, मग स्थिरावली आणि अगदी विकसितही झाली. सिनेमा संस्कृतीचा अभ्यास करताना हा खूपच मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे.
एखादा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये रिलीज करताना त्याची वृत्तपत्रात जाहिरात देणे, एकाच वेळेस चार पाच थिएटरमध्ये तो दिवसा तीन खेळ याप्रमाणे रिलीज करणे आणि हे सगळे होत असताना अनेकदा तरी त्या जुन्या चित्रपटाच्या नवीन प्रिन्ट काढणे, तसा जाहिरातीतही खास उल्लेख करणे म्हणजे रिपीट रनचा चित्रपट होय. विशेष म्हणजे असे जुने चित्रपट पुन्हा नव्याने रिलीज करणारे काही वितरक होते आणि ते मग जुन्या चित्रपटाच्या नवीन प्रिन्ट्सवर बराच व्यवसाय करीत.
पूर्वी प्रत्येकी दहा वर्षांनी चित्रपट सेन्सॉर समंत करुन घ्यावा लागे. तेव्हा अनेक चित्रपटाना नव्याने वितरक मिळत असे आणि मग तो वितरक आपला चित्रपट थोडीफार पूर्वप्रसिध्दी करीत रिपीट रनला रिलीज करीत असत.
त्या काळातील रिपीट रनला पुन्हा पुन्हा प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटात आवर्जून नावे सांगायची तर, मदर इंडिया, मुगल ए आझम, गंगा जमुना, कोहिनूर, आवारा, श्री 420, नौ दो ग्यारह, ज्वेल थीफ, वक्त, तिसरी मंझिल, उपकार, हकिकत, आराधना, दो रास्ते, मेरा गाव मेरा देश, जाॅनी मेरा नाम, मेरा नाम जोकर, कारवा या चित्रपटांचा समावेश असे. या सर्व चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत, हे विशेष उल्लेखनीय आहे. त्यामुळे हे चित्रपट रिपीट रनला पुन्हा पुन्हा प्रदर्शित करताना या गाण्यांच्या लोकप्रियतेची सपोर्ट सिस्टीम उपयुक्त ठरे.
एकदा जे चांगले पेरले जाते ते हे असे विविध स्तरांवर उगवते. सिनेमाचे ते दिवसच वेगळे होते. भगवानदादांच्या ‘अलबेला ‘ने तर रिपीट रनला धमाल उडवली. त्याला रिपीट रनला अनेक प्रदर्शकांकडून अर्थात थिएटरकडून वारंवार मागणी होती आणि आता रिपिट रनलाही हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला गेला. आणि भोली सुरत दिल के खोटे, श्याम ढले खिडकी तले या लोकप्रिय गाण्यांना पुढील पिढीतीलही रसिकांची उत्फूर्त दाद मिळत राहिली. अलबेलाच्या रिपीट रनच्या यशाची मिडियातून बरीच दखल घेतली गेले.
रिपीट रनचा चित्रपट हा कायमच मागील पिढीसह सतत पुढील अथवा नवीन पिढीच्या रसिकांना पाहायला मिळणे हे अगदी खास वैशिष्ट्य होते. रिपीट रनच्या चित्रपटाबाबत काही विशेष गोष्टीही घडल्या आणि तीच तर या विषयाची गंमत आहे.
ज्योती स्वरुप दिग्दर्शित ‘परवाना’ (१९७१) या चित्रपटात अमिताभ बच्चनने नकारात्मक वृत्तीची भूमिका साकारलीय. त्या काळात अशी भूमिका म्हणजे ‘खलनायक अथवा व्हीलन’ म्हणूनच ओळखली जाई आणि तेव्हा अमिताभचा ‘पडता काळ’ असल्याने त्याने ती भूमिका स्वीकारली. या चित्रपटात नवीन निश्चल आणि योगिता बाली हे रोमॅन्टीक भूमिकेत म्हणजे नायक आणि नायिका होते आणि पोस्टरवर या दोघांना ठळक आणि समोर स्थान, तर अमिताभ बच्चन एका बाजूला होता. काय करणार?
चित्रपटाला साधारण स्वरुपाचे यश मिळाले आणि थिएटरमधून चित्रपट उतरला आणि मग दोनच वर्षानंतर म्हणजे १९७३ साली प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ पडद्यावर आला तोच अमिताभ बच्चनच्या ॲग्री यंग मॅन प्रतिमेचे वादळ घेऊन! अमिताभ स्टार झाला.
यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’ (१९७५) च्या खणखणीत यशाने तो सुपरस्टार झाला आणि आता अमिताभच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचे फ्लाॅप्स चित्रपट आता रिपीट रनला रिलीज होऊ लागताना ‘परवाना’ चित्रपटाच्या पोस्टरवर अमिताभ बच्चनचा फोटो भला मोठा (नवीन निश्चल आणि योगिता बाली हे एका बाजूला छोटे) तसेच ‘प्यार की कहानी ‘च्या पोस्टरवरही आता तो मोठा, तर अनिल धवन छोटा असे करीत नवीन पोस्टर छापली गेली. यशासह अथवा स्टारडमने काही चित्रपटांची जुनी पोस्टर अशी निकालात निघतात आणि नवीन पोस्टर जन्माला येतात ती ही अशी.
रिपीट रनच्या चित्रपटाबाबत असेही काही विशेष घडत असे, यावरुन ही संस्कृती कशी महत्वाची आणि चौफेर गोष्ट आहे, हे लक्षात येईल. चांद दिग्दर्शित ‘धर्मा’ (१९७३) च्या पोस्टवरचे नवीन निश्चल आणि रेखा हाच चित्रपट रिपीट रनला पुन्हा प्रदर्शित होताना मात्र प्राण, अजित आणि बिंदू मोठ्या आकारात होते. याचे कारण म्हणजे या चित्रपटातील प्राण आणि बिंदू यांच्यावरील “राज की बात कहेदू तो….” ही कव्वाली सुपरहिट ठरली होती.
आणखी एक महत्त्वाचा फंडा म्हणजे काही एकपडदा चित्रपटगृहे अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स ही ‘रिपीट रन चित्रपटाची’ म्हणून ओळखली जात अथवा आजही जातात. धोबीतलावचे एडवर्ड (येथे फार पूर्वी ‘जय संतोषी माँ’ वगैरे पौराणिक चित्रपट फस्ट रनला रिलीज झाले आणि त्यांना उत्तम यशही प्राप्त झाले), कुंभारवाडा येथील मोती (हे कालांतराने बंद पडले), पीला हाऊसची न्यू रोशन, गुलशन, राॅयल वगैरे वगैरे थिएटर (यातील काही थिएटर आजही सुरु आहेत), सात रस्ता येथील न्यू शिरीन, डिलाईट रोडवरचे प्रकाश, ताडदेवचे डायना (ही थिएटर कालांतराने बंद झाली). अशी अनेक चित्रपटगृहांची नावे सांगता येतील.
अगदी गिरगावातील सेन्ट्रलपासून अगदी मिनर्व्हा, अप्सरा वगैरे वगैरे थिएटरमध्ये वर्षभरातून एक दोन आठवडे असेच काही चित्रपट रिपीट रनला पुन्हा प्रदर्शित होत. अधेमधे एकादा आठवडा रिकामा मिळाला की जवळपास सर्वच एकपडदा चित्रपटगृहे एखादा जुना चित्रपट रिपीट रनला पुन्हा प्रदर्शित करीत आणि रसिकांना ती पर्वणीच असे.
मराठी चित्रपटाच्या बाबतीत दादा कोंडके यांच्या चित्रपटाना रिपीट रनची जबरा ‘व्हॅल्यू’ आहे. त्यांचे ‘सोंगाड्या ‘पासूनचे अनेक धमाल चित्रपट अनेक वर्षे भारतमाता थिएटरमध्ये एक आठवड्यासाठी रिपिट रनला रिलीज होतात आणि त्यांना गर्दीही होते. दादा कोंडके सर्वकालीन सुपर हिट आहेत.
१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या बारा बाॅम्बस्फोटातील एक प्लाझा थिएटरच्या कार पार्किंगमध्ये झाला. त्यानंतर पुन्हा काही महिन्यांनी प्लाझा थिएटर सुरु होताना चित्रपती व्ही शांताराम यांचा ‘झनक झनक पायल बाजे’ अतिशय थाटात रिपीट रनला पुन्हा प्रदर्शित झाला आणि पहिल्याच शोपासून त्याला रसिकांनी उत्फूर्त दाद दिली आणि मग या चित्रपटाने अनेक आठवडे मुक्काम केला. हे विशेष उल्लेखनीय आहे. चित्रपती व्ही शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ या चित्रपटालाही रिपिट रनला उत्तम प्रतिसाद मिळतो.
विशेष म्हणजे प्रत्येक काळात मागील काळातील अनेक चित्रपटांबाबत पूर्वी मुद्रित माध्यमातून आवर्जून लिहिले जाई, एकत्र कुटुंब पद्धतीत मागील पिढी पुढील पिढीला जुन्या चित्रपटाच्या आठवणी आवर्जून सांगत आणि अशातूनच हे जुने चित्रपट पहावेसे वाटत आणि रिपीट रनचा चित्रपट कालच्या, मधल्या आणि आजच्या पिढीची गरज पूर्ण करीत असे.
मी गिरगावात लहानाचा मोठा होताना दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये असे अनेक जुने चित्रपट मॅटीनी शो आणि रिपीट रनला एन्जाॅय केले. अगदी एडवर्ड थिएटर आणि डायना थिएटरकडे माझे जरा जास्तच लक्ष असे. तेथे जवळपास प्रत्येक शुक्रवारी एकादा जुना चित्रपट रिपीट रनला पुन्हा प्रदर्शित होई आणि तो पहावासा वाटे. त्या काळात खिशात फक्त तिकीटापुरतेच पैसे असत त्यामुळे या थिएटरपर्यंत चक्क चालत जात असे. डायना थिएटरमध्ये स्टाॅलचे तिकीट दर पासष्ट पैसे असे होते. पण त्या काळात ते खूपच वाटत. पण सिनेमाचे आकर्षण वरचढ ठरे.
हे ही वाचा: “पिकू” ची २५ कोटी ते १४१ कोटींची पडद्यामाग ची कहाणी…
अंदाज अपना अपना.. फ्लॉप का हिट
रिपीट रन सिनेमाच्या संस्कृतीचे रंगढंग अनेक. देशात १९८२ साली रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ आला आणि मग अनेक जुने आणि नवीन चित्रपटाची कॅसेट उपलब्ध होऊ लागली. मग हळूहळू ही रिपीट रन चित्रपटाची संस्कृती मागे मागे पडत गेली. उपग्रह वाहिन्यांचे युग आले, आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने चित्रपट पाहता येऊ लागला आहे. त्यातही यशराज फिल्मचे जवळपास सर्वच चित्रपट ओटीटीवर उपलब्ध आहेत. त्यातील ‘दाग’ अथवा ‘चांदनी’ पुन्हा पुन्हा घरबसल्या पाहता येतोय. इतरही निर्मिती संस्थांचे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत, त्याचे प्रमाणही वाढेल.
हे देखील वाचा: किस्सा ‘गाता रहे मेरा दिल‘ गाण्याच्या ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्रीचा!
तात्पर्य, बदलत्या काळाबरोबर रिपीट रन चित्रपटाची संस्कृतीही बदलत गेली म्हणायचे. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला अनेक जुने मराठी व हिंदी चित्रपट तर झालेच, पण अगदी आपल्याकडील दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपट आणि एकूणच जगभरातील अनेक देशातील जुने चित्रपट पाहायचे आहेत आणि त्याचा शोध घेण्यात ते समर्थही आहेत. त्यांना ‘कोणता चित्रपट पहावा’ अथवा ‘चित्रपट कसा पहावा’ हे सांगावे लागत नाही, इतपत ते सुज्ञ आहेत.
रिपीट रन सिनेमा संस्कृतीचे असे हे बदलते रंगढंग आहेत. त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला हवे. उगाच, जुन्या आठवणींना कसले चिकटून बसता, असे हिणवून चालणार नाही.