‘ओम शांती ओम‘ हे गाणे आधी लक्ष्मीकांतच्या स्वरात रेकॉर्ड झालं होतं का ?
भारतीय सिनेमातील शो मॅन सुभाष घई ‘कर्ज’ या चित्रपटापासून निर्मितीच्या क्षेत्रात उतरले. त्यांच्या मुक्ता आर्ट्सचा हा पहिलाच सिनेमा होता. त्यापूर्वी इतर चित्र संस्थांचे त्यांनी दिग्दर्शित केलेले ’कालीचरण’(१९७६) आणि ’विश्वनाथ’ (१९७८) हे दोन्ही चित्रपट शत्रुघ्न सिन्हाच्या बुलंद डॉयलॉगने हिट ठरले होते. एखादा ‘म्युझिकल हिट’ सिनेमा काढायचा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता. ते चांगल्या संधीच्या आणि कथानकाच्या शोधात होते.
१९७५ साली आलेल्या ‘द रीइनकारनेशन ऑफ पीटर प्राऊड’ या हॉलीवूडच्या सिनेमाने घई यांचे लक्ष वेधले. पुनर्जन्मावर आधारीत या कथानकाला भारतीय अवतारात आणले, तर प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील याची त्यांना खात्री होती. सिनेमा संगीतप्रधान व पुनर्जन्मावर असल्याने गिटार या वाद्याला अग्रस्थानी ठेवून त्यावरील धुन त्याला मागच्या जन्मीची आठवण करून देते हे निश्चित झालं. सिनेमाचा नायक म्हणून ऋषी कपूर आणि नायिका म्हणून टिना मुनीम यांची नावं नक्की झाली.
या चित्रपटातील सर्वच गाणी खूप गाजली मुळात तरुणांना आकर्षित करणारे कथानक असल्यामुळे या संगीतात एक झिंग होती, नशा होती. तरुणाईला आकर्षित करणारे संगीत असावे, म्हणून या चित्रपटाला संगीत आर डी बर्मन यांनी द्यावे असं बऱ्याच मित्रांनी सुभाष घई यांना सुचवले. पण सुभाष घई त्यावेळी ‘गौतम गोविंदा’ हा सिनेमा दिग्दर्शित करीत होते. त्या सिनेमाला लक्ष्मीकांत प्यारेलालचे संगीत होते. त्यांनी त्यांना तिथेच शब्द दिला होता. (घईंच्या या पूर्वीच्या दोन सिनेमांना कल्याणजी आनंदजी आणि राजेश रोशन यांनी संगीत दिले होते.) लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सुभाष घई यांच्या विश्वासाला पात्र ठरत अप्रतिम संगीत दिले.
=====
हे देखील वाचा: अमिताभ बच्चन -अमजद खान यांच्या मैत्रीची ‘अधुरी एक कहाणी’
=====
आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन चाळीस बेचाळीस वर्षाचा कालावधी लोटला असला, तरी यातील प्रत्येक गाणं आजही रसिकांच्या लक्षात आहे आहे. या चित्रपटात ऋषी कपूर, नीतू सिंग यांच्या समवेत प्राण, राजकिरण, सिमी गरेवाल, दुर्गा खोटे आणि प्रेमनाथ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील ऋषी कपूरवर चित्रित सर्व गाणी किशोर कुमार यांनी गायली होती. फक्त एका गाण्यात रफीचा स्वर होता. ते गाणं होतं, ‘दर्दे दील दर्दे जिगर दिल मे जगाया आपने’!
या चित्रपटातील इतर गाणी, ‘तू कितने बरस का तू कितने बरस की’, ‘पैसा ये पैसा’, ‘ओम शांती ओम’, ‘इक हसीना थी इक दिवाना था’ आणि ‘कमाल है कमाल है’, ही सर्वच गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी मस्त बनवली होती. ‘कमाल है कमाल है’ हे गाणं मन्ना डे यांनी गायलं होतं आणि ते चित्रपटात प्राणवर चित्रित झाले होतं. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री दुर्गा खोटे आणि अभिनेता प्रेमनाथ या दोघांचा हा शेवटचा यशस्वी सिनेमा ठरला!
आता पण मुख्य मुद्द्याकडे येऊया. या चित्रपटातील ‘मेरी उमर के नौजवा नो दिल ना लगाना ओ दिवानो ‘हे गाणं किशोर कुमारने मोठ्या जोशात गायले होते. चित्रपटात चित्रीकरणाच्या वेळी एका फिरत्या रेकॉर्डवर डान्स करत ऋषी कपूरने फुल टू दंगा करत हे गाणं सादर केलं होतं. पण रसिक मित्रानो तुम्हाला माहिती आहे का, हे गाणं आधी लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतील लक्ष्मीकांत यांच्या स्वरात रेकॉर्ड झालं होतं?
लक्ष्मीकांत हे तसे रूढार्थाने गायक म्हणता येतील असे नव्हते. ऐशीच्या दशकात त्यांनी काही गाणी गायली हे खरे आहे (उदा. गोरे नही हम काले सही- देश प्रेमी), पण ती अपरिहार्य परिस्थितीत प्रसंगानुरूप!
‘कर्ज’ च्या वेळी ‘ओम शांती ओम’ हे गाणे खरं तर किशोर कुमार साठीच बनवले गेले होते. पण त्यावेळी अचानक त्याला हृदयविकाराचा त्रास झाल्याने डॉक्टरांनी त्याला सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितले. त्यामुळे डमी सॉंग म्हणून लक्ष्मीकांत यांनी हे गाणे स्वतःच्या स्वरात रेकॉर्ड करून घेतले.
=====
हे देखील वाचा: लता मंगेशकर यांचा स्वर आणि ओ पी नय्यर यांचे सूर का जुळले नाहीत?
=====
दिग्दर्शक सुभाष घई यांना देखील ते गाणे खूप आवडले. सर्वजण या निष्कर्षापर्यंत आले की, चित्रपटात आपण हेच गाणे ठेवूयात. पण सिनेमाचा नायक ऋषी कपूर याने मात्र शंका उपस्थित केली. चित्रपटातील इतर सर्व गाणी प्रस्थापित गायकांची असताना, हे महत्त्वाचे गाणे आपण किशोर कुमारकडूनच जाणून घ्यायला हवे, असे त्यांनी सुभाष घ्यायला सुचवले.
सुभाष घई यांच्या निर्मितीतील हा पहिलाच चित्रपट असल्याने ते कुठलीही रिस्क घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी किशोर कुमारची प्रकृती नीट होण्याची वाट पाहायचे ठरवले. काही दिवसांनी किशोर कुमारची तब्येत सुधारली आणि तो गाण्यासाठी तयार झाला.
इतक्या दिवस बेडवर पडून तो जाम कंटाळला होता. त्यामुळे इतक्या दिवसांचा सांस्कृतिक उपवास सोडण्यासाठी तो आतुर झाला होता. तो टुणकन उडी मारत जाम उत्साहात अक्षरशः लुंगी आणि कुडता घालून तो रेकॉर्डिंगला आला आणि एका टेकमध्ये त्याने ‘ओम शांती ओम’ हे गाणे रेकॉर्ड केले. गाण्यातील उतार-चढाव, त्यातील झिंग, त्यातील जोश त्याने आपल्या स्वरातून मस्तपैकी उतरवला होत्या. अर्थात हे घडलं नसतं, तर लक्ष्मीकांत कुडाळकर याचं हे पाहिलं गाणं ठरलं असतं!
किशोर कुमार यांचे चिरंजीव अमितकुमार यांनी झी बांगलाच्या ‘सा रे ग म पा’ या कार्यक्रमात ही दिलचस्प आठवण सांगितली होती.