अनन्या पांडे (Ananya Panday)- दीपिकाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे
नव्वदच्या दशकातील लोकप्रिय स्टार चंकी पांडे आणि एके काळची सुप्रसिद्ध मॉडेल भावना पांडे या सेलेब्रिटी दाम्पत्याची लेक आजची आघाडीची स्टार अभिनेत्री अनन्या पांडे! चंकीचे आई वडील नामवंत शल्य विशारद – डॉक्टर शरद पांडे आणि डॉक्टर स्नेहलता पांडे या दाम्पत्यानं अनेकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान दिले आहे. असो. करियर निवडीचा प्रश्न समोर येण्यापूर्वीच अनन्याने मॉडेलिंग करून त्याद्वारे अभिनयात पदार्पण केले. त्यामुळे मेडिकलला जाण्याचा प्रश्न आधीच असा निकालात निघाला ..
सन २०१९ मध्ये करण जोहरने त्याच्या ‘धर्मा प्रोडक्शन्सच्या ‘स्टुडन्ट ऑफ द ईअर -२’ या चित्रपटाद्वारे अनन्या पांडेला लाँच केलं. या फिल्मला फारसं यश लाभलं नाही, पण त्यानंतर आलेल्या ‘पति, पत्नी और वो’ या चित्रपटाला चांगलं यश मिळालं पण पुन्हा त्यानंतरचा ‘खाली -पिली’ हा चित्रपट पुन्हा अपयशी ठरला. सध्या अनन्या करण जोहर निर्मित ‘गहराईयाँ’ या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि नसिरुद्दीन शाह यांच्यासोबत महत्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारीला रिलीज होतोय. अवघी २४ वर्षीय अनन्या सामाजिक भान ठेवून आहे हे महत्वाचं. अनन्याची चित्रपट कारकिर्दीमधली वाटचाल आणि काही अवांतर गप्पा यावर आधारित ही मुलाखत –
करण जोहर जसा आलिया भट्टचा ‘मेंटॉर’ आहे तसाच तुझाही. स्टुडन्ट ऑफ द ईअर -२ मध्ये तुला लाँच केल्यावर पुन्हा त्याची निर्मिती असणारा ‘गहराईयां’ हा चित्रपटामध्ये तू दिसत आहेस. या बोल्ड फिल्ममधे काम करण्याचा तुझा कसा अनुभव होता?
अनन्या – हो, हे खरं आहे की, करण जोहर मला मेंटॉरप्रमाणे आहे. माझ्यासाठी धर्मा प्रॉडक्शन्स अगदी घरच्यासारखंच आहे. ‘गहराईयां’ बद्दल बोलायचं तर, या चित्रपटाला मी ‘बोल्ड’ फिल्मच्या श्रेणीत ठेवणार नाही. २०१९ मध्ये दीपिकाने हा चित्रपट स्वीकारला आणि मग अन्य स्टारकास्ट आणि माझीही निवड झाली.
या चित्रपटामध्ये मी ‘टिया खन्ना’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. ही भूमिका खूप ‘चॅलेंजिंग’ आहे हे नक्की. आपल्या आयुष्याचे निर्णय टिया खूप परिपक्वतेने घेते. जीवनात नात्यांचा गुंता होऊ नये म्हणून ती सतत प्रयत्नशील असते. याबद्दल मी फार विस्ताराने सांगू शकत नाही. पण मी स्वतःला भाग्यवान समजते की, करियरच्या आरंभीच मला अशी गंभीर भूमिका करायला मिळाली.
गहराईयां चित्रपटामध्ये गुंतागुंतीचे नातेसंबंध दाखविण्यात आले आहेत, तर तुझ्या दृष्टीने आदर्श नाते कोणते असते?
अनन्या – प्रेमाचे नाते! जे आजच्या काळातले सर्वात कठीण नाते आहे. या नात्याला अनेक कंगोरे -अनेक पदर असतात. पण जीवाभावाच्या नात्यात दोन्ही बाजूने विश्वास हवा. माझा आवडीचा स्टार शाहरुख खानने आदर्श प्रेमाची व्याख्या खूप छान केली आहे – “मेरे लिये प्यार दोस्ती है!” मी देखील या मताची आहे. ज्या प्रेमात दोस्ती नाही ते प्रेम, प्रेम नाहीच. माझ्या आई-वडिलांच्या लग्नाला २५ वर्षे झाली आहेत, पण त्यांच्यामध्ये आजही मैत्रीचं नातं आहे. हेच नातं माझ्यासाठी आदर्श नातं आहे. मी त्यांच्या नात्यालाच प्रमाण मानते.
इंडस्ट्रीमध्ये किंवा इन्डस्ट्रीबाहेर तुझी जिवाभावाची मैत्रीण कोण आहे?
अनन्या – शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, संजय कपूरची मुलगी शनाया कपूर या दोघी माझ्या अत्यंत खास मैत्रिणी आहेत. या दोघींशी माझी अगदी जीवाभावाची मैत्री आहे.
गहराईयां या चित्रपटाचं शूटिंग २०२० सालाच्या लॉक डाऊनमध्ये गोव्यामध्ये झालं आहे. कसं शक्य झालं हे सगळं?
अनन्या – लॉकडाऊन अचानक सुरु झालं, पण शूटिंगच्या डेट्स आधीच ठरलेल्या होत्या. त्यामुळे गोव्यात रेंटल लोकेशन घेऊन शूटिंगला जायचं ठरलं. ‘बायोबबल’ पद्धतीने हे शूटिंग केलं. २०१९ मध्ये शूटिंग डेट्स नक्की केल्या तेव्हा एकाच शेड्युलमध्ये श्रीलंकेत करायचे ठरले होते, पण कोरोनामुळे सगळं बदलावं लागलं आणि दीड महिना गोव्यात आणि उर्वरित शूटिंग मुंबईत केलं. गोव्यात जरी आम्ही सगळे कलाकार एकत्र होतो तरी सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत होतो. एक व्हॉटस अप ग्रुप करून आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहत होतो. जोक्स फॉरवर्ड करणे, चॅट, व्हॉइस मेल, व्हिडियो कॉल ही आमच्या संपर्काची मुख्य साधनं होती.
टिया खन्ना आणि अनन्या पांडे या दोघींमध्ये काय फरक आहे?
अनन्या -टिया आणि मी आमच्यात थोडेफार साम्य नक्कीच आहे. कुठल्याही गोष्टीचा मी खूप जास्त विचार करते. टिया देखील अशीच आहे. माझ्या या वाईट सवयीबद्दल दिग्दर्शक शकुन बात्राने खूपदा मला समजावून सांगितले आहे, पण अजून तरी मी स्वतःला ‘ओव्हर थिंकिंग’ पासून दूर ठेवू शकले नाही. स्क्रिप्टनुसार टियाच्या आयुष्यात जी नात्यांची गुंतागुंत आहे, ती माझ्या आयुष्यात नाहीये. “फिल्म में कई सारे इमोशनल सीन है लेकिन शकुन ने कहा था हुबहू स्क्रिप्ट के नुसार जरुरी नहीं कि हर सीन स्क्रिप्ट की तरह हो.” अशी लिबर्टी शकुनने दिल्याने कथेतील गांभीर्याचा ताण न येता शूटिंग पूर्ण झाले.
दीपिकाच्या करियरला १५ वर्षे झाली आहेत. तिच्या सहवासात तुला काय शिकायला मिळालं?
अनन्या -दीपिकाच्या ओम शांती ओम या चित्रपटाला १५ वर्षे पूर्ण झाली. या १५ वर्षांमध्ये दीपिकामध्ये खूप अंतर्बाह्य सकारात्मक बदल झाले आहेत. तिनेही माझ्याप्रमाणे मॉडेलिंग आणि मग अभिनय अशीच कारकिर्दीची सुरुवात केली. तिला तर अभिनयाची पार्श्वभूमी देखील नव्हती. पण गेल्या ७-८ वर्षांमध्ये तिला नायिकाप्रधान भूमिका मिळत आहेत. तिच्या नावावर, तिला केंद्रस्थानी ठेवून कथेची निर्मिती होते, यातच सगळं आलं. निर्विवाद ती गेली ५-६ वर्षे ‘नंबर वन’ अभिनेत्री आहे. पण यश तिच्या डोक्यात भिनलं नाही. आपल्या भूमिकांवर ती खूप मेहनत घेते. सेटवर नियमित आणि वेळेवर येते. विनम्रपणा तिचा स्थायीभाव आहे. दिपिकाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. सिनियर कलाकार ‘सिनिऑरिटी’ आल्यानंतर कसे वागतात हे ही जाणून आहे मी. तिच्या यशात तिचे अनेक गुण समाविष्ट आहेत.
तुझे वडील चंकी पांडे हे देखील बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेता आहेत. त्यांनी तुला बॉलिवूडचे काय मंत्र दिले? त्यांनी दिलेल्या कोणत्या टिप्स तुला महत्वाच्या वाटतात?
अनन्या – माझे डॅड कधी टॉपवर किंवा ‘नंबर वन स्टार’ नव्हते, पण त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका त्यांनी समरसून आणि प्रामाणिकपणे त्यांनी केल्या. सगळ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. हा त्यांचा मोठा गुण आहे, जो मला महत्वाचा वाटतो. मला त्यांच्यासमोर बसवून त्यांनी अभिनयाचे धडे दिले नाहीत, पण त्यांना लहानपणापासून पाहत आलेय, त्यांचे इतरांशी असलेले वागणे- बोलणे मी पहिले आहे. हेच संस्कार नकळतपणे माझ्यावर झाले आहेत. त्यांनी मला इंडस्ट्रीत लाँच केलं नाही. तसा त्यांचा विचारच नव्हता.
माझी कोणाकडे शिफारस करावी, असं देखील त्यांना कधी वाटलं नाही आणि त्यांनी ते केलंही नाही. त्यांचा माझ्या योग्यतेवर पूर्व विश्वास आहे आणि होता. त्यांनी मला एकच महामंत्र दिला, ते म्हणतात, “बेटा, अपने इंडस्ट्रीमें असफलता हजम हो सकती है, फेल्यूअर के कड़वे घूंट पिए जा सकते है, यहां इंसान अपनी असफलता से ही बहुत कुछ सीखता है! मुश्किल है सफलता को पचाना!”
यशाच्या नशेचा कैफ इतका चढतो की, माणूस माणुसकी विसरतो. भल्या -बुऱ्या मधला भेद त्याला कळत नाही. कधी तोंडपुजे त्याच्याभोवती कोंडाळं करतात. अनावश्यक स्तुती कलावंताचं डोकं पार बिघडवते, इगो वाढतात. म्हणूनच यश मिळाल्यावरदेखील तू तुझे पाय जमिनीवर ठेव. मला डॅडचा हा सल्ला योग्य वाटतो, रास्त वाटतो.
नेपोटिझमवर तुझी काय मतं आहेत?
अनन्या– नेपोटिझम प्रत्येक क्षेत्रांत आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली उद्योगपती आणि राजकारण्यांची मुलं आपल्या वडिलांची सत्ता पुढे चालवतात. खूपदा डॉक्टर्स, वकील यांची मुलं त्याच क्षेत्रात त्यांचं करियर घडवतात. “लेकिन बस फर्क इतना ही है कि टिकते वही है जिन में टॅलेंट मौजूद हो!”
“तुझे वडील चंकी पांडे असल्याने करण जोहरसारख्या निर्मात्याकडे तुला सहज काम मिळालं”, असं माझ्या तोंडावर बोलणारे खूप आहेत. पण माझ्यात टॅलेंट नसतं, तर मी आज ४ वर्षे टिकले असते का? पुढील २-३ वर्षांच्या माझ्या डेट्स बुक आहेत. मी आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. हे टॅलेंट असल्याशिवाय शक्य होईल का ?
बॉडी शेमिंगला तुला कधी तोंड द्यावं लागलं का? तू त्यावर काय भूमिका घेतलीस ?
अनन्या– ओ येस!! मी शरीराने खूप बारीक आहे, तरी ग्लॅमरस कपडे घालते म्हणून सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. काही महाभाग हे देखील म्हणाले आहेत, “I have a ‘boy’s body’… but people are never happy. When people troll you, it is not on you, it is on them. माझ्याबद्दल टीका किंवा प्रशंसा यांचा मी स्वतःवर परिणाम करून घेत नाही.
=====
हे देखील वाचा: दिपीका, माधुरी आणि मिथुनदा झळकणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर! फेब्रुवारी महिन्यात मनोरंजनाचा धमाका
=====
२०२०मध्ये तू ‘सो पॉझिटिव्ह’ या उपक्रमाची सुरुवात केलीस, त्याचं कारण काय? आणि या इनिशिएटिव्हचे पुढे काय झाले?
अनन्या– २०१९-२० मध्ये मी प्रथमच सोशल मीडियावर नकारात्मकता पाहिली आणि मी स्वतः खिन्न झाले. ज्या व्यक्तींना आपण जवळून ओळखत नाही, जाणत नाही यांच्याबद्दलही इतका तिरस्कार लोकांच्या मनात का असावा? या तिरस्काराची कारणं प्रत्येकाची वेगळी असतीलही. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात हे जरी खरं असलं, तरी समाजात इतकी टोकाची नकारातमक्ता असू नये. हे द्योतक आहे बिघडलेल्या मानसिक आरोग्याचे. ही कीड संपूर्ण समाजाला घातक आहे. भावी पिढ्यांसाठी अयोग्य -असंतुलित वातावरण तयार करत आहे. ही नकारात्मकता वणव्यासारखी पसरू नये म्हणून मी ‘सो पॉझिटिव्ह’ या उपक्रमाची सुरुवात केली. ही सुरुवात डिजिटली -सोशल मीडियावर केली आणि त्यात काही गाईडलाईन्स ठरवल्या.
कोणालाही कोणाच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल टीका करण्याचा विशेषतः खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचा अधिकार नाही. “डिग्निटी से अपनी जिंदगी जिये और दुसरों को भी जीने दे!”
खूपशा युवक युवतींनी लॉकडाऊन काळात अनेकांना मदत केली. त्यात ऑक्सिजन सिलिंडर्स, ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यापासून, वृद्धांना जीवनावश्यक वस्तू देण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. ‘सो पॉझिटिव्ह’ या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे- “मानवतेचे भान ठेवा, नकारात्मकता -कडवटपणा दूर करा.”
या उपक्रमाला खूप उत्तम प्रतिसाद लाभला याचं मला समाधान आहे. मला स्वतःला सोशल मीडियावर ‘अनफिल्टर्ड – रियल’ राहणं आवडतं कारण ‘मी रियल आहे’ !