दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
Undekhi 2 Review: एका सुडाची थरारक कहाणी
मनाली! भारतामधलं एक निसर्गरम्य ठिकाण. या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या मनालीमध्ये झालेला खून आणि त्याचा पश्चिम बंगालमध्ये गायब झालेल्या मुलींशी असणारा संबंध या घटनेपासून सुरु झालेली ‘अनदेखी’ या वेबसिरीजची कहाणी अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन तिथेच पहिल्या सिझनची सांगता करण्यात आली होती. आता या सिरीजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. (Undekhi 2 Review)
अनदेखीच्या पहिल्या सीझनमध्ये वेबसीरिजच्या सर्वसामान्य परंपरेप्रमाणे बोल्ड सीन्स आणि अश्लील शिव्यांचा भडीमार होताच, पण त्याही पलीकडे जाऊन माणसाची स्वार्थी प्रवृत्ती, जीवावर बेतलेली चूक, सत्तेचा माज आणि न्यायाची आस यांची जुगलबंदी, सूड, नात्यांची गुंतागुंत अशा अनेक गोष्टी बघायला मिळाल्या होत्या. ही कहाणी सत्यघटनेवर आधारित असल्याची चर्चाही तेव्हा रंगली होती.
सिझन २ बद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. रिंकू (सूर्या शर्मा) ही पहिल्या भागात नकारात्मक भूमिकेत असणारी व्यक्तिरेखा सिझन २ मध्ये केंद्रस्थानी आहे. सत्तेच्या नशेपासून दूर पळणारी तेजी (आचल सिंग) घरच्या बिझनेसमध्ये आता विशेष ‘इंटरेस्ट’ घेताना दिसतेय. बाकी पापाजी (हर्ष छाया), डीएसपी बरून घोष (दिव्यांशु भट्टाचार्य), कोमल (अपेक्षा पोरवाल) सर्वजण आहेत तिथेच आहेत. काही नवीन पात्रांची ‘एंट्री’ या सीझनमध्ये झाली आहे, पण त्यामध्ये ‘विशेष लक्षवेधी’ असं कोणीही नाही, अपवाद फक्त ‘अभय (मियाँग चँग)’ या व्यक्तिरेखेचा. (Undekhi 2 Review)
अनदेखीचा सिझन १ चा क्लायमॅक्स जबरदस्त होता. या सिझनमध्ये नावाजलेले चेहरे नसूनही वेबसिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. शेवटच्या दृश्यात अँब्युलन्स चालवणारी तेजी बघून प्रेक्षकांना सुखद धक्का मिळाला होता. कोमलला शोधण्यासाठी रिंकू नक्की कुठल्या थरापर्यंत पोचणार आणि तिला वाचविण्यासाठी डीएसपी बरून घोष कुठला गेम खेळणार, कोमल आपला बदला घेऊ शकेल का, तेजीचं पुढे काय होणार, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण करून दुसऱ्या सिझनची हवा निर्माण करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला होता. त्यामुळे प्रेक्षक या सिझनची आतुरतेने वाट बघत होते. (Undekhi 2 Review)
अनदेखीच्या सिझन २ चा विचार करता सिरीजचा ‘स्पीड’ ही या सिरीजची सर्वात जमेची बाजू आहे. यामुळे सिरीज कुठेही रटाळ होत नाही. मात्र सिरीजमध्ये काही अचानक, अनपेक्षित घडणाऱ्या घटना नैसर्गिक न वाटता ओढून ताणून घडवून आणल्यासारख्या वाटतात आणि त्या अजिबातच क्लिक होत नाहीत. या घटना बघून धक्का बसणं तर दूरच उलटपक्षी या घटनांमागचं कारण नक्की काय असेल, हे शोधता न आल्याने प्रेक्षक सिरीजपासून दूर जाऊ शकतात.
मनालीच्या थंड रोमँटिक वातावरणात ड्रग्ज, हिंसा, जीव वाचविण्यासाठीची धडपड, सुडाचं षडयंत्र आणि बोल्ड (रोमँटिक नाही) सीन्स बघताना आवश्यक असणारी उत्सुकता ताणून ठेवण्यात ही सिरीज यशस्वी ठरली असली तरीही अशाप्रकारची सिरीज बघताना आवश्यक असणारा थरार इथे जाणवत नाही. “यहा पे नमक थोडा कम पड गया भाई!”
अभिनयाच्या बाबतीत बोलायचं तर कलाकारांनी मन लावून काम केलं आहे रिंकू, डीएसपी बरून घोष आणि पापाजी यांच्या भूमिका विशेष लक्षवेधी झाल्या आहेत. दिवसरात्र दारूच्या नशेत गुंग असणाऱ्या आणि सतत शिव्या देणाऱ्या पापाजीच्या भूमिकेत हर्ष छाया आणि कोल्ड ब्लडेड डीएसपीच्या भूमिकेत दिव्यांशु भट्टाचार्य सिरीज संपल्यावरही डोक्यातून जात नाहीत. (Undekhi 2 Review)
कथानकाचा विचार केल्यास हा सिझन पूर्णपणे गंडलेला आहे. तरीही दिग्दर्शक आशिष शुक्ला यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा काही प्रमाणात केलेला प्रामाणिक प्रयत्न इथे दिसतोय. अर्थात पहिल्या सीझनमध्ये असणारी उत्कंठा, भीती, सस्पेन्स, थ्रिल या सीझनमध्ये कायम ठेवण्यात मात्र दिग्दर्शक अपयशी ठरला आहे. मुळात कथानकातच दम नसल्याने दिग्दर्शकाला मर्यादा आल्या आहेत, हे स्पष्ट जाणवतं. (Undekhi 2 Review)
थोडक्यात, पहिल्या सीझनच्या शेवटी निर्माण झालेल्या प्रश्नाची उत्तरं शोधायची असतील तर, ही सिरीज बघायला हरकत नाही. वेबसिरीजच्या दुनियेमध्ये पहिला सिझन यशस्वी ठरल्यावर दुसऱ्या सीझनकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात आणि इथेच ‘मेकर्स’ साठी एक नवं चॅलेंज उभं राहतं. त्यामुळे ‘अनदेखी’च्या पहिल्या सीझनशी तुलना न करता जर तुम्ही दुसरा सिझन बघू शकत असाल तर, सिरीज तुम्हाला आवडू शकेल.
वेबसिरीज: अनदेखी 2 (Undekhi 2)
ओटीटी प्लॅटफॉर्म: सोनी liv
दिग्दर्शक: आशिष शुक्ला
निर्माता: अप्लॉज एंटरटेनमेंट, बानीजे एशिया
प्रमुख कलाकार: सूर्या शर्मा, हर्ष छाया, दिव्यांशु भट्टाचार्य, आचल सिंग, अपेक्षा पोरवाल, मियाँग चँग
दर्जा: तीन स्टार