Exclusive Interview: चिन्मय मांडलेकर सांगतोय दोन परस्परविरोधी भूमिका साकारताना आलेली आव्हाने
एक यशस्वी अभिनेता आणि लेखक असणारा चिन्मय मांडलेकर आता ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटामधून हिंदीमध्ये पदार्पण करत आहे. एकीकडे त्याचा ‘पावनखिंड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होत वेगवेगळे रेकॉर्ड ब्रेक करत असतानाच आज ‘द काश्मीर फाईल्स’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला. या निमित्ताने चिन्मयशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा.
१. पावनखिंड या चित्रपटांमध्ये तू शिवाजी महाराजांची भूमिका केली आहेस आणि आता ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामध्ये तू एका ‘फारूक मलिक बिट्टा’ या आतंकवाद्यांच्या भूमिका साकारत आहेस. तर या दोन परस्परविरोधी भूमिका साकारण्याचं आव्हान तू कसं पेललंस?
चिन्मय: मुळात असं करायला मिळणं ही कुठल्याही अभिनेत्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट असते कारण कुठल्याच अभिनेत्याला एकाच पठडीतल्या भूमिका करणं आवडत नाही. हे चित्रपट जरी एकामागोमाग एक रिलीज होत असले तरीही यांचं शूटिंग सहा -सात महिन्याच्या अंतराने झालं आहे. हा या दोन्ही अगदी परस्परविरोधी भूमिका आहेत. पण, अशा विविध प्रकारच्या भूमिका करण्यातच खरी मजा आहे.
या दोन्ही भूमिकांमध्ये सगळ्यात मोठं क्रेडिट आहे ते दोन्ही दिग्दर्शकांचं. दिक्पालला मी शिवाजी महाराजांची भूमिका आणि विवेकजींना माझ्यासारखा मराठी मुलगा काश्मिरी आतंकवाद्याची भूमिका निभावू शकतो, हा विश्वास वाटला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.
२. दिक्पाल लांजेकर आणि विवेक अग्निहोत्री हे दोन्ही दिग्दर्शक विषयाचा सखोल अभ्यास करून दिग्दर्शन करणारे आहेत. तर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
चिन्मय: दिक्पाल आणि माझं असोशिएशन खूप जुनं आहे. फर्जंदाच्या आधीही मी त्याच्यासोबत ‘तू माझा सांगाती’ ही मालिका केली होती. पावनखिंडीच्या निमित्ताने दिक्पालने जवळपास हजार बाराशे ओरिजिनल कागदपत्रांचा अभ्यास केला. म्हणून पावनखिंड आपल्याला खरा वाटतो. त्यात कुठेही ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ नावाचा प्रकार नाही.
हेच विवेक अग्निहोत्री सरांचंही आहे. त्यांनाही मी अनेक वर्षांपासून ओळखतोय. सर किती खोलात जाऊन एखाद्या गोष्टीचा रिसर्च करतात याची प्रचिती मला द काश्मीर फाईल्सच्या निमित्त्याने आली. विवेकजींनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, या चित्रपटासंबंधित कोणत्याही गोष्टीच १००% जस्टिफिकेशन मी जगातल्या कोणत्याही कोर्टात उभं राहून देऊ शकतो. इतका हा चित्रपट खरा आहे, वास्तववादी आहे
३. द काश्मीर फाईल्स हा हिंदीमधला एवढी मोठी भूमिका असणारा तुझा पहिलाच चित्रपट आहे. तर अशा सेन्सिटिव्ह विषयावर आधारित चित्रपट स्वीकारताना त्यावरून कुठला वादंग होईल अशी भीती तुझ्या मनात आली नाही का?
चिन्मय: नाही. मी खरंतर त्याचा विचार नाही केला. माझ्या मनात तेव्हा दोनच विचार होते, एकतर खूप चांगली भूमिका मिळाली होती आणि दुसरा विचार म्हणजे हे कथानक लोकांसमोर येणं खूप महत्वाचं होतं. मुळात यामध्ये कॉंट्रोव्हर्सी होण्यासारखं काहीही नाहीये कारण जे घडलं तेच यामध्ये दाखवण्यात आलं आहे.
४. तू मुंबईतच वाढलास या चित्रपटाचं शूटिंग करताना मुंबई बॉम्ब ब्लास्ट, दंगल किंवा २६/११ चा अटॅक यापैकी कुठल्या घटनांची आठवण आली का?
चिन्मय: हो. मला काही प्रमाणात २६/११ आणि १२ मार्चच्या घटनांची मला आठवण आली. १२ मार्चच्या घटनेच्या वेळी माझे बाबा तिथल्याच एका बँकेत नोकरी करत होते. त्यावेळी आजच्यासारखी संपर्काची साधने नव्हती. त्यामुळे त्यावेळी मनात भीती निर्माण झाली होती.
अर्थात मुंबईतल्या जवळपास प्रत्येक माणसाने हे भय कधीना कधी अनुभवलं आहे. परंतु, या भयाच्या जवळपास हजारपट जास्त भय काश्मिरी हिंदूंनी अनुभवलं आहे. या चित्रपटात माझी भूमिका व्हिक्टिमची नसून टेररिस्टची आहे. पण त्या भयाची जाणीव असणंही आवश्यक होतं. त्या लोकांना तेव्हा घर सोडून पळावं लागलं म्हणजे नेमकी काय परिस्थिती असेल, नेमकं त्यांच्यासोबत काय झालं, हे समजून घेणं आवश्यक होतं.
=====
हे देखील वाचा: चिन्मय मांडलेकर: मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलावंत
=====
५. तू फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या तिन्ही चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहेस. परंतु, प्रत्येक चित्रपटात शिवाजी महाराज वेगळे वाटतात. तर यासाठी तू नक्की कसा अभ्यास केलास किंवा मेहनत घेतलीस ?
चिन्मय: अभ्यास आणि मेहनत खरंतर चित्रपटाच्या लिखाणापासूनच सुरु झाली आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र एकाच चित्रपटात तुम्ही दाखवू शकत नाही. त्यामुळे वयाच्या आणि कारकिर्दीच्या विविध टप्प्यांवरचे महाराज दाखवणं हा या अष्टकाचा हेतू आहे. छत्रपती शिवाजी महाराज जरी आपल्यासाठी आदर्श राजा असले, तरी ते व्यक्ती म्हणून कसे होते, हे समजून घेऊन मी भूमिका निभावल्यामुळे प्रत्येक चित्रपटातले शिवाजी महाराज तुम्हाला वेगळे वाटतात.
६. द काश्मीर फाईल्समध्ये फारूक मलिक बिट्टा या अतिरेक्यांची भूमिका निभावली आहेस. या भूमिकेचा तू कशाप्रकारे अभ्यास केलास?
चिन्मय: फारूक मलिक बिट्टा ही भूमिका दोन तीन आतंकवाद्यांचं मिश्रण आहे. ते नेमके कोण आहेत हे मला विवेकजींनी समजावून सांगितलं होतं. त्यांचे काही व्हिडीओज मी बघितले. त्यातले काही आतंकवादी आजही जिवंत आहेत.
सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ती काश्मिरी भाषा. कारण हिंदी जरी मी उत्तम बोलू शकत असलो, तरी काश्मिरी अक्सेंट बोलणं चॅलेंजींग आहे. माझी सहकलाकार आणि माझी NSD मधली ज्युनिअर भाषा हिने मला यासाठी खूप मदत केली.
=====
हे देखील वाचा: काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची मन हेलावून टाकणारी कहाणी
=====
७. चिन्मय मांडलेकर एक अभिनेता आणि चिन्मय मांडलेकर एक लेखक म्हणून काय फरक आहे?
चिन्मय: मी लिहिलेलं मोठमोठ्या अभिनेत्यांपासून नवीन कलाकारांपर्यंत सर्वानी परफॉर्म केलं आहे. मला नेहमी सर्व अभिनेत्यांनी एक कॉम्प्लिमेंट दिलं आहे की, “आम्ही जसं बोलतो तसं तू लिहितोस. त्यामुळे आम्हाला संवादाची मोडतोड नाही करावी लागत.” असं लिखाण मला जमतं याचं कारण मी एक अभिनेता आहे.
जेव्हा अभिनयासाठी एखादं स्क्रिप्ट हातात येतं तेव्हा लेखकाला नेमकं काय म्हणायचं आहे, हे मी स्वतः लेखक असल्यामुळे माझ्या सहज लक्षात येतं. अर्थात अभिनेत्याला सर्वात मोठा सपोर्ट असतो तो दिग्दर्शकाचा. जर दिग्दर्शक गोंधळलेला असेल, तर मात्र अभिनेत्याला थोडं अलर्ट व्हावं लागतं अशावेळी तुम्हाला लेखक असल्याचा चांगला फायदा होतो.
८. वादळवाट पासून ते अगदी ‘द काश्मीर फाईल्स’ पर्यंतचा तुझ्या अभिनयाचा एक पैलू म्हणजे तू डोळ्यातून अगदी सहज अभिनय करतोस, जे फार कमी कलाकारांना जमतं, तर याबद्दल काही सांगशील का?
चिन्मय: तुम्ही कसं बघता, तुम्ही कुठे बघता हे अभिनय करताना खूप महत्वाचं आहे. मी गेले कित्येक वर्ष थिएटर करतोय. रंगभूमीवर काम करताना आम्हाला दिग्दर्शक सांगायचे की, पहिल्या चार रांगा सोडून बाकी कोणाला तुमचे डोळे दिसत नाहीत. तुमचा आवाज महत्वाचा आहे. पण जसजसं मी कॅमेरासमोर काम करू लागलो, तस तसं मला जाणवत गेलं की, या माध्यमासाठी तुमचे डोळे खूप महत्वाचे आहेत. माझ्या दृष्टीने डोळे हा आपल्या चेहऱ्याचा महत्वाचा भाग आहे. जर डोळेच नसतील तर चेहरा म्हणजे केवळ मातीचं मडकं भासेल. त्यामुळे अभिनय करतानाही मी डोळ्यांकडे विशेष लक्ष देतो.
९. काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचा मुद्द्यावरून सरकारकडून कोणती पावलं उचलली जावीत असं तुला वाटतं?
चिन्मय: कलम ३७० आणि ३५ ए रद्द केलं हे पहिलं पाऊल आहे. पण ही फक्त सुरुवात आहे. काश्मिरी खोऱ्यात शूटिंग करताना जाणवलेली गोष्ट म्हणजे आजही लोकांमध्ये थोडीफार अनिश्चितता आहे. थोडा अवेअरनेस असला तरीही लोक अजूनही गोंधळलेले आहेत.
द काश्मीर फाईल्सच्या निमित्ताने आम्ही घडलेल्या घटनेची दखल घ्यायचा प्रयत्न केला आहे, जो गेल्या ३२ वर्षात कोणीही केला नाही. यामध्ये आम्ही कुठलंही सोल्युशन दिलेलं नाही. राजकारण न करता जर योग्य पावले उचलण्यात आली आणि आपल्या शत्रूराष्ट्रानी कुरघोड्या केल्या नाहीत, तरीही काश्मीर खोऱ्यात शांतत नांदायला अजूनही किमान दोन ते तीन दशकं जावी लागतील.
१०. तू सलग तीन चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका केल्या आहेस अजूनही पुढे ५ चित्रपट येणार आहेत. ज्यामध्येही तू शिवाजी महाराजांची भूमिका करणार आहेस तर, इमेजमध्ये अडकून पडण्याची भीती नाही वाटत का?
चिन्मय: नाही. भीती अजिबात नाही वाटत कारण आता काश्मीर फाईल्ससारखे चित्रपटही केला जो या इमेजच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. हा एक मात्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना एक मोठी जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. त्यामुळे समाजामधला आणि सोशल मीडियावरचा वावर व्यवस्थित असावा याची सर्वोतपरी काळजी मी घेत असतो. ही एक मोठी जबाबदारी आहे आणि ती निभावण्याची मी प्रयत्न करतोय.
– मानसी जोशी