महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ ‘अशोक मा.मा.’ च्या निमित्ताने छोटा पडदा
पावनखिंड -झुंड वाद हा निव्वळ वेडेपणा – चिन्मय मांडलेकर
सोशल मीडियावर कलाकारांना ट्रोल करणं ही गोष्ट काही नवीन राहिलेली नाही. काही कलाकारांच्या एखादया सहज पोस्टनेही सोशल मीडियावर दोन गट पडतात. एक असतो समर्थकांनाच आणि दुसरा विरोधक किंवा ट्रोलर्सचा.
सोशल मीडियावर केवळ कलाकारच नाही, तर दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या बाबतीतही समर्थन, विरोध, ट्रोलिंग अशा प्रकारांसोबतच आता दोन चित्रपटांमध्ये होणारी तुलना हा एक मोठा ‘ट्रेंडिंग टॉपिक’ ठरत आहे. हा वाद थांबायचं नावच घेत नाहीये.
हा वाद आहे पावनखिंड आणि झुंड या चित्रपटांमध्ये होणाऱ्या तुलनेचा. तसं बघायला गेलं, तर दोन्ही चित्रपटांमध्ये काहीच साम्य नाहीये. एक आहे मराठी (पावनखिंड) तर, दुसरा आहे हिंदी (झुंड). तरीही या चित्रपटांमध्ये तुलना होण्याचे नेमकं कारण काय?
अर्थात याचं ठोस असं कुठलंच कारण देता येणार नाही. पावनखिंड हा दिक्पाल लांजेकर सारख्या अभ्यासू दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला चित्रपट आणि त्यांच्या शिवाजी महाराजांवरील आठ भव्यदिव्य चित्रपटांच्या संकल्पामधील हा तिसरा चित्रपट, तर झुंड हा नागराज मंजुळे सारख्या गुणी दिग्दर्शकाने दिगदर्शित केलेला पहिला हिंदी चित्रपट. ‘झुंड’ची कथा नागपूरमधील सामाजिक कार्यकर्ते विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
====
हे ही वाचा: इकडे ‘खिंड’ तिकडे ‘झुंड’… नेमकी लढत कोणाची कोणाशी?
====
हा तसं म्हटलं, तर हे दोन्ही चित्रपट सत्यघनेवर आधारित आहेत हे यामधील एकमेव साम्य. तरीही यामधला एक ऐतिहासिक, तर दुसरा सामाजिक. त्यामुळे सोशल मीडियावर अकारण चालू असलेलं रणकंदन नक्की कशासाठी? याचं उत्तर तर कदाचित खुद्द वाद घालणारेही देऊ शकणार नाहीत. त्याही पुढची गंमत म्हणजे या वाद घालणाऱ्या कित्येक लोकांनी हे दोन्ही चित्रपट बघितलेलेच नाहीत.
या वादग्रस्त चर्चेबद्दल पावनखिंड मध्ये शिवाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या चिन्मय मांडलेकरला विचारलं असता, त्याने आमच्या टीमशी बोलताना सांगितलं-
“सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी इंस्टाग्राम सोडून इतर कुठलाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत नाही. असा काही वाद आहे हे मला अलीकडेच कळलं. कारण पावनखिंड आणि झुंड हे दोन्ही वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आहेत. अर्थात झुंड हा चित्रपट मी अजून बघितलेला नाहीये. पण एका मराठी दिग्दर्शकाने हिंदीमधल्या एवढ्या मोठ्या सुपरस्टारला घेऊन चित्रपट बनवला ही गोष्ट खूप कौतुकाची, खूप अभिमानास्पद आहे. तर पावनखिंड अनेक हिंदी चित्रपट समोर असूनही सगळे रेकॉर्डस् मोडत चालला आहे.
एखादी गोष्ट चांगली आहे हे सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या गोष्टीला वाईट म्हणायला हवं, यावर माझा अजिबात विश्वास नाही. आपण सगळी मराठी माणसं आहोत. आणि मराठी माणसाने केलेल्या कुठल्याही कलाकृतीचं आपण कौतुक करायला हवं. त्यामुळे जर अशी चर्चा जर का कोणी करत असेल, तर त्यांना माझं एकच सांगणं आहे. तुम्ही आधी दोन्ही चित्रपट बघा. दोन्ही कलाकृतींचा आनंद घ्या आणि मग त्याबद्दल बोला. नाही आवडलं, तर त्याबद्दल नक्की बोला, पण अकारण अशाप्रकारची तुलना करण्याची गरजच नाही. आयुष्यात करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत.”
====
हे देखील वाचा: मनोरंजन आणि राजकारणाची सरमिसळ होतेय का?
====
एकीकडे सोशल मीडियावर पोस्टवर पोस्ट पडत असताना अभिनेता चिन्मय मांडलेकर याने दिलेली ही प्रतिक्रिया नक्कीच कौतुकास्पद आणि डोळ्यात अंजन घालणारी आहे. मराठी माणसाने मराठी माणसाचं कौतुक करायलाच हवं. स्वतः चिन्मयने नागराज मंजुळेंनी अमिताभ बच्चन सारख्या बॉलिवूड सुपरस्टारला घेऊन चित्रपट बनविल्याबद्दल त्याचे कौतुक केले आहे. याचबरोबर त्याने दोन्ही चित्रपट बघितल्याशिवाय तुलना करणाऱ्यांवर नाराजीही व्यक्त केली आहे. त्यामुळे ट्रॉलर्सनी याचा विचार करून ही चर्चा आता थांबवायला हवी.