खुशखबर, नाटकं बहरली! आता हवी फक्त माध्यमांची साथ
मराठी प्रेक्षकांवर नाटकाचे संस्कार आहेत, असं म्हटलं जातं. कारण सिनेमा येण्यापूर्वी मराठी माणूस नाटकं पाहात होता. आपल्याकडे सिनेमे आले त्यातही नाटक डोकावत असे म्हणून आधी दिवाणखानी नाटकं आली, तसे सिनेमे येऊ लागले.
आजही मराठी चित्रपटांची संख्या वाढली असली, तरी नाटकांनीही आपलं अस्तित्व जपलं आहे. आता लॉकडाऊननंतर सगळं स्थिरस्थावर होत असताना, नव्यानं सगळं सुरू होत असताना, राज्य सरकारने नाट्यगृहंसुद्धा सर्वक्षमतेनं सुरू झाली आहेत. अर्थात हे सुरू झाल्यावर लगेच थिएटर्स हाऊसफुल्ल झाली नाहीत. पण आता मात्र नाटकांचे प्लॅन्स लाखांचं घर ओलांडू लागले आहेत. (Marathi Natak)
यात सगळ्यात महत्वाचा ठरला तो गेला रविवार. या रविवारी मुंबईत ‘सही रे सही’चा प्रयोग होता. तर पुण्यात ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचा प्रयोग होता. या दोन्ही नाटकांचे प्लॅन्स लागले आणि तिकीटं विकली जाऊ लागली. एरवी पन्नास टक्के क्षमतेनं लाखाचा टप्पा पार करणारी नाटकं आता २ लाख रुपयांचा टप्पा गाठू लागली आहेत. (Marathi Natak)
नाट्यवर्तुळात चालू असलेल्या चर्चेनुसार भरत जाधव यांची मुख्य भूमिका असलेल्या पुन्हा ‘सही रे सही’ या नाटकाने मुंबईत जोरदार व्यवसाय केला. या नाटकाला दोन लाख ५० हजारांवर बुकिंग झालं. तर त्याच रविवारी पुण्यात उमेश कामत, ह्रता दुर्गुळे यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाला दोन लाख ७५ हजारांवर बुकिंग झाल्यानं नाट्यसृष्टीत आनंदाचं वातावरण आहे. (Marathi Natak)
पुण्यात झालेल्या अमृतलता या कार्यक्रमालाही दोन लाख तीन हजारांचं भरघोस बुकिंग झालं. जेव्हा थिएटर्स पन्नास टक्के क्षमतेनं चालू होती तेव्हा हे बुकिंग एक लाख रुपयांची कमाई पार करत असे. पण आता पूर्ण क्षमतेनं थिएटर्स सुरू झाल्यावर हा आकडा दोन लाख रुपयांवर गेल्यावर साहजिकच आता प्रेक्षक पुन्हा नाटकाला येऊ लागले आहेत, हे यातून सिद्ध होतं.
याच नाटकांत सुयोग निर्मित ऋतुजा बागवेची मुख्य भूमिका असलेलं ‘अनन्या’ नाटकही सादर झालं. या नाटकाचा ३०० वा प्रयोग मुंबईतल्या दिनानाथ नाट्यगृहात पार पडला. त्यालाही रसिकांनी चांगला प्रतिसााद दिला. याचं बुकिंगही दीड लाखांवर गेल्याचं कळतं. अर्थात, थिएटर्स पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतर लगेचंच हा प्रयोग असल्यानं तुलनेनं हा गल्ला कमी होता. पण गेल्या रविवारपासून मात्र रसिकांनी नाटकांना हजेरी लावायला सुरूवात केली आहे. (Marathi Natak)
म्हणूनच कदाचित परंतु नाट्यसृष्टी आता पुन्हा नव्या नाटकांनिशी रंगभूमीवर उभी राहू पाहाते आहे. अनेक नवी नाटकं येताना दिसतायत. यात ‘३८ कृष्ण विला’ हे नाटक येत आहे. यात गिरीश ओक, श्वेता पेंडसे यांच्या मख्य भूमिका आहेत. गिरीश ओक यांंचं हे ५० वं नाटक आहे. सोबत आनंद इंगळे, राहुल मेहेदळे यांच्या मुख्य भूमिका असलेलं ‘खरं खरं सांग’ हे नाटकही रंगभूमीवर आलं आहे.
वैभव मांगले, निर्मिती सावंत यांची मुख्य भूमिका असलेलं ‘संज्या-छाया’ हे नाटकही अलिकडेच मंचावर आलं आहे. सगळ्यात मोठी चर्चा आहे, ती प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकाची. हे नाटकही या महिन्यात रंगमंचावर येत आहे.
‘फॅमिली नंबर १’ हे नाटकही आता रंगभूमीवर आलं आहे. प्रिया बेर्डे यांची मुख्य भूमिका असलेलं ‘धनंजय माने इथेच राहतात’ या नाटकालाही अजून हवा तसा पेस मिळालेला नाही. आता सगळं पुन्हा व्यवस्थित सुरू झाल्यानंतर हे नाटक धावू लागेल अशी अपेक्षा आहे. (Marathi Natak)
सगळ्यात महत्वाची गोष्ट या लॉकडाऊननंतर नाटक व्यवसायात समोर आली आहे ती म्हणजे, करंट बुकिंगमध्ये झालेला फरक. पूर्वी नाटकाचा बोर्ड लागला किंवा जाहिरात आली की, बुकिंग सुरू झालेल्या दिवसापासून नाटकाच्या तिकीटासाठी रांग लागायची. आता लॉकडाऊनंनतर सगळं ऑनलाईन झाल्याचा फायदा या तिकीटबारीवर झाला आहे.
नाटकाची सगळी बुकिंग्ज आता बुक माय शोवर होताना दिसतायत. करंट बुकिंग होण्याचं प्रमाण आता खूपच कमी आलं आहे. याचा थेट परिणाम हिशोबात होईल असं दिसतं. पूर्वी करंट बुकिंगमध्ये बऱ्याचदा अफरातफर झाल्याच्या घटना घडत होत्या. प्लॅन फुल व्हायचा मोठ्या रकमेचा, पण निर्मात्याच्या हातात कमी रक्कम यायची असंही व्हायचं. त्याला अनेक कारणं असायची. आता ऑनलाईन बुकिंगमुळे सगळे हिशेब आणि सगळा प्लॅन तिथेच फुल होतोय, शिवाय, लवकर गेलं की पुढचं तिकीट मिळेल हा विश्वासही आता पुसट होऊ लागला आहे. (Marathi Natak)
====
हे ही वाचा: मनोरंजन आणि राजकारणाची सरमिसळ होतेय का?
====
हा सगळा बदल होत असताना आता गरज आहे ती माध्यमांनी नाटकांना उचलण्याची. सध्या माध्यमांचं संपूर्ण लक्ष राजकिय घडामोडींवर आहे. त्यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातले कलगीतुरे तीव्र झाल्याने माध्यमांनाही रोज काहीतरी खाद्य मिळत आहेच. अशात मोठ्या कलाकारांचा सिनेमा आला तर त्यांना प्रसिद्धी दिली जाते. पण नाटकांच्या बाबतीत अद्याप सगळीकडे अंधार आहे.
एकीकडे रसिक प्रेक्षक पुन्हा एकदा नाट्यगृहाकडे वळत असताना नाटकांनाही जास्तीत जास्त प्रमोट करणं गरजेचं आहे. निर्मात्यांनीही नवे नवे फंडे, नव्या माध्यमांची सवय करायला हवी.
====
हे ही वाचा: मनोरंजन… मीडिया… मनमानी… आणि बरंच काही!
====
काही असो, पण दोन वर्ष फार खस्ता खात काढल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने नाटकधंदा तेजीत येईल यात शंका नाही. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा तिसरी घंटा दिमाखात दुमदुमणार आहे.