दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अमिताभचा एक चाहता जेव्हा त्यांच्या तब्येतीसाठी साडेचारशे किलोमीटर उलटा चालत जातो…
बॉलिवूडचा शहेनशहा म्हणजे अमिताभ बच्चन! आज देखील त्याचा करिष्मा कायम आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘झुंड’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे त्याला अमिताभ बच्चनची चित्रपटातील उपस्थिती हेदेखील एक कारण आहेच.
१९६९ साली ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून अमिताभने हिंदी सिनेमाच्या पडद्यावर पदार्पण केले. सुरुवातीची काही वर्षे अडखळत काढल्यानंतर प्रकाश मेहरा यांच्या १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’ या चित्रपटापासून त्यांना यशाचा सूर सापडला.
या सिनेमापासून त्याची ‘अँग्री यंग मॅन’ इमेज तयार झाली आणि तिथून पुढे अमिताभने रसिकांच्या हृदयात अढळपद पटकावले. या काळात अमिताभचे आजारपण असेल, त्याचा राजकारणातील प्रवेश असेल, त्याचे छोट्या पडद्यावरील पदार्पण, त्यांचे सोशल वर्क किंवा त्याचे ब्लॉग असतील या सर्व वेळी रसिक कायम त्याच्यासोबत असायचे.
इतका प्रचंड फॅन फॉलोइंग क्वचितच कोणाच्या वाट्याला येतो. तिकडे दक्षिणेत रजनीकांतच्या मागे असाच प्रचंड मोठा फॅन फॉलोईंग आहे. साउथकडे चित्रपट कलावंत आणि भगवंत यात फारसा फरक केला जात नाही. तिकडे अक्षरशः कलावंतांची मंदिरे बंधली जातात. हेच चित्रपटातील कलावंत जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांच्या मागे त्यांचा हा मोठा रसिक वर्ग असतोच. त्यामुळे साऊथकडे अनेक कलाकार राजकारणात जाऊन यशस्वी झालेले दिसतात.असो. आजचा किस्सा काहीसा वेगळा आहे.
त्यावेळी बंगलोरच्या विद्यापीठ परिसरात अमिताभ बच्चन ‘कुली’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते मनमोहन देसाई. या दरम्यान २६ जुलै १९८२ या दिवशी एक मोठा अपघात झाला.
या दृश्यांमध्ये खरंतर अमिताभला फायटिंग सिन मध्ये पुनीत इस्सार या अभिनेत्याकडून ‘पंच’ खाल्ल्यानंतर, आधी टेबलवर आणि नंतर जमीनीवर पडायचे होते. पण दुर्दैवाने टेबलावर पडताना टेबलाचा कोपरा अमिताभच्या पोटात घुसला आणि अमिताभ जखमी झाला.
पोटात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे तो बेशुद्ध झाला. पुढे त्याला तातडीने मुंबईला हलविण्यात आले. मुंबईला ब्रिच कॅंडी रुग्णालयात तो ॲडमिट होता. त्या काळात सारा देश अमिताभच्या प्रकृतीसाठी देवाची आराधना करत होता. मंदिर असेल, मशिद असेल, चर्च असेल, गुरुद्वारा असेल सगळीकडे अमिताभचे रसिक त्याच्या प्रकृतीसाठी आपापल्या भगवंताचा धावा करत होते.
सारा देश जणू एक कुटुंब झाला होता आणि या कुटुंबातील एक माणूस (अमिताभ बच्चन) दवाखान्यामध्ये ॲडमिट होता. त्याकाळी आजच्या इतक्या मीडिया पॉवररफुल नव्हता. तरी देखील लोक रेडिओच्या माध्यमातून आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून अमिताभच्या प्रकृतीही विषयी माहिती घेत होते.
त्या काळात लोक बीबीसी वर बातम्या ऐकत असत. तिथे अमिताभसंबंधित बातमीचा आवर्जून उल्लेख असे. देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी देखील अमिताभच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुंबईला आल्या होत्या. देशाच्या इतिहासात असे प्रथमच घडत होते.
अमिताभ पुढे काही दिवस हॉस्पिटलमध्ये बेशुद्धावस्थेत होता. शाळा कॉलेजेसमध्ये सामुहिक प्रार्थना होत होत्या. या काळात लोकांनी देवापुढे खूप नवस बोलले. यात एक अमिताभचा रसिक होता अरविंद पंड्या.
अरविंद पंड्या त्या वेळी गुजरात मधील बडोदा इथे राहत होते. त्यांनी बडोद्यातील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन नवस बोलला की ‘जर अमिताभ यातून सुखरूप बाहेर आला तर मी बडोद्याच्या सिद्धिविनायक मंदिरापासून मुंबईच्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर पर्यंत उलटा चालत चालत जाईल!’ (बडोदा ते मुंबई यातील अंतर चारशे पन्नास किलोमीटर आहे) अतिशय अवघड असा नवस अरविंद पंड्या यांनी बोलला होता.
अमिताभवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नाचे यश म्हणा, अमिताभचे दैव बलवत्तर म्हणा किंवा तमाम रसिकांच्या भावना आणि शुभेच्छा म्हणा २ ऑगस्ट १९८२ या दिवशी अमिताभ बच्चन ‘कोमा’ तून बाहेर आले (त्यामुळे अमिताभ बच्चन २ ऑगस्ट या दिवशी माझा पुनर्जन्म झाला असेही म्हणतात). साऱ्या देशात आनंदाची लहर पसरली. संपूर्ण देशातील मंदिर, मशीद, गुरुद्वारा भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेले. प्रत्येक रसिक देवाचे आभार मानत होता कारण त्यांचा लाडका अमिताभ मृत्यूच्या दाढेतून परत आला होता.
तिकडे अरविंद पंड्या यांना देखील खूप आनंद झाला. त्यांनी बडोद्याच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीला नमस्कार केला, पेढे वाटले आणि आपला नवस पूर्ण करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. पुढे काही दिवसातच त्यांनी आपल्या वचनाला पाळत बडोद्याच्या सिद्धिविनायक मंदिरापासून आपला नवस पूर्ण करायला सुरुवात केली. बडोद्याहून उलटे चालत चालत ते मुंबईच्या दिशेने निघाले. रस्त्यात सर्वत्र अमिताभ बच्चनचे चहाते त्यांची संपूर्ण काळजी घेत होते. तब्बल 13 दिवसांच्या अथक प्रवासानंतर अरविंद पंड्या मुंबईला पोहोचले.
सुरुवातीला त्यांनी प्रभादेवीला जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना त्यांना गहिवरून आलं होतं आणि ते मनोमन सिद्धिविनायकाचे आभार मानत होते. एक तर त्यांच्या लाडक्या अमिताभ बच्चनची प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा आनंद तर होताच, शिवाय आपला अवघड नवस देखील सिद्धिविनायकाच्या कृपेने पूर्ण झाला याची नम्र जाणीव देखील त्यांना होती.
====
हे देखील वाचा: लावारीसमधील ‘मेरे अंगने में…’ गाण्यावरून झाला होता वाद – ही आहेत त्याची कारणे
====
एव्हाना ही बातमी अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यावर पोहोचली. सिद्धिविनायक मंदिरातून अरविंद पंड्या तडक अमिताभ बच्चन यांना भेटायला त्यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यावर गेले. त्यावेळी बंगल्याच्या दारात साक्षात हरिवंश राय बच्चन, तेजी बच्चन, जया भादुरी, अमिताभ बच्चन, छोटा अभिषेक, श्वेता सर्वजण अरविंद पंड्या यांच्या स्वागताला हातात हात घेवून उभे होते. हे दृश्य पाहून अरविंद पंड्या खूपच भारावून गेले.
अमिताभ बच्चन त्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे आले आणि खाली वाकले. अरविंद पंड्या यांनी त्यांना हाताने उचलले आणि आपल्या छातीशी लावून घेतले. दोघांच्या डोळ्यातून अश्रूंचा अभिषेक होत होता. हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. त्यांना आदराने घरात घेऊन गेले.
====
हे देखील वाचा: असं काय घडलं की, अमिताभ बच्चन यांच्या ‘शहेनशहा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली
====
अमिताभने सांगितले, “आपल्यासारख्या करोडो रसिकांच्या प्रेमामुळेच आजचा दिवस मी पाहू शकलो!” जया भादुरी यांनी अरविंद पांड्या यांना राखी बांधली आणि तिथून पुढे अनेक वर्ष अरविंद पांड्या जया भादुरीकडून राखी बांधून घेण्यासाठी मुंबईला येत होते.