प्रेमा काय देऊ तुला? – अशोक सराफ यांना उद्देशून निवेदिता सराफ यांनी केली खास पोस्ट शेअर
माणसाच्या आधी अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरज होत्या. मात्र मधल्या काही काळापासून या तीन गरजांमध्ये सोशल मीडिया ही चौथी गरज खूपच सहजतेने जोडली गेली. आज माणूस एकवेळ जेवण विसरेल पण सोशल मीडियावर पोस्ट टाकणे आणि पोस्ट चेक करणे अजिबात विसरणार नाही. मात्र याच सोशल मीडियामुळे जग एकदम जवळ आले आहे.
सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी तर सोशल मीडिया एक वरदानच ठरले आहे. आपल्या आवडत्या कलाकारांच्या संपर्कात राहण्याचा सोशल मीडिया उत्तम मार्ग आहे. कलाकार देखील याच माध्यमाचा वापर करत आपल्या कामाबद्दल, वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देतात आणि फॅन्सच्या सतत संपर्कात असतात.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार त्यांच्या आगामी प्रोजेक्टसची माहिती देतात आणि त्याचे प्रमोशन देखील करतात. लवकरच कलर्स मराठी चॅनेलवर ‘भाग्य दिले तू मला’ ही नवी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेचे अनेक प्रोमो सध्या टीव्हीवर सुरु असून, ते सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर गाजत आहे.
या सर्व प्रोमोना प्रेक्षकांचे खूपच प्रेम मिळत आहे, आणि मालिकेबद्दलची उत्सुकता देखील ताणली जात आहे. तन्वी मुंडले आणि विवेक सांगळे यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेत निवेदिता सराफ देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. याच पार्श्वभूमीवर निवेदिता सराफ यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या खूपच चर्चेचा विषय बनली असून, गाजताना देखील दिसत आहे.
निवेदिता यांनी त्यांच्या पोस्टमधून अशोक सराफ यांच्यावरील त्यांचे प्रेम व्यक्त करत लिहिले, “गेल्या जन्मी नक्कीच काही तरी पुण्य केलं होतं, म्हणून तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझं भाग्य उजळलं. प्रेमा काय देऊ तुला? भाग्य दिले तू मला.”
यासोबतच त्यांनी त्यांचा आणि अशोक सराफ यांचा एक सुंदर फोटो देखील शेअर केला आहे. निवेदिता सराफ यांच्या या पोस्टमधून त्यांचे अशोक मामांवरील प्रेम व्यक्त होत असून, त्या अशोक सराफ यांच्या पत्नी असल्यामुळे स्वतःला किती नशीबवान समजतात हेच या पोस्टमधून दिसून येत आहे.
निवेदिता सराफ आणि अशोक सराफ ही मराठी मनोरंजनविश्वातील सर्वात सुंदर आणि सगळ्यांचीच आवडती जोडी आहे. अशोक आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगावेळी झाली. निवेदिता यांच्या वडिलांनी मुलीची ओळख अशोक यांच्याशी करून दिली होती. पुढे काम करता करता त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र हे लग्न निवेदिता यांच्या घरच्यांना मान्य नव्हते.
या लग्नाला घरातून कडाडून विरोध झाला. परंतु निवेदिता आपल्या निर्णयावर ठाम होता. अखेर घरच्यांनी नमते घेत दोघांच्याही लग्नाला संमती दिली. अशोक आणि निवेदिता यांनी गोव्यातील मंगेशीच्या देवळात जाऊन विधीवत लग्न केले. अशोक आणि निवेदिता यांच्या वयामध्ये १८ वर्षांचे अंतर आहे.