‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
मराठीमधील ‘या’ जोड्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनही हिट झाल्या होत्या
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नायक नायिकांच्या जोड्या प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. पुढे या ऑनस्क्रीन जोड्या प्रत्यक्ष आयुष्यातही एकत्र आल्या. नुसत्या एकत्रच आल्या नाहीत तर, यशस्वीही झाल्या. अशाच ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनही यशस्वी झालेल्या मराठी चित्रपटसृष्टीतील टॉप ५ जोड्यांबद्दल माहिती घेऊया. (Famous Marathi Couples)
१. रमेश देव – सीमा देव
मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुनी आणि ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन यशस्वी ठरलेली जोडी म्हणजे रमेश देव – सीमा देव. यांची प्रेमकहाणी एकदम साधी, सरळ आहे. रमेश देव कोल्हापूरस्थित एका रजपूत घराण्यातले होते. चित्रपटसृष्टीमध्ये ते सीमा देव यांना सिनिअर.
सीमा देव म्हणजे पूर्वाश्रमीच्या नलिनी सराफ. १९६२ साली वरदक्षिणा चित्रपटाच्या निमित्ताने दोघे एकत्र आले. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघेही १९६३ मध्ये कोल्हापूर येथे विवाहबद्ध झाले. (Famous Marathi Couples)
या दोघांनी केवळ मराठीच नाही, तर हिंदी चित्रपटांमध्येही एकत्र काम केलं आहे. सन २०१३ मध्ये दोघांनी लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांचा विवाह सोहळा पुन्हा एकदा पडला. या सोहळ्यास मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह बॉलिवूडमधले हेमामालिनी, अनिल कपूर आदी कलाकारही उपस्थित होते. दुर्दैवाने याच वर्षी २ फेब्रुवारी रोजी रमेश देव यांचं निधन झालं.
२. सचिन -सुप्रिया
सचिन आणि सुप्रिया ही मराठी चित्रपटसृष्टीमधली लोकप्रिय जोडी. नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांची भेट झाली. दोघांमध्ये तब्बल १० वर्षांचं अंतर. पण म्हणतात ना, “ना उमर की सीमा हो.. ना जन्मोका हो बंधन…” अगदी तसंच झालं. सचिनजी प्रेमात पडले. पण मनातल्या भावना व्यक्त करायची हिम्मत काही झाली नाही. (Famous Marathi Couples)
पुढे चित्रपटाचं शूटिंग संपल्यावर सचिनजींनी सुप्रियाजींपाशी आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत त्यांना प्रपोज केलं. परंतु सुप्रियाजी त्यांना विवाहित समजत होत्या आणि आधी त्यांना वाटलं सचिनजी त्यांची चेष्टा करतायत. परंतु अखेर सुप्रियाजींचा होकार मिळाला आणि २१ डिसेंबर १९८५ साली दोघंही विवाहबद्ध झाली. या दोघांनी कित्येक मराठी चित्रपटांमध्ये एकत्रित काम केलं आहे तसंच ही जोड ‘नच बलिये’ या रियालिटी शोची विजेती जोडी ठरली होती.
३. लक्ष्मीकांत बेर्डे – प्रिया बेर्डे
लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे (पूर्वाश्रमीच्या प्रिया अरुण) दोघंही मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी कलाकार. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्रित काम केलं आहे. चित्रपटांच्या सेटवरच या दोघांमध्ये मैत्री झाली. पुढे लक्ष्मीकांत यांची पहिली पत्नी रुही बेर्डे यांचं निधन झाल्यावर एकाकी पडलेल्या लक्ष्मीकांत यांना प्रियाने आधार दिला आणि दोघांचं नातं मैत्रीच्या पुढे गेलं. पुढे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि १९९८ साली दोघांनी लग्न केलं. (Famous Marathi Couples)
लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे ही जोडी केवळ मराठीतच नाही तर हिंदीतही या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. १६ डिसेंबर २००५ रोजी वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मृत्यू झाला.
४. अविनाश नारकर – ऐश्वर्या नारकर
मराठीमधील चिरतरुण जोडी म्हणजे अविनाश नारकर – ऐश्वर्या नारकर. महाश्वेता मालिकेमुळे घराघरात पोचलेले हे दोन्ही कलाकार सर्वप्रथम भेटले ते ‘गंध निशिगंधाचा’ या नाटकाच्या सेटवर. ऐश्वर्या नारकर म्हणजे पूर्वाश्रमीची पल्लवी आठल्ये.
अविनाश नारकर तेव्हा दूरदर्शनवर बे दुणे चार या मालिकेमध्ये काम करत होते. तर, ऐश्वर्या तेव्हा कॉलेजमध्ये शिकत होत्या. अविनाश या क्षेत्रात त्यांना सिनिअर असल्यामुळे त्या त्यांच्याशी फारशा बोलायच्या नाहीत. परंतु अविनाश तर बघताक्षणी पल्लवीच्या प्रेमात पडले होते. “ती पाहताच बाला…” अशी त्यांची अवस्था झाली होती. पुढे या नाटकादरम्यानच ऐश्वर्याही त्यांच्यात गुंतत गेल्या आणि कालांतराने दोघं विवाहबद्ध झाले. नाटक, चित्रपटांसह या जोडीने काही मालिकांमध्येही एकत्र काम केलं आहे.
======
हे देखील वाचा – आवर्जून पाहायलाच हवेत असे टॉप ५ मराठी सस्पेन्स थ्रिलर चित्रपट
======
५. उमेश कामत – प्रिया बापट
सध्याच्या काळातील लोकप्रिय जोडी म्हणजे उमेश कामत – प्रिया बापट. या दोघांनी ‘भेट’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. पण या चित्रपटात दोघांचा एकत्र असा एकही सीन नव्हता. त्यामुळे दोघांची पहिली भेट झाली ती चित्रपटाच्या प्रिमिअरच्या वेळी. यानंतर ‘आभाळमाया’ मालिकेदरम्यान दोघांची पुन्हा एकदा भेट झाली. सेटवरच दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि तिथून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. हळूहळू भेटीगाठी वाढू लागल्या. (Famous Marathi Couples)
यानंतर तीन वर्ष गेली. दोघांची मैत्री बहरत होती. अखेर प्रियाने उमेशला प्रपोज केलं, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्यामुळे प्रिया गोंधळून गेली. उमेशने प्रियाच्या वाढदिवशी तिला होकार द्यायचा, असं ठरवलं असल्यामुळे महिनाभर तो शांत राहिला आणि प्रियाला वाढदिवसाच्या दिवशी होकार देऊन अनोखं गिफ्ट दिलं. पुढे दोघंही ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. ऑक्टोबर २०११ मध्ये दोघांनी विवाह केला. उमेश व प्रियाने नाटक, चित्रपट, मालिका आणि वेबसिरजमध्येही एकत्र काम केलं आहे.