बॅबिलॉन: हॉलिवूडचा प्रवास उलगडून सांगणारा महासिनेमा! कोण साकारणार चार्ली चॅप्लिनची भूमिका?
वेगवेगळ्या विषयांवर भव्य-दिव्य हॉलिवूड चित्रपटांबद्दल चित्रपट रसिकांना नेहमीच उत्सुकता असते, पण आता हॉलिवूडचीच गोष्ट सांगणारा एक महासिनेमा येतोय, ज्याचं नाव आहे ‘बॅबिलॉन’! ला ला लँड आणि व्हीप्लॅश सारखे ऑस्कर विजेते चित्रपट बनवणाऱ्या डेमियन शेझेल या समर्थ दिग्दर्शकाने हे ‘बॅबिलॉन’ या चित्रपटाचं शिवधनुष्य उचललेलं आहे. ब्रॅड पिट आणि मार्गो रॉबी यात मुख्य भूमिकांमध्ये दिसतील. (Hollywood movie Babylon)
‘द आर्टिस्ट’ सारख्या ऑस्करविजेत्या चित्रपटांमधून हॉलिवूड मूकपटांचा जमाना आपण अलीकडच्या काळात मोठ्या पडद्यावर अनुभवलाय. पण त्यापलीकडे जाऊन त्याकाळातील कलाकारांच्या मनातली अस्वस्थता, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांचा सुरु असलेला आटापिटा असं बरंच काही या ‘बॅबिलॉन’मध्ये असणार आहे.
हॉलिवूडमध्ये १९२० नंतर मूकपटांची जागा बोलपटांनी घ्यायला सुरुवात केली. बोलपट आल्यामुळे केवळ मनोरंजन विश्वात नाही, तर एकूणच पाश्चिमात्य जगण्यात सांस्कृतिक क्रांती घडून आली. मूकपटांमध्ये अनेक वर्षं टिकून राहिलेल्या आणि सुपरस्टारपदी पोचलेल्या अनेक अभिनेत्यांना बोलपटांशी जुळवून घेणं कठीण जात होतं.
बोलपटात लाऊड अभिनय चालणार नव्हता, आवाजाची फेक, उच्चार यावर वेगळी मेहनत घ्यावी लागत होती. जे कलाकार स्वतःला बदलू शकले नाहीत ते विस्मृतीत गेले. बोलपटांची सुरुवात, बोलपटांची निर्मितीप्रक्रिया, प्रेक्षकांचा प्रतिसाद, कलाकारांमध्ये वाढती अस्वस्थता, बदलांशी जुळवून घेऊन लोकप्रियता टिकवून ठेवणारे कलाकार हेच ‘बॅबिलॉन‘चं मुख्य कथासूत्र आहे. यामध्ये काही व्यक्तिरेखा मूकपट काळात गाजलेल्या खऱ्याखुऱ्या व्यक्तिरेखा असणार आहेत. अर्थात याच्या जोडीला काही काल्पनिक व्यक्तिरेखाही असतील. (Hollywood movie Babylon)
मूकपटांच्या जमान्यात लोकप्रिय असलेली आणि बोलपटांच्या काळातही लोकप्रियता टिकवून ठेवलेली अभिनेत्री क्लॅरा बो (Clara Bow), हॉलिवूड चित्रपटांमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेली पहिली चिनी अभिनेत्री अशी ओळख असलेली ॲना मे वोंग (Anna May Wong), ‘द बॉय वंडर’ अशी ओळख असलेला तरुण आणि यशस्वी निर्माता ईरविंग थलबर्ग, मूकपटांमधील अभिनयाने प्रेक्षकांचा प्रचंड लाडका बनलेला, पण बोलपटांच्या आगमनानंतर अपयशी ठरलेला अभिनेता, लेखक, दिग्दर्शक जॉन गिलबर्ट (John Gilbert) आणि ज्याची ओळख करुन द्यायची गरज नाही असा चार्ली चॅप्लिन अशा प्रमुख व्यक्तिरेखा या चित्रपटात असणार आहेत.
मार्गो रॉबी ही क्लॅरा बो ची व्यक्तिरेखा साकारतेय, तर ब्रॅड पिट हा जॉन गिलबर्टच्या भूमिकेत दिसेल. क्वेंटीन टॅरेंटीनो या अवलिया दिग्दर्शकाने काही वर्षांपूर्वी बनवलेल्या ‘वन्स अपाॅन अ टाइम इन हॉलिवूड’ या चित्रपटातही ब्रॅड पिट आणि मार्गो रॉबी हीच जोडी होती. (Hollywood movie Babylon)
‘बॅबिलॉन’ मध्ये चार्ली चॅप्लिनच्या रुपात कोण दिसणार याबद्दल बरीच उत्सुकता होती. पण आता त्याचंही उत्तर मिळालंय. ‘स्पायडरमॅन’ फेम टोबी मॅग्वायर चार्ली चॅप्लिनची भूमिका साकारतोय.
ऑक्टोबर २०२१ मध्ये ‘बॅबिलॉन’चं चित्रीकरण संपलं आणि आता डिसेंबर २०२२ मध्ये तो अमेरिकेत प्रदर्शित होईल. ‘बॅबिलॉन’च्या प्रदर्शनासाठी ‘ला ला लँड’सारखी योजना बनवण्यात आली आहे. प्रथम हा ‘बॅबिलॉन’ २५ डिसेंबर २०२२ रोजी फक्त अमेरिकेत आणि तेही निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. त्यानंतर नवीन वर्षात म्हणजेच ६ जानेवारी २०२३ रोजी त्याचे शोज वाढवण्यात येतील आणि त्यानंतर पुढील दोन आठवड्यात टप्प्याटप्प्याने हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोचेल.
‘ला ला लँड’च्या वेळेस असं धोरण वापरल्यामुळेच एकट्या अमेरिकेत १५१ मिलियन डॉलर्स म्हणजे तब्बल १२ अब्ज रुपयांची कमाई झाली असं निर्मात्यांना ठामपणे वाटतंय, म्हणूनच ‘बॅबिलॉन’ही तसाच टप्प्याटप्प्याने प्रदर्शित होणार आहे.
======
हे देखील वाचा – रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम: रशियात आता थेट थिएटरमध्येच ‘पायरसी’
======
अभिनेत्री मार्गो रॉबी बद्दल थोडंसं…
हॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री म्हणून ‘मार्गो रॉबी’ला सर्वाधिक मागणी आहे. ‘बॅबिलॉन’ हा चित्रपट तर याच वर्षी प्रदर्शित होईल. पण पुढच्या वर्षी ग्रेटा गरविगचा ‘बार्बी’, ‘डेव्हिड ओ रसेलचा ‘ऍमस्टरडॅम’, वेस अँडरसनचा ‘ॲस्ट्रोइड सिटी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. वर ज्यांची नावं आहेत ते सगळे हॉलिवूडचे आघाडीचे आणि यशस्वी दिग्दर्शक आहेत.
हल्लीच जे रोश (Jay Roach) या दिग्दर्शकाने आगामी चित्रपटासाठी मार्गोला करारबद्ध केलंय. हा चित्रपट म्हणजे ‘ओशन इलेव्हन’चा प्रीक्वेल असेल अशी चर्चा आहे.