मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
सातच्या आत घरात – तरुणाईला विचार करायला भाग पाडणारा चित्रपट
सातच्या आत घरात! आजच्या काळात अशक्य वाटणारी गोष्ट. कारण ऑफिस, क्लासेस इतकंच नव्हे, तर लहान मुलांच्या बालभवनाची वेळही सातच्या पुढे असते. पण मुळात सातच्या आत घरात ही संकल्पना केवळ वेळेशी निगडित नाहीये, तर यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, ज्यांचा विचार होणं गरजेचं आहे.
सातच्या आत घरात हा चित्रपट पुण्यामध्ये घडलेल्या सत्यघटनेवर आधारित आहे. मे २००४ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील काही गोष्टी आज १८ वर्षांनंतरही विचार करायला लावणाऱ्या आहेत. हा चित्रपट जरी सत्यघटनेवर आधारित असला, तरी चित्रपटामध्ये संबंधित घटनेचा बऱ्याच दृष्टिकोनातून विचार करण्यात आला आहे. (Satachya Aat Gharat)
ही कथा आहे नंदिनी, अनिकेत, मधूरा, व्यंकी, तेजल, पियू आणि केतकीची. या सर्वांची आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि संस्कार भिन्न असतात. तारुण्याचा उन्माद, काहीतरी ‘थ्रिलिंग’ करण्याचा विचार, प्रेम , मैत्री, पार्टीज या साऱ्या गोष्टींचं यथासांग आणि वास्तववादी चित्रण यामध्ये करण्यात आलं आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबातील केतकीचे होणारी घुसमट आणि त्यातून निर्माण झालेली श्रीमंत मुलाशी लग्न करण्याची अभिलाषा, नंदिनी आणि अनिकेतची उथळ प्रेमकहाणी, श्रीमंत कुटुंबातली मधुरा, तिचे मॉडर्न आई वडील आणि पारंपरिक विचारांची आजी, पियू आणि तिची सामाजिक कार्यकर्ती असणारी आई या सर्व गोष्टींभोवती चित्रपट फिरत असताना नंदिनीच्या बाबतीत घडलेल्या एका घटनेनं सर्वांचंच आयुष्य ढवळून निघतं. (Satachya Aat Gharat)
या एका घटनेमुळं ही मुलं स्वप्नांच्या दुनियेत भरारी घेत असताना थेट जमिनीवर येऊन आदळतात. भीषण वास्तव समोर झाल्यावर खऱ्या दुनियेशी त्यांची ओळख होते. या घटनेमुळे ही सर्व मुलं अनेक गोष्टींचा विचार करू लागतात. आयुष्य सोपं नाही याची त्यांना जाणीव होते. या सर्वात जास्त बदलते ती मधुरा. तिचा वैचारिक दृष्टिकोन बदलतो. ‘कौमार्य’ हा कधी विचारात न घेतलेला मुद्दा इतका महत्त्वाचा असतो, याची तिला जाणीव होते. आणि मग याच कारणाने ती तिचा प्रियकर व्यंकीपासून दुरावते.
कॉलेजमध्ये असताना आयुष्य एकदम सुंदर, साधं, सरळ वाटत असतं. आपल्या आयुष्याचे अनेक प्लॅन्स आपण बनवत असतो आणि ते यशस्वी होणारच हा आत्मविश्वासही आपल्याला असतो. अर्थात आत्मविश्वास असणं चूक नाही, पण त्याचवेळी वास्तवाचं भान ठेवणं आणि परिस्थितीचा सर्वांगीण विचार करणंही आवश्यक असतं. अनेकदा एखादी छोटी घटनाही सगळं काही बदलून टाकते तर, काही वेळा दुसऱ्याच्या आयुष्यात घडलेली घटनाही आपल्या आयुष्याची दिशा बदलायला कारणीभूत ठरते. असंच काहीसं मधुराच्या बाबतीत घडतं.
चित्रपटामधले अनेक प्रसंग उत्तम जमून आले आहेत. मधुराच्या घरी पार्टीत अनिकेतने निरांजनावर सिगारेट पेटवणं आणि ते पाहून आजीचा झालेला संताप आणि तिने सुनावलेले खडे बोल; महागडं गिफ्ट खरेदी करण्यासाठी केतकीने आपली चेन विकणं; अगदी याच नाही पण अशाप्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात. (Satachya Aat Gharat)
सातच्या आत घरात तुम्हाला बंधनांचं महत्त्व समजावून सांगायचा प्रयत्न करतो. काळ बदलला तरी स्त्रीकडे बघायची समाजाची मानसिकता बदलली नाही आणि ती इतक्या सहजी बदलणं शक्यही नाही. समाजात कितीही वैचारिक बदल झाला तरी स्त्रीचं ‘कौमार्य’ ही गोष्ट सर्वसामान्यांसाठी आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आहे. हे चूक की बरोबर किंवा मानसिकता बदलेल की नाही यापेक्षा आजच्या पिढीने वास्तव स्वीकारायला हवं. आणि शक्य झाल्यास किमान स्वतःपुरती तरी ही मानसिकता बदलता येईल का, हा विचारही करायला हवा.
घडलेल्या घटनेनंतर आपला प्रियकर आपल्याशी असलेलं नातं संपवणार, हे माहिती असूनही आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात लढणारी नंदिनी, आपल्या स्वाभिमानासाठी व्यंकीशी असलेलं नातं संपवणारी मधुरा, आपल्या आईच्या मदतीने नंदिनीला आधार देणारी पियू आजच्या पिढीतील स्वतंत्र विचारांच्या खंबीर मुलींचं प्रतिनिधित्व करतात. (Satachya Aat Gharat)
==========
हे देखील वाचा – श्वास – आयुष्य जगायचं तर डोळे मिटावेच लागणार!
==========
सत्यघटनेवर आधारित चित्रपट बनवता येणाऱ्या मर्यादा विचारात घेऊन घडलेली घटना एका वेगळ्या दृष्टिकोनातून दाखविण्याचा दिग्दर्शक संजय सूरकर यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद होता. तरुणाईच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या या चित्रपटात कार्तिका राणे, निशिकांत कामत, विभावरी देशपांडे, मृण्मयी लागू, मानव कौल, मकरंद अनासपुरे, अमृता पत्की, गिरीश रानडे, दीपा लिमये, प्रमुख भूमिकेत तर, सुहास जोशी, नीना कुलकर्णी, स्मिता तळवलकर, निळू फुले, डॉ. गिरीश ओक, भारती आचरेकर, दीपा श्रीराम, उदय टिकेकर, आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
ज्वलंत सामाजिक विषयावरील एका वेगळ्या वळणावरचा आणि करमणुकीसोबत विचार करायला भाग पाडणारा चित्रपट बघायचा असेल, तर ‘सातच्या आत घरात’ आवर्जून बघा. (Satachya Aat Gharat)