
Movie Review: ‘A Thursday’ – तुम्हालाच कृष्ण व्हावे लागेल
आजच्या तारखेला ‘त्या’ करुण किंकाळीचा आवाज कान बंद केल्यामुळे समाजाला ऐकू येत नाहीये. ही किंकाळी कोणाची? तर ही किंकाळी देखील त्याच समाजाची आहे. अप्रिय घटना समाजामध्ये रोजरोज घडत असतात. हे आजच आहे; असं नाही तर महाभारत काळापासून घडत आले आहे.
द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना पितामह भीष्म, कुलगुरू द्रोणाचार्य, विदुर कोणालाच हे दिसले नाही. कोणालाही द्रौपदीची किंकाळी ऐकू आली नाही. त्याविरुद्ध कोणीही ब्र काढला नाही. ही अप्रिय घटना दिसली फक्त श्रीकृष्णाला. त्याने तिची अब्रू राखली पण त्याचबरोबर कोणालाही शासन केले नाही. यावरून हातिमताईची गोष्ट आठवली.
एका राजाला लोकांवर झालेले अत्याचार दिसत नव्हते. म्हणून त्याने त्याची दृष्टी काढून टाकली. अत्याचार झालेल्या लोकांच्या भेदक किंकाळ्या त्याला ऐकू आल्या नाहीत म्हणून त्याला बहिरे केले. कोणाच्या अत्याचाराविरुद्ध राजाने आवाज काढला नाही त्याची जीभ छाटून टाकली. लोकांच्या मदतीसाठी त्याचे हात-पाय पोचले नाहीत, म्हणून त्याचे हात-पाय काढून टाकले आणि लोकांच्या रक्षणाचा विचारसुद्धा त्याच्या डोक्यात आला नाही म्हणून त्याचा मेंदू निकामी केला आणि त्याला गलीत-गात्र करून टाकले. आज समाजात हेच होण्याची वेळ आली आहे. आपल्या आजूबाजूला काय सुरु आहे ते आपण (समाजाने) उघड्या डोळ्यांनी पाहायला हवं, त्या विरुद्ध आवाज उठवायला हवा. नाहीतर आपलीही त्या राजासारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही.

समाजाने निष्क्रिय होऊन चालणार नाही. समाजाची अब्रू कोण वाचवणार? त्याचं रक्षण कोण करणार? आज तुम्हाला (समाजाला) श्रीकृष्ण व्हायचे आहे. हाच श्रीकृष्ण अवतार (उपमा) आपल्याला बेहजाद खंबाटा दिग्दर्शित ‘A Thursday’ सिनेमात दिसतो.
गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये महिलांची सशक्त पात्रे लिहिली जात आहेत. दिग्दर्शक बेहजाद खंबाटा याने ‘A Thursday’ मध्ये नैना (यामी गौतम) ही दमदार व्यक्तिरेखा लिहिली आहे. यामी तिच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच इतक्या दमदार भूमिकेत दिसत आहे.
सिनेमातील काही दृश्ये, प्रसंग, त्यामागील संदेश लाजवाब आहे. सिनेमाची कथा कौतुकास्पद आहे पण ठिकाणी पटकथा काहीशी कमकुवत वाटते. परंतु, पण तरीही हा सिनेमा तुम्हाला स्वतःमध्ये अडकून ठेवतो. चित्रपटाचे पार्श्वसंगीत आणि स्लो मोशनचे, क्लोज-अप शॉट्स सिनेमॅटिक अनुभव देतात. सिनेमा ट्रेलर पाहून तुम्हाला सिनेमांची मूळ कथा समजेलच पण, सिनेमाचा उत्तरार्ध जाणून घेण्यासाठी तुम्ही खुर्चीवरून उठणार नाही. प्रेक्षकांना प्रभावित करण्याची क्षमता या सिनेमात आहे.
चित्रपटाची कथा नैना जैस्वाल (यामी गौतम) या बालवाडी शिक्षिका भोवती फिरते. स्वतः नैनाने तिच्या लहान विद्यार्थ्यांना स्वतःच्याच शाळेत (प्ले ग्रुप) बंदी बनवून ठेवलं आहे. त्यावर ती स्वतःच पोलिस आणि मीडियाला या सगळ्याची माहिती देते. सोबतच तिच्या काही मागण्या असतात; त्याही ती नमूद करते. परिणामी ही कथा नैना आणि पोलिस प्रशासन यांच्यातील उंदीर-मांजराच्या खेळाच्या दिशेने वळते. पण, एका शिक्षिकेवर मुलांना बंदी ठेवण्याची वेळ का आली? तिच्या मागण्या काय असतात? तिला देशाच्या पंतप्रधानांना का भेटायचे असते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समाजाचा घटक म्हणून आपण जरूर जाणून घ्यायला हवीत.
दिग्दर्शकाने सिनेमात अनेक सामाजिक आणि व्यावहारिक मानवी पैलू हाताळले आहेत. त्यावर मार्मिक भाष्य केलं आहे. जेणेकरून समाजाला समाजाच्या सत्यपरिस्थितीची जाणीव होईल.
====
हे देखील वाचा: बोल्ड अँन्ड ब्युटीफूल डिंपल तेवढीच खंबीर स्त्री म्हणून जगली…
====
‘A Thursday’ या सिनेमात यामी गौतमने नैनाच्या व्यक्तिरेखेत जीव ओतला आहे. काही ठिकाणी असे दिसते की, पात्रातील बारकावे यामीने अचूकपणे पकडले आहेत. चित्रपटात डिंपल कपाडिया आणि नेहा धुपिया यांच्या भूमिकाही महत्त्वाच्या असून त्यांनी दमदार अभिनय केला आहे. सोबतच अतुल कुलकर्णी, यांच्या प्रतिभेवर कधीच शंका घेतली जाऊ शकत नाही. त्यांना दिलेली भूमिका त्यांनी चोख बजावली आहे.
परिशोधाची भावना, प्रेम, त्याग, द्वेष, राग आदी मानवी भावभावना आपल्याला सिनेमाच्या कथानकात टप्याटप्याने पाहायला मिळतात. त्या मानवी भावभावना आपण समजून उमजून घेणं अपेक्षित आहे. जेणेकरून समाजात सुधारणेची सुरुवात स्वतःपासून होईल.
सिनेमा: A Thursday
दिग्दर्शक: बेहजाद खंबाटा
लेखन: बेहजाद खंबाटा, ऍशली लोबो
कलाकार: यामी गौतम, अतुल कुलकर्णी, नेहा धुपिया, डिम्पल कपाडिया
छायांकन: अनुज-सिद्धार्थ
संकलन: सुमीत कोटीयान
दर्जा: साडे तीन स्टार