नाते कलाकारांचे; किस्से त्यांचे!!
परवा सामान आणायला दुकानात गेले असताना ,एक काकू सतत माझ्याकडे बघत होत्या, गालातल्या गालात हसत होत्या ,त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचय हे माझ्या लक्षात आलं होतं.. राहून राहून शेवटी त्यांनी मला बिल काऊंटरपाशी गाठलं आणि विचारलं ,” ए तू चिंगी ना ?” मी दोन सेकंद माझ्या कडेवर बसलेल्या “माझ्या” चिंगी (उर्फ माझ्या लेकी) कडे बघितलं आणि हसू न आवरता त्यांना म्हटलं, ” हो मीच चिंगी” माझं मन भरकन वीस वर्षे मागे गेलं…
रोज रात्री अल्फा ( तेव्हा झी मराठी नव्हतं) टीव्हीवर पहिलं म्युझिक वाजलं आणि देवकी ताईंच्या आवाजातील जडतो तो जीव सुरू झालं की तमाम लोक काम सोडून आभाळमाया बघायला बसायचे. प्रेक्षकांमध्ये आभाळमायाविषयी इतकं कुतूहल असण्याचं कारण, ती पहिली “डेली सोप” होती .त्यातून विनय आपटे, मंदार देवस्थळी यांच्यासारखे दिग्दर्शक आणि सुकन्या मोने ,मनोज जोशी, संजय मोने, शुभांगी जोशी, अशोक समेळ, अंकुश चौधरी असे अनेक कसलेले कलाकार!
माझ्या घरी पहिला फोन आला तो माझ एका सीरियल मधलं काम पाहून! तुमच्या मुलीला भेटायला घेऊन याल का? मी तेव्हा सहा-सात वर्षांची असेन.आई बाबांचा हात धरून गेले. समोर विनय आपटे बसलेत, ते खूप मोठे कलाकार आहेत, याचं सोयरसुतकही नव्हतं मला! चिंगी हे पात्र अगदी थोड्या एपिसोड साठी असेल असं सांगण्यात आलं ..आभाळमायासारख्या मालिकेला नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं .
आई बाबांनी विचारलं, ‘करशील ना गं’ ? मला आधी काम केल्यामुळे कॅमेरा काय असतो, निदान आपल्याला वाक्य पाठ करून बोलायची आहेत इतकं तरी माहित होतं.
शूटिंग सुरू झालं शूटिंग ला आईबरोबर जायचं, तिथे आई पाठ करून घेणार आणि मी ते बोलणार ! आभाळमाया च्या सेटवर पहिल्यांदा इतकं लहान कोणीतरी पहिल्यांदाच आलं असल्यामुळे सगळे कौतुकाने, प्रेमाने आणि महत्त्वाचं खूप “सांभाळून घेऊन” काम करायचे. चिंगी हे पात्र प्रेक्षकांना इतका आवडलं की ते पुढे खूप वाढवण्यात आलं
आभाळमाया ने मला काय दिलं ,तर नक्कीच आभाळा एवढी माया! मग ती मला आईच्या रुपी भेटलेली सुकन्या ताई असो , आजी रुपी भेटलेली अक्का आजी असो किंवा माझ्या तायांच्या रूपात भेटलेल्या आकांक्षा अनुष्का (संज्योत , मनवा ताई ) असोत !
प्रेक्षकांची माया तर उदंड बरसत होती आणि अजूनही बरसतेच आहे.अनेक समारंभांना चीफ गेस्ट म्हणून बोलवायचे, ट्रेनमध्ये तर चक्क डायरेक्ट खिडकीतली जागा मिळायची , बालकलाकार म्हणून पुरस्कार दिले जायचे !
या सगळ्यामध्ये चिंगी चे हात आभाळाला जरी लागत असले तरी त्याचे दोर तिच्या आई-वडिलांच्या हातातच होते .या सगळ्यात माझा अभ्यास, खेळ आणि सगळ्यात महत्वाचं माझं बालमन त्यांनी कधीही हरवू दिलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं कधीही डोक्यात हवा जाऊ दिली नाही.
शेवटी एवढंच म्हणेन,
घननीळा डोह पोटी गूढ माया आभाळमाया .. आभाळमाया…..
-स्वरांगी मराठे