यंदा कर्तव्य आहे चित्रपटामुळे कोणाच्या जीवनाला वेगळं वळण लागले???
आयुष्यात पहिल्या वाहिल्या गोष्टीला खूप महत्व असतं असं आपण म्हणतो आणि ती पहिली वहिली गोष्ट एखाद्याच्या जीवनात वेगळं वळण घेणारी ठरते. असेच काहीसे संगीतकार निलेश मोहरीर याच्या बाबतीत घडले. २००५ सालची गोष्ट आहे. केदार शिंदे यांचा ‘यंदा कर्तव्य आहे’ हा चित्रपट येत होता. त्यातील गाण्याला संगीत देण्यासाठी गायिका वैशाली सामंत यांनी केदारला निलेश मोहरीरचे नाव सुचवलं. केदारने निलेशला चित्रपटातील प्रसंग सांगितला होता. तो प्रसंग असा होता की नुकतेच लग्न झालेलं जोडपं लग्नानंतर फिरायला जातं. पण दोघेही अवघडले आहेत. त्यांच्यात फारशी ओळख नाही. खूप नाजूक प्रसंग होता. केदार निलेशला म्हणाला, ” मला वाऱ्याची झुळूक येईल असं गीत या प्रसंगावर हवं आहे आणि ते मराठीतील एव्हरग्रीन गाणे ठरायला हवे.” निलेशने हा प्रसंग अश्विनी शेंडे ला सांगितला आणि या प्रसंगावर गाणे लिहायला सांगितले. या संदर्भात निलेश आणि अश्विनी यांच्यात चर्चा होत होती. पण नेमकं छान वाटेल असं काही सुचत नव्हतं. शेवटी चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखा जवळ आल्या. अश्विनी आणि निलेश यांची चर्चा चालू असताना अश्विनीने लिहिलेली एक ओळ होती, ‘ मनाचा खुळा प्रवास, होतो तुझा आभास’. मुळात ही ओळ ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातील गाण्यासाठी लिहिली नव्हती. पण निलेशला त्या ओळीतील ‘आभास’ शब्द आवडला आणि त्याला पटकन कॅच लाईन सुचली आणि त्याची चाल सुद्धा सुचली, “आभास हा, आभास हा” त्याने ती चाल अश्विनीला सांगितली आणि शेवटी ‘आभास हा, आभास हा’ हे यायला हवे असे सांगितले. अश्विनीलाही याच्या आधीच्या आणि नंतरच्या ओळी सुचत गेल्या.
“कधी दूर दूर, कधी तू समोर,
मन हरवते आज का का हे असे होते असे,
ही आस लागे जिवा कसा सावरू मी, आवरू ग मी,
स्वतः दिसे स्वप्न का हे जागतानाही मला,
आभास हा, आभास हा छळतो तुला, छळतो मला”
हे गीत केदारला सुद्धा खूप आवडले. राहुल वैद्य आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात हे गाणे ध्वनिमुद्रित झाले. अंकुश चौधरी आणि स्मिता शेवाळे यांच्यावर हे गीत चित्रित झाले आहे. या गाण्याला खूप लोकप्रियता मिळाली. निलेशच्या करिअरने एक वेगळे वळण घेतले. झी मराठीवर हे गीत खूप लोकप्रिय झाले आणि तेथून निलेश मोहरीरसाठी शीर्षकगीतांचे दालन खुले झाले, असे म्हणता येईल. २००६ साली आलेल्या ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातील ‘आभास हा’ या गाण्याची लोकप्रियता कायम टिकून राहिली आहे आणि केदारने सांगितल्याप्रमाणे खरोखर हे मराठीतील एव्हरग्रीन प्रेमगीत ठरले आहे.
गणेश आचवल