‘आई’ होतेय मालिकांची नायिका!
मालिकेची नायिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ऐन विशी तिशीच्या उंबरठयावरील तरूणी असं टिपीकल चित्र उभं राहतं… पण मालिका विश्वात हे चित्र सध्या बदलताना दिसतंय… कारण आता मालिकेतील आईच मालिकेची नायिका झाली आहे. तिच्याभोवती आता मालिकेच कथानक फिरताना दिसतय. कसं त्यावर एक नजर टाकूया.
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मधील अरुंधती अगदी सामान्य मध्यमवर्गीय घरातील शांत, समजूतदार गृहिणी जिचं आयुष्य म्हणजे नवरा, मुलं, घरची मंडळी इतकंच पण नवरयाचं दुसरया बाईशी असलेलं अफेअर कळताच याच समंजस नवरयाच्या हो ला हो मिळवणारया स्त्रीचं खंबीर, स्पष्टवक्ती, घर सांभाळून आपले कलागुण जोपासणारी, थोडं स्वतःसाठी जगायला शिकणारी, शिकवण्या घेणारी असं वेगळं सक्षम रूप पाहायला मिळतं. आई म्हणून, बायको म्हणून, सून म्हणून तिच्या प्रसंगानुरूप वागणुकीत बदल होतो परंतु प्रत्येक नात्यात ती आदर्श ठरते. आई कुठे काय करते असं मालिकेचं टायटल असलं तरी घर सुरळीत फक्त आईमुळे होतं आणि आईच कुटुंब जोडून ठेवते, घराला घरपण देते हे मालिका पाहत असतांना सतत जाणवत राहतं.
अग्गंबाई सासूबाई(Aggabai Sasubai) मधील आसावरी अश्याच एका आदर्श आईचं रूप असली तरी अतिलाडामुळे मुलगा बिघडतो आणि त्याच्या बेताल, बेजबाबदार वागण्याची दूषणं तिच्यावर लागतात पण तिची सून तिला मदत करते आणि मुलाच्या असमंजस वागण्याला आळा घालून त्याला योग्य धडा शिकवण्याच्या पवित्रा घेते. सुरुवातीला या प्रेमळ आईला मुलाशी वाईट वागतांना त्रास होतो, ती माघार घेते, दुःखी होते पण त्यातचं मुलाचं भलं आहे हे कळल्यावर ती एक कणखर आई होते आणि कठोर होऊन मुलाला सुधरवते. आता याच मालिकेचा पुढील सीझन अग्गंबाई सूनबाई आला आहे. यातील आई पूर्णपणे बदललेली दिसतेय आणि आता सुनेच्या हातून तिच्या मुलाला वाढवतांना आपण केलेली चूक होऊ नये यासाठी ती कोणती भूमिका घेते हे पाहणं रंजक ठरणार आहे.
मुलगी झाली हो (Mulgi Zali Ho) या मालिकेतून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आहे. आपल्या मुलीसाठी आणि आपल्या तत्वांसाठी एक आई कशी उभी ठाकते याची गोष्ट खूप सुंदररित्या मालिकेतून मांडण्यात आली आहे. यातील आई एक अशी आई आहे जिने नवरयाचा विरोध पत्करुन मुलीला जन्म दिला इतकंच नाही तर एकटीने तिची संपूर्ण जबाबदारीही स्वीकारली. या मालिकेतील आई सोशिक असली तरी त्या सोशिकतेमागे खूप कारणं आहेत. एक वेगळ्या धाटणीची मालिका या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळतेय.
नायिका म्हणजे मालिकेतील मध्यवर्ती प्रमुख भूमिका असते. आता पर्यंत मालिका विश्वात आईचं स्थान फक्त स्वयंपाकघर आणि चार उपदेश देण्यांपुरतं मर्यादित होतं. पण आता मात्र ते बदलताना दिसतंय आणि मालिकेतील आई नायिका म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करते आहे.
– सिध्दी सुभाष कदम