“कौतुक पाहण्यासाठी ‘आई’ पाहिजे होती” मिलिंद गवळी यांची भावुक पोस्ट
उद्या अर्थात ३० नोव्हेंबर रोजी मराठी टेलिव्हिजन विश्वात लोकप्रियतेचा इतिहास रचणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. मागील पाच वर्षांपासून सतत आपले मनोरंजन करणारी ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. जेव्हा प्रेक्षकांना ही मालिका संपणार असल्याचे समजले तेव्हापासूनच ते सर्व दुःखी आहेत. मालिकेतील कलाकार देखील त्यांच्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असताना, प्रेक्षक देखील सोशल मीडियावर मालिकेसंदर्भात त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहे.
अशातच आई कुठे काय करते या मालिकेत मुख्य खलनायक म्हणून भूमिका साकारणाऱ्या अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट त्यांनी आई कुठे काय करते मालिकेसंदर्भातच केली मात्र यात त्यांनी त्यांना आलेल्या प्रेक्षकांच्या प्रेमाचे अनुभव त्यांनी सांगितले आहे.
मिलिंद यांनी आई कुठे काय करते या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग केल्यानंतर सिद्धार्थ जाधवच्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या शो चे शूटिंग केले या मालिकेच्या सेटवर त्यांच्यावर फॅन्सने जो प्रेमाचा वर्षाव केला त्याबद्दल मिलिंद यांनी भरभरून लिहिले आहे.
मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “आता होऊ दे धिंगाणा ३” मध्ये येत्या 30 नोव्हेंबरला आणि एक डिसेंबरला “आई कुठे काय करते” आणि “ठरलं तर मग” या मालिकेची टीम समोरासमोर येत आहे. माझ्यासाठी “आता होऊ दे धिंगाणा ३” चं शूटिंग खूप खास आणि मनाला भिडणारं आहे कारण “आई कुठे काय करते” या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग संपवून याचं शूटिंग करायला गेलो होतो, माझ्या मनामध्ये खूप Mixed feelings होत्या. पाच वर्ष एक मालिका सातत्याने करून, तिचा शेवटचा भाग शूट करून, खरंतर आपण धमालमस्ती किंव्हा नाचायच्या मूडमध्ये नसतो, मन जड झालेलं होतं, असंख्य आठवणींचा कल्लोळ डोक्यामध्ये माजला होता.
खरं तर आमच्यापैकी कोणाचीच मनस्थिती धमाल मस्ती करायची नव्हती, सगळेच माझ्यासारखे आतून emotional असणार, पण कोणीही तसं काही दाखवलं नाही, “आई कुठे काय करते” ची संपूर्ण टीम normal असल्याचं दाखवत होती, आणि एकदा का “आता होऊ दे धिंगाणा३” च्या सेटवर पोहोचलो, आणि मग काय सिद्धार्थ जाधव बरोबर आम्ही सगळेच रमलो, त्याची energy infectious आहे. मी सुद्धा पहिला एक्ट पासूनच सुटलो होतो, नाचायलाच सुरुवात केली, आणि “आई कुठे काय करते” मालिका संपली आहे हे विसरूनच गेलो.
पण शेवटी स्टार प्रवाह आणि त्याची भन्नाट टीम, आम्हाला असंच थोडी सोडणार होते, त्या मंचावर चक्क त्यांनी आमचा सत्कार केला, मठाच्या सभासद असलेल्या 40 बायका ज्यांनी ही मालिका पाच वर्ष सतत बघितली, त्यांना बोलून आमचं कोड कौतुक केलं, आणि अचानक आमच्यावर फुलांचा वर्षाव झाला, तोपर्यंत मी माझ्या मनाला खूप आवर घातली होती, आणि अचानक सिद्धू म्हणाला, “हा moment तुम्ही सगळ्यांनी जपून ठेवा”, एका कलाकाराच्या आयुष्यामध्ये असे moments खूप कमी येत असतात, आणि अचानक माझ्याही मनाचा बांध फुटला, माझे डोळे भरून आले, त्या क्षणाला असं वाटलं हा कौतुकाचा क्षण बघायला माझी “आई” असायला हवी होती.
स्टार प्रवाह आणि स्टार प्रवाह च्या संपूर्ण टीमचं, सिद्धार्थ जाधवचं, “आता होऊ दे धिंगाणा३” ची संपूर्ण टीम चं, मी खूप खूप आभारी आहे, माझ्या सहकलाकारांच्या आणि डायरेक्टर्स कट प्रोडक्शन च्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो..भविष्यामध्ये असाच धिंगाणा घालत रहा, मायबाप प्रेक्षकांचं असंच मनोरंजन करा , तुम्हा सर्वांना उदंड यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर अनेक नेटकाऱ्यानी कमेंट्स करत त्यांना देखील मालिका संपत असल्याचे दुःख झाल्याचे सांगितले आहे. दरम्यान मिलिंद गवळी यांना या मालिकेने अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली आहे.