महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ ‘अशोक मा.मा.’ च्या निमित्ताने छोटा पडदा
अभिजित-सुखदाचा विशेष दिवाळी पाडवा
‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि कथ्थक नृत्यांगना, अभिनेत्री सुखदा खांडकेकर, मराठीतील एक रोमँटीक कपल अशी या दोघांची ओळख आहे. एकमेकांच्या व्यस्त वेळापत्रकामधून दोघेही एकमेकांसाठी आवर्जून वेळ काढत असतात. सात वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या या जोडीने खास दिवाळी पाडव्याच्या जागवलेल्या आठवणी कलाकृती मीडियाच्या रसिकांसाठी.
बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त यादिवशी असतो. खांडकेकरांच्या घरी दिवाळी म्हणजे सगळ्यांनी एकत्र असणं हे महत्त्वाचं असतं. पुणे, नाशिक, मुंबई इथून अभिजीत आणि सुखदाचे कुटुंबिय एकत्र जमतं आणि दिवाळी साजरी होते. दिवाळी पाडव्याला पत्नी पतीला आणि आपल्या वडीलांना ओवाळण्याची प्रथा आहे. सुखदाचे वडील गेल्यापासून ती तिच्या सासर्यांनाही ओवाळते. “मला डबल गिफ्ट मिळत असल्याने प्रत्येक पाडवा हा माझ्यासाठी स्पेशल असतो”, असं सुखदा सांगते.
सुखदाच्या सासर्यांना शॉपिंगची आवड असल्याने दरवर्षी पाडव्याला मोठ्या उत्साहाने खांडकेकर कुटुंब खरेदीसाठी एकत्र बाहेर पडतं. सासर्यांना सोनं, चांदी, हिरे अशा वस्तू सुखदाला भेट म्हणून देण्यास जास्त आवडतात. एकदा अशीच एक हिर्याची नथ घेण्यासाठी म्हणून सगळे दुकानात गेले. तेव्हाचा किस्सा सांगताना सुखदा म्हणाली, “आम्ही माझ्यासाठी नथ बघण्यासाठी एका दुकानात गेलो. मी एक नथ घालून पाहिली. आणि ती नाकातच अडकली. काही केल्या ती निघेना. तेवढ्यात इतर लोकांनी आम्हाला ओळखलं होतं. त्यामुळे त्यांना आमच्याबरोबर फोटो काढायचे होते. दुकानदाराला आम्हाला बुके द्यायचा होता. या सगळ्या सत्कार समारंभात माझं नाक नुसतं लालेलाल झालं होतं. शेवटी जवळपास अर्ध्या तासाने तार कापून ती नथ निघाली. हा पाडवा माझ्या चांगलाच लक्षात राहिला आहे”.
हे हि वाचा: ‘आतिषबाजीने’ रंगली मधुरा वेलणकर-साटमची दिवाळी
दिवाळीच्या पाडव्याविषयी अभिजीत खांडकेकर सांगतो, “दिवाळीमध्ये आम्ही जास्तीत जास्त वेळ कसा एकत्र घालवता येइल याचा विचार करत असतो. गेली चार वर्ष माझ्या मालिका चित्रीकरणामुळे माझी धावपळ होते. पण एकदा का सगळ्यांना भेटलो की सगळा शीण निघून जातो. पाडव्याचं म्हणाल तर मी अत्यंत भाग्यवान आहे कारण मला अतिश्य अल्पसंतुष्ट पत्नी मिळाली आहे. गिफ्ट काय आहे, किती महाग आहे यापेक्षा प्रेमाने देण्याच्या भावनेला सुखदाच्या दृष्टीने जास्त महत्त्व असतं. त्यामुळे मला एकूणच अभ्यंगस्नान, फराळ, औक्षण, एकत्र जमून मजा मस्ती हा दिवाळीचा माहौलच आवडतो”.
या वर्षीच्या दिवाळीबद्दल अभिजीत आणि सुखदा म्हणाले, “यंदा सुखदाच्या हिंदी मालिकेचं शूटींग सुरू असल्याने आम्हाला कितपत वेळ एकत्र घालवता येणार ही शंका आहे. आम्ही शॉपिंगही ऑनलाइन केलं आहे. हे वर्ष शिकवून जाणारं आहे. पैशापेक्षा नाती महत्त्वाची हे या काळात कळलं आहे. दिवाळी आनंदाचा सण आहे. रोजचं घर चालवण्याची भ्रांत आहे अशांसाठी, आनंदापासून वंचित असलेल्या व्यक्तीला आनंद देण्याचा प्रयत्न आम्ही यावर्षी करणार आहोत, कारण त्या आनंदी चेहर्यांमुळे जे घर उजळेल ते हजारो दिव्यांमुळे उजळणार नाही. त्यामुळे काळजी घेऊन, सुरक्षिततेचे नियम पाळून, साधेपणाने पण उत्साहाने दिवाळी साजरी करणार आहोत”.
मुलाखत आणि शब्दांकन : गौरी भिडे