अभिनयाचा ध्यास श्रेयस राजे
काही वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. त्या काळात सोशल मीडिया किंवा खाजगीवाहिन्या नव्हत्या. शाळेची उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी असेल की नाट्यशिबिरात जाऊन प्रशिक्षण घेणे, या गोष्टीला खूप महत्व होते. असंच काहीसं घडलं ते श्रेयस राजे याच्या बाबतीत. त्याची आई शिक्षिका आहे, तर वडील महानगरपालिकेत नोकरी करत होते.
त्याचे बालपण भिवंडी येथे गेले. राजू तुलालवार यांच्या शिबिरात तो जात होता. अभिनयाची आवड त्याला तिथेच निर्माण झाली. आई वडिलांचा खूप पाठिंबा होता. कॉलेजमध्ये एकांकिका करता याव्यात म्हणून त्याने जोशी बेडेकर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अभिनयातूनखूप काही शिकता येतं आणि ही कला आपल्याला उत्तम अनुभव देऊ शकते, याविचाराने तो कॉलेजच्या नाट्यविषयक उपक्रमात सहभागी होऊ लागला.
दिग्दर्शक अमोल भोर याने जेव्हा जोशी बेडेकर कॉलेजसाठी नाट्यदिग्दर्शनसुरु केले, तो श्रेयसच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. आय एन टी साठीश्रेयसला ‘ओस्तोरिच’ साठी पारितोषिक मिळाले होते. ऍनास्थेशिया, मोजलेम अशा एकांकिकातूनही त्याने काम केले. मोजलेम तर अनेक पुरस्काराची मानकरी ठरलेली एकांकिका होती.
हेही वाचा : अक्षया सांगतेय सौंदर्याची नवी व्याख्या
‘जुम्मेबाज’ या हिंदी एकांकिकेसाठी ‘इप्टा’साठी त्याला ‘बलराज साहनी ट्रॉफी’ मिळाली होती. श्रेयसने लिहिलेली ‘असणं-नसणं’ ही एकांकिका सुद्धा खूप गाजली होती. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात तो सातत्याने अभिनयासाठी सुवर्ण पदक विजेता होता. दिग्दर्शक राजेश जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली त्याला ‘युगपुरुष’ यामराठी आणि हिंदी भाषेत सादर होणाऱ्या नाटकात गांधीजींच्या तरुणपणीची भूमिका मिळाली. त्या नाटकांचे निर्माते धर्मेश मेहता होते. त्यानिमित्ताने गांधीजींबद्दल श्रेयसने अनेक पुस्तकांचे वाचन केले.
स्टार प्रवाह साठी ‘प्रीती परी तुजवरती’ मध्ये त्याने एक भूमिका केली होती. छोटा पडदा हे सुद्धा अभिनयासाठी एक वेगळे माध्यम आहे,याची जाणीव त्याला झाली. एकांकिका आपला कम्फर्ट झोन असतो, पण नाटक, मालिका अशी विविध माध्यमे सुद्धा खूप शिकवणारी आहेत, असा विचार तो करू लागला. ‘तू माझा सांगाती ‘ मध्ये त्याने निवृत्तीनाथांची भूमिका केली. शौर्य, अस्मिता अशा काही एपिसोडिक मालिका केल्या. सोनी मराठीवरील ‘भेटीलागी जीवा’ या मालिकेत काम करताना त्याला खूप चांगले अनुभव आले. त्यात त्याने ‘विहंग’ नामक व्यक्तिरेखा साकारली होती.
नुकतीच स्टार प्रवाह वर सादर झालेल्या ‘मोलकरीण बाई’ मधील ‘सागर’नावाची त्याची व्यक्तिरेखा सुद्धा खूप लोकप्रिय झाली. या संदर्भातला एक किस्सा त्याने सांगितला, “एकदा मी एक्स्प्रेस हायवे वरून कार चालवत येत होतो, एका ट्रॅफिक पोलिसाने मला थांबवले. मला समजले नाही की नक्की काय झालंय? तो पोलीस म्हणाला की मी तुम्हाला कुठेतरी बघितलं आहे. मी म्हटले की ‘मोलकरीण बाई’ या मालिकेत पाहिले आहे का? तो पोलीस प्रचंड खुश होऊन ‘येस’ असे चक्क ओरडला. त्याला खूप आनंद झाला होता. त्याच्याचेहऱ्यावरील आनंद पाहून मला समाधान वाटले की आपण केलेल्या कामाची हीपावती आहे.”
लवकरच काही नवीन प्रोजेक्ट मधून श्रेयस आपल्यासमोर येणार आहे.