
‘दिवसाला ४० चपात्या आणि १.५ लीटर दूध’ Actor Jaideep Ahlawaचा डाइट प्लॅन ऐकून व्हाल थक्क!
‘पाताललोक’ मधील गाजलेला हथौडा त्यागी, आणि अलीकडेच सैफ अली खानसोबत ‘ज्वेल थीफ’ चित्रपटात झळकलेला असा दमदार अभिनेता म्हणजे जयदीप अहलावत. आपल्या तगड्या अभिनयासाठी ओळखला जाणारा जयदीप फक्त अभिनयातच नव्हे, तर स्वतःच्या आहार आणि जीवन शैलीबाबतही तितकाच सजग आणि शिस्तबद्ध आहे. अलीकडेच एका मुलाखतीत त्याने आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत अनेक रंजक गोष्टी सांगितल्या ज्या ऐकून कोणीही थक्क होईल. (Actor Jaideep Ahlawat)

जयदीप म्हणतो की, तो जितकं खातो तितकंच पचवतो, म्हणूनच त्याचं वजन नियंत्रणात राहतं. एकेकाळी तो दिवसाला तब्बल ४० पोळ्या आणि १.५ लिटर दूध प्यायचा, पण तरीही त्याचं वजन कधीच ७० किलोच्या पुढे गेलं नाही. कारण मागे लागलेली शारीरिक हालचाल आणि गावाकडचं रुटीन. ‘खाने में कौन है’ या यूट्यूब चॅनेलवरील कुणाल विजयकर यांच्याशी संवाद साधताना जयदीपने आपल्या बालपणाच्या खाण्यापिण्याच्या आठवणी जागवल्या. तो हरियाणातील एका छोट्याशा गावात वाढला. तिथल्या रुटीनमुळे सतत काम, धावपळ आणि नैसर्गिक जीवनशैली त्याला मिळाली. तो सांगतो, “आम्ही शेतात जात असू, तिथेच ऊस, गाजरं, पेरू असे हंगामी फळं आणि भाजी खायचो. भूकही प्रचंड लागायची, पण जेवढं खातो, तेवढंच खर्चही व्हायचं.”

त्याने आपल्या सकाळच्या नाश्त्याचा उल्लेख करताना सांगितलं, “मी चणे, बाजरीची किंवा मिस्सी रोटी खायचो. त्यासोबत लस्सी, घरचं लोणी आणि चटणी असायची. दुपारचं जेवण तयार ठेवलेलं असायचं, पण फारसं खाल्लं जायचं नाही. मुख्य जेवण रात्रीच असायचं.” दुधाविषयी सांगताना जयदीपने एका गंमतीदार गोष्टीची आठवण सांगितली तो म्हणाला “आम्हाला गिलासात दूध पिण्याची परवानगी नव्हती. आम्ही लोट्यात किंवा जगात दूध प्यायचो. आणि हे आमच्यासाठी खूपच सामान्य होतं.” दिवसातून किमान तीन वेळा तो अर्धा लिटर दूध प्यायचा.
==============================
==============================
आजही जयदीपच्या सवयी फार बदललेल्या नाहीत. तो म्हणतो, “माझं मुंबईत १५-१६ वर्षांपासून वास्तव्य आहे, पण मी आजही घरचं शिजवलेलं अन्नच खातो. पार्ट्यांना गेलो, तरी घरी आल्यावर स्वतः जेवण बनवूनच झोपतो.” जयदीप अहलावतचा हा साधेपणा, घरच्या जेवणावर असलेली निष्ठा, आणि ग्रामीण भागातून मिळालेल्या जीवनशैलीचा प्रभाव हे सगळं त्याच्या फिटनेस आणि स्थैर्याचं गुपित आहे.