प्रथमेश परबच्या दिवाळीतील गमती जमती
बालक पालक, टाईमपास, टकाटक, उर्फी अशा अनेक चित्रपटातून तसेच ‘दृश्यम’ सारख्या हिंदी चित्रपटातून आपल्या लक्षात राहणारा अभिनेता म्हणजेच प्रथमेश परब. डहाणूकर कॉलेजचा तो माजी विद्यार्थी असून, अनेक एकांकिका स्पर्धांमधून सुद्धा त्याने सातत्याने सहभाग घेतला होता. आपल्या दिवाळीच्या आठवणी सांगताना तो म्हणाला,
“मी पाचवी-सहावी मध्ये असताना मला फटाक्यांची खूप आवड होती. आम्ही एका चाळीत राहत होतो. बाबांचा बोनस झाला की त्यातून बाबा माझ्यासाठी भरपूर फटाके आणायचे. मी ते फटाके आमच्या चाळीतील मित्रांना वाजवायला द्यायचो. लवंगी माळ तर आम्ही हातातूनही पेटवून टाकायचो. मग असं होऊ लागलं की दिवाळी झाली की मी आजारी पडायचो. त्याचं कारण आई बाबांच्या लक्षात आलं. मी फटाके वाजवून झाले की अनेकदा त्याच हाताने चकली वगैरे खायचो. फटाक्यांचेच हात खाण्यासाठी वापरल्याने तसेच फटाक्यांपासून जे प्रदूषण होते, त्या त्रासाने मी आजारी पडत होतो.
हे नक्की वाचा : मनवा नाईकची साजेशी दिवाळी
मग आठवी – नववी नंतर फटाके आणणे खूपच कमी झाले. कॉलेजला गेल्यावर दर दिवाळीला शाळेतील म्हणजेच परांजपे विद्यालयातील आम्ही मित्र एकत्र भेटत होतो. आमचा कॉलेजचा पण ग्रुप होता. आम्ही दिवाळीच्या पहिल्या दिवशी घरचा फराळ झाला की पार्लेश्वर येथे भेटायचो.
तेव्हाचा एक किस्सा आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही मित्र हॉटेलमध्ये गेलो होतो. घरून प्रत्येकाला फक्त पन्नास रुपये मिळाले होते. आम्ही दहा बारा मित्र मिळून पार्ल्याच्या एका हॉटेलमध्ये गेलो आणि मग इडली, पावभाजी, डोसा, मिसळ असे भरपूर पदार्थ हादडले. आम्ही मेनू कार्ड आणि किंमत न बघताच मागवत सुटलो होतो. वेटरने बिल आणून दिले तेव्हा आमच्या खिशातील पैशांपेक्षा दुप्पट किमतीचे बिल झाले होते. शेवटी आमच्यातील एका मित्राने ते जास्तीचे पैसे भरले, पण ते जास्तीचे भरलेले पैसे त्या मित्राला आजतागायत परत मिळालेले नाही. दिवाळीत त्याचे दिवाळे निघाले होते.
आता अंधेरीलाच एका ब्लॉकमध्ये आम्ही राहायला गेलो. मला माझ्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करायला आवडते. माझ्या कमाईतून मी दिवाळीला आई साठी साडी घेतली, वडिलांना आणि भावाला पण भेटवस्तू घेतल्या. आई घरी फराळ करते, तो करता करताच फस्त करण्याची जबाबदारी माझी असते.
दिवाळीच्या निमित्ताने मला पारंपरिक कुर्ता खरेदी करायला खूप आवडतो आणि मग त्या पोषाखातले फोटो सुद्धा सोशल मीडियावर मी अपलोड करतो. यंदा कोरोनामुळे जास्त कोणाकडे जाता तर येणार नाही, पण तरीही सामाजिक अंतर पाळण्याचे नियम पाळून आम्ही दिवाळी साजरी करू.”