सिल्वेस्टर स्टॅलोनच्या आयुष्याचा थक्क करणारा हा प्रवास नक्कीच वाचा.
हॉलिवूडचा रॅम्बो आता वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश करतोय…. सिल्वेस्टर स्टॅलोन… याला सिक्सपॅकचा बाप म्हटलं तरी वावगं ठरणार नाही… या रॅम्बोला जन्माच्यावेळी झालेल्या अपघातामुळं पॅरेलिसीस झाला… चेह-यावर त्याच्या खूणा राहिल्या… तरीही त्याला अभिनेताच व्हायचं होतं… त्यासाठी या हडकुळ्या मुलानं प्रचंड मेहनत घेतली… बेघर होण्याची वेळ त्याच्यावर आली… पण अभिनेता व्हायचं खूळ त्यांनं सोडलं नाही… त्याच्या या वेडानं त्याला जिंकवलं… आता हा रॅम्बो यशस्वी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक या भूमिकांमध्ये वावरतोय….
रॅम्बो… दि स्टार…
अगदी जन्माच्या वेळी एका बाळाला पॅरेलिसीस झाला. हा हडकुळा मुलगा या शारीरिक व्यंगासह मोठा झाला. त्याच्या डोक्यात अभिनयाचं भूत शिरलं… अनेक प्रयत्न केले पण यश आलं नाही… हाती असलेला पैसा संपला… मग पॉर्नफिल्ममध्ये काम करावं लागलं… आपल्या कु्त्र्याला विकून पोट भरावं लागलं… पण एवढं होऊनही त्याला अभिनेताच व्हायचं होतं… शेवटी त्यांनं आपल्या स्वतःसाठी एक कथा लिहीली… ती घेऊन तो निर्मात्यांच्या दारी फिरला… शेवटी एका निर्मात्यानं कथा घ्यायची तयारी दाखवली… तिही काही लाखाला… पण हा पठ्ठा तयार झाला नाही… त्याला या कथेवर येणा-या चित्रपटात प्रमुख अभिनेत्याची भूमिका करायची होती. शेवटी निर्माता हरला… या तरुणाला हिरोची भूमिका मिळाली… हा चित्रपट बॉक्सऑफासवर तु….फा….नी…. चालला… हॉलिवूडला या चित्रपटानं एक ॲक्शन हिरो मिळाला… हा चित्रपट म्हणजे रॉकी… आणि अभिनेता आहे सिल्वेस्टर स्टॅलोन…
सिल्वेस्टर स्टॅलोन याला हॉलिवूडमध्ये रॉकी किंवा रॅम्बो म्हणून ओळखतात… सिल्वेस्टरकडे बघितले की त्याच्या चेह-यात आलेल्या व्यंगाची कल्पना येत नाही. अगदी जन्माच्या वेळी आलेल्या या व्यंगावर सिल्वेस्टरनं मात केलीच… पण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीवर मात करत हॉलिवूडमध्ये आपलं भक्कम स्थान निर्माण केलं…
बॉक्सर, लेखक, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक असा प्रवास केलेल्या सिल्वेस्टरचा जन्म न्युयॉर्कचा. त्याचा जन्म होतांना झालेल्या ऑपरेशनमध्ये काही गुंतागुंत निर्माण झाली. त्यामुळे सिल्वेस्टरचा ओठ, जीभ आणि हनुवटीच्या काही भागांवर त्याचा परिणाम झाला. त्याला पॅरालिसीस झाला. परिणामी बोलतांना त्याच्या तोंडातून सर्र….. असा आवाज यायचा. याशिवाय लहानपणीच त्याच्या आई वडीलांचा घटस्फोट झाला. आर्थिक चणचण या कुटुंबाला सहन करावी लागली. आई मुलांचे पालनपोषण निट करु शकत नव्हती. त्यामुळे सिल्वेस्टर काही वर्ष सरकारी अनाथआश्रमांमध्ये वाढला. अनेक शाळा त्याला बदलाव्या लागल्या. या सर्वांत त्याला अभिनयाची गोडी लागली. हा हडकुळा मुलगा जीभ ओढत बोलायचा… त्यामुळे त्याची टिंगलही केली जायची… पण सिल्वेस्टरनं त्याकडे कधी लक्ष दिले नाही. त्याने मियामी युनिर्व्हसिटीमध्ये नाट्य विभागात प्रवेश घेतला. त्यानंतर तो थेट न्युयॉर्कमध्ये दाखल झाला. त्याला चित्रपटात काम करायचं होतं. सिल्वेस्टर लेखकही होता. आपल्या कथेवर चित्रपट निघेल हे स्वप्नही तो बघत असे… त्यामुळे एकीकडे ऑडीशन आणि एकीकडे स्क्रिप्ट घेऊन निर्मात्यांच्या भेटी त्यांनी सुरु केल्या. पण या दोघांतही त्याला अपयश आलं. दिवस एवढे वाईट आले की, घरखर्चासाठी त्याच्याकडे पैसेही शिल्लक रहात नसत. ब-याचवेळा उपाशीपोटी रहावे लागे. त्यातच घरभाड्याचे पैसे नसल्याने त्याला घर सोडावं लागलं. बसस्टॉपवर दिवस काढावा लागे. पोट भरण्यासाठी तो प्राणीसंग्रहालयात प्राण्यांचे पिंजरे साफ करत असे. एक वेळच्या जेवणासाठी त्याने त्याचा आवडता कुत्रा 25 डॉलरला विकला… सिल्वेस्टरच्या सांगण्यानुसार हा त्याच्यासाठी सर्वांत लाजीरवाणा दिवस होता.
हाती काहीच पैसे नसलेल्या सिल्वेस्टरला बसस्टॉपवर एक पॉर्नफिल्मची जाहीरात दिसली. पैसे मिळवण्यासाठी त्यानं या फिल्ममध्ये भूमिका केली. त्यातूनच त्याला लॉर्डस ऑफ फ्लॅट बूश या चित्रपटात भूमिका मिळाली. यातून थोडेफार पैसे मिळाले. सिल्वेस्टरचं लिखाणही चालू होतं. एकदिवस रात्री एका दुकानासमोर त्याला गर्दी दिसली. तिथे टिव्हीसमोर अनेक लोक एक मॅच बघत होते. बॉक्सर महमद अलीची ती फाईट होती. या गर्दीमध्ये सिल्वेस्टरही सामावून गेला. पण ही मॅच बघतांनाच त्याला एका चित्रपटाची कथा सुचली. तो घरी आला आणि सलग चोवीस तास बैठक मारुन त्याने चित्रपटाचे स्क्रिप्ट तयार केले. त्याला नाव दिलं रॉकी….
रॉकीची कथा घेऊन सिल्वेस्टर निर्मांत्यांचे उंबरठे झिजवत होता… पण ना चा पाढा चालू होता. शेवटी एक निर्माता तयार झाला… पण त्याला फक्त स्क्रिप्ट हवी होती. सिल्वेस्टरला या रॉकीमध्ये लिड रोल हवा होता. तरच तो या कथेचे हक्क निर्मात्याला द्यायला तयार होता. शेवटी बरीच घासाघीस करुन सिल्वेस्टरची कथा घेण्यात आली. त्याला अर्धी रक्कम मिळाली… पण लिड रोल असल्यामुळे सिल्वेस्टरनं त्याकडे दुर्लक्ष केलं… या रॉकीनं सगळे रेकॉर्ड मोडले. हॉलिवूडला एक ॲक्शन स्टार मिळाला. या पैशातून त्याने प्रथम आपला कुत्रा दामदुप्पट रक्कम देऊन विकत घेतला.
सिल्वेस्टरची ओळखच रॉकी या चित्रपटानं झाली. 10 ॲकाडमीचे पुरस्कार रॉकीनं पटकवले. तेव्हा 117 मिलियन डॉलरची कमाई केली. हा अभिनेता लेखकही होता… शिवाय ॲक्शन किंगही…. मग हॉलिवूडमध्ये त्याला मागणी वाढली. मग रॉकीचे पुढचे दोन भागही आले. ते चित्रपटही असेच सुपरहिट ठरले. जॉन रॅम्बो, द फर्स्ट ब्लड… हा चित्रपट सिल्वेस्टर कडे आला. तोही रॉकीसारखाच गाजला. सिल्वेस्टरचं नाव त्याच्या चाहत्यानं बदललं… त्याला रॉकी आणि रॅम्बो या नावानं ओळखलं जाऊ लागलं…. रॉकी आणि रॅम्बोचे पुढे सिक्वल येत राहीले… आणि त्याच्या चाहत्यांनी ते पहिल्यासारखेच डोक्यावर घेतले.
सिल्व्हरस्टरला हॉलिवूडमध्ये पोलादी ताकदीचा हिरो म्हणून ओळख मिळाली. त्याचे कोपलॅण्ड, गेट काल्टर सारखे चित्रपटही आले आणि चांगले गाजले.
पुढे लेखक असलेल्या सिल्व्हरस्टरने रॉकी बॅलबुआ या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार केली. हा चित्रपटही त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला. दि एक्सपेंडेबल चित्रपटही याच धाटणीतला होता… अॅक्शनच्या चाहत्यांसाठी सिल्वेस्टरचा प्रत्येक चित्रपट एका पर्वणीसारखा ठरला. त्यामुळे त्यांचे सिक्वल काढण्यात आले. फारकाय त्याच्या रॉकीवरुन अनेक देशांतील प्रेक्षणिय स्थळांना नावं देण्यात आली. फिलोडेफ्लियामधील संग्राहालयाच्या प्रवेशद्वाराला रॉकी नाव देण्यात आले. तिथे त्याचा रॉकी स्टाईलमधील पुतळाही लावण्यात आला… सिल्वेस्टरने आपलं पुस्तकही प्रकाशित केलं आहे. स्ली मूव्हज… या पुस्तकात त्याने तंदुरुस्ती आणि पौष्टीक आहार याबाबत लिहिले आहे. त्यात त्याची काही खास छायाचित्रही प्रकाशीत करण्यात आली आहेत.
गोल्डन आयकॉन पुरस्कारानं गौरविलेल्या या अभिनेत्याची तिन लग्न झाली आहेत. आयुष्याच्या सुरुवातीला अनेक आर्थिक चटके सहन केलेल्या या अभिनेत्यानं नंतर काही उद्योगव्यवसायातही गुंतवणूक केली आहे.
पिळदार शरीरयष्टीचा या अभिनेत्याचा विचार केला तरी समोर येते ते त्याचे रॉकीमधील राकट रुप… बॉक्सींगच्या आखाड्यात विरोधकावर तूटून पडणारा हा स्टार प्रत्यक्षात मात्र अमेरिकेत बंदूक मिळवण्यासाठी असलेल्या कायद्यांना कठोरता आणावी म्हणून प्रयत्न करतोय… आता वयाच्या पंचाहत्तरीत तो प्रवेश करतोय… पण अजूनही त्याच्याकडे असलेल्या चित्रपटांचा ओघ कायम आहे. यावरुच त्याची लोकप्रियता पहिल्या रॉकी एवढीच आहे हे नक्की… आता हा रॉकी राजकारणात रस घेऊ लागलाय… कदाचित अमेरिकेच्या पुढच्या निवडणुकीत हा रॉकी मैदानात उतरेलही….