‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
अभिनेता जितेंद्र सोबत अभिनेत्री साधना? एक हुकलेला योग!
हिंदी सिनेमाचा इतिहास धुंडाळताना अनेक मनोरंजक अशा गोष्टी सापडतात. जनरली आपण लोकप्रिय किंवा यशस्वी झालेल्या चित्रपटांच्या बाबतीत जास्त वाचत असतो लिहीत असतो. पण अयशस्वी चित्रपटांची देखील एक वेगळी दुनिया असते. त्यांच्या अपयशाची निरनिराळी कारणे असतात. इतिहास हा फक्त जेत्यांचा नसतो तो पराभूतांचा देखील असतो. अयशस्वी लोकांचा देखील असतो. साठच्या दशकात जेव्हा अभिनेत्री साधना तिच्या खास हेअर स्टाईलने आजच्या भाषेत सांगायचे तर ‘युथ आयकॉन’ बनली होती. जेव्हा ती हजारो तरुणांच्या दिलाची धडकन बनली होती. तिचे ‘मेरे महबूब’ आणि आरजू’ हे चित्रपट लागोपाठ हिट झाले होते, त्या काळातील ही गोष्ट आहे! (Actor Jitendra)
हिंदी सिनेमातील प्रत्येक नायक साधना सोबत काम करायला त्याकाळी उत्सुक असायचे. अभिनेता जितेंद्र (Actor Jitendra) तेव्हा शांताराम बापूंच्या ‘गीत गाया पत्थरोने’ या चित्रपटाचा नायक होता. तो देखील मनापासून एक स्वप्न पाहत होता “आपल्याला सुध्दा अभिनेत्री साधना सोबत काम करायची संधी मिळायला पाहिजे.” नशिबाने त्याला तशी संधी मिळाली देखील. १९६६ साली दिग्दर्शक अमर कुमार याने साधना आणि जितेंद्र यांना एकत्र घेऊन एका चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटाचं नाव होतं ‘महफिल’. या चित्रपटात साधनाचा डबल रोल होता. सिनेमाचे कथानक ख्यातनाम पत्रकार आणि लेखक खाजा अहमद अब्बास यांच्या १९५२ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनहोनी’ या सिनेमाशी साधर्म्य सांगणार होते. या ‘अनहोनी’ मध्ये राज कपूर आणि नर्गिस यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
अमर कुमार दिग्दर्शित ‘महफिल’ या चित्रपटाची कथा देखील पुन्हा एकदा के ए अब्बास यांनीच लिहिली होती. तर संवाद इस्मत चुगताई यांनी लिहिले होते. सिनेमाची गाणी मजरूह सुलतानपूरी यांची होती तर चित्रपटाला संगीत शंकर जयकिशन यांचे होते. सर्व काही व्यवस्थित चालू होते. याच काळात जितेंद्रचा रवी नगाईच दिग्दर्शित ‘फर्ज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिट झाला. जितेंद्रचा (Actor Jitendra) भाव एकदम वधारला गेला. याच काळात साधना हिला थायरॉईड या आजाराने घेरले आणि त्याच्या उपचारासाठी परदेशात निघून गेली. जेव्हा ती बोस्टन हून परत आली तेव्हा आजाराच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागल्या होत्या. एकेकाळची तरुणांच्या दिलाची धडकन आता पार बदलली होती. जितेंद्रच्या करिअरचा टेक ऑफ सुरू झाला होता. त्याला आता अशा अभिनेत्री सोबत काम करणे रिस्की वाटू लागले. गंमत पहा ज्या अभिनेत्री सोबत काम करण्यासाठी तो एकेकाळी तरसत होता आता तोच या चित्रपटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसांचे शूटिंग झाल्यानंतर जितेंद्र स्वतःला खूपच अन कम्फर्ट फील करू लागला आणि त्याने एके दिवशी हा चित्रपट चक्क सोडला!
आधीच साधनाच्या आजारपणाने चित्रपटाच्या चित्रिकरणाला उशीर झाला होता, त्यात पुन्हा अभिनेता जितेंद्रने हा चित्रपट सोडला. त्यामुळे दिग्दर्शक अमर कुमार यांना नवीन चेहरा शोधावा लागला. त्याकाळात पुण्याच्या फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मधून अभिनयाचे प्रॉपर शिक्षण घेऊन आलेले, बरेच जण सिनेमामध्ये येत होते. यात एक चेहरा होता अनिल धवन यांचा. बी आर इशारा यांच्या ‘चेतना’ या चित्रपटापासून अनिल धवन यांची हवा निर्माण झाली होती. दिग्दर्शक अमर कुमार यांनी आपल्या ‘महफिल’ या चित्रपटासाठी अनिल धवन यांची नायक म्हणून निवड केली आणि चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. अभिनेत्री साधना हिला या चित्रपटापासून खूप अपेक्षा होत्या. कारण नर्गिसने ‘अनहोनी’ मध्ये जी भूमिका केली होती तीच भूमिका, तोच डबल रोल तिला या सिनेमात करायचा होता. परंतु आता सर्व गणितं बदलत चालली होती. तिच्या आजारपणासाठी तिला वारंवार परदेशात उपचारासाठी जावे लागत होते.संगीतकार शंकर जयकिशन मधील जयकिशनच्या निधनाने गाण्याचे रेकोर्डिंग राहिले होते. अडचणी मागून अडचणी येत होत्या. याच काळात साधनाने ‘गीता मेरा नाम’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले. यातही तिचा डबल रोल होता. या सर्व गदारोळात ‘महफिल’ चे काम रेंगाळत गेले. १९७४ नंतर साधनाने चित्रपटात काम करणे बंद केले.
=========
हे देखील वाचा : हम बने तुम बने एक दुजे के लिये…
=========
‘महफिल’ या चित्रपटाचे डबिंगचे काम राहिले होते ते तिने नंतर पूर्ण केले. रडत खडत अनेक अडचणींवर मात करत १९६६ साली मुहूर्त झालेला चित्रपट तब्बल १५ वर्षानंतर १९८१ साली प्रदर्शित झाला. पण तेव्हा काळ पूर्णपणे बदलून गेला होता. साधनाची जादू संपली होती. अनिल धवनचे मार्केट डाऊन झाले होते.शंकर जय किशन यांच्या संगीतातील मेलडी कमी झाली होती. त्यामुळे हा चित्रपट एका आठवड्यातच थेटर बघून उतरवावा लागला. खरंतर जबरदस्त कथानक असलेल्या हा चित्रपट जर वेळीच बनला असता तर कदाचित चित्रपटाला बऱ्यापैकी यश मिळाले असते. पण तसं व्हायचं नव्हतं. चित्रपट रिलीज झाला आणि सुपरफ्लॉप झाला. जितेंद्र आणि साधना कधीच पडद्यावर एकत्र येऊ शकले नाही.