Adipurush Second Trailer: जानकीसाठी राम रावणाचा करणार वध; आदिपुरुषचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च
या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. नुकताच प्रदर्शित झालेल्या पहिल्या ट्रेलरमध्ये राघव आणि जानकीच्या प्रेमाची आणि विश्वासाची झलक चाहत्यांसमोर आली होती, आता अखेर चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला. अॅक्शनपॅक्ड या ट्रेलरमध्ये राघव आपली जानकी लंकेहून आणण्यासाठी निघताना दिसत आहे. म्हणजेच राघव आणि शिवभक्त रावण यांच्यातील युद्ध ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा तिरुपतीमध्ये पार पडला. चित्रपटाच्या दिग्दर्शकापासून ते निर्माते आणि स्टारकास्टपर्यंत सर्वजण भव्य अंदाजात ट्रेलर पाहण्यासाठी तिरुपतीला पोहोचले.(Adipurush Second Trailer)
अलौकिक दृश्ये आणि प्रभासच्या चेहऱ्यावर मनाला भुरळ पाडणारी शांतता, डोळ्यातील त्याची सिया परत आणण्याची चमक आणि रावणाचा नाश करण्याची तीव्र इच्छा यामुळे अखेर ‘आदिपुरुष’चा दुसरा आणि शेवटचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात रावणाच्या (सैफ अली खान) युक्तीने होते. जानकी (क्रिती सेनन) भिक्षा देण्यासाठी लक्ष्मण रेषा ओलांडते आणि रावण तिचे अपहरण करतो. राघव (प्रभास) रावणाच्या अन्यायाला चिरडून टाकण्यासाठी आपले युद्ध सुरू करतो. राघव आपल्या वानर सैन्यासह रावणाच्या लंकेला आग लावण्यासाठी पुढे जातो.
सुमारे २.३० मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये भरपूर अॅक्शन पाहायला मिळते. राघवच्या पावलावर पाऊल ठेवणारी वानर सेना रावणाच्या राक्षसांवर भारी परिणाम करताना दिसते. या ट्रेलरमध्ये महाकाव्याचे अनेक अध्याय थोडक्यात दाखवण्यात आले आहेत.ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट भारतीय महाकाव्य ‘रामायण’वर आधारित आहे. या चित्रपटात क्रिती सेनन जानकीची भूमिका साकारत आहे तर प्रभास राघवची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान लंकेचा राजा रावणाच्या भूमिकेत आहे, तर सनी सिंह लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे. हे एक पौराणिक नाटक आहे ज्याच्या निर्मितीसाठी 300 कोटी रुपये खर्च आला आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरिज आणि रेट्रोफिल्स या चित्रपटाची सहनिर्मिती करण्यात आली आहे. ‘आदिपुरुष’ १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. (Adipurush Second Trailer)
============================
हे देखील वाचा: Adipurush Trailer: अखेर मोस्ट अवेटेड ‘आदिपुरुष’ सिनेमा चा ट्रेलर आला समोर !
============================
दरम्यान, ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी आदिपुरुषच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रत्येक थिएटरमध्ये भगवान हनुमानासाठी एक सीट बुक करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या १० दिवस आधी ही घोषणा करून निर्मात्यांनी चाहत्यांना नक्कीच खूश केले आहे.