‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
‘हा’ चित्रपट पाहताच अटल बिहारींनी लावला थेट फोन
डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला ‘उंबरठा’(१९८१) हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीतील एक स्माईल स्टोन चित्रपट आहे. या सिनेमाला आज चाळीस वर्षे उलटली तरी प्रेक्षकांवरील त्याची जादू अबाधित आहे. या सिनेमाने प्रेक्षकांना विचार करायला शिकवले. मराठीमध्ये अभावानेच निर्माण होणारे असे बौद्धिक चित्रपट असतात त्यात ‘उंबरठा’चा नंबर खूप वरचा आहे. या चित्रपटाबद्दल खूप काही लिहिले गेले आहे. मागच्या वर्षीच्या ‘साधना’ दिवाळी अंकात जब्बार पटेल यांची प्रदीर्घ मुलाखत आहे. त्यांनी या सिनेमाच्या मेकिंगच्या अनेक गोष्टी यात सांगितल्या आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलाच; शिवाय समीक्षकांनी आणि समाजातील प्रत्येक घटकाने या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला. हा चित्रपट पाहून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी अभिनेत्री स्मिता पाटील हिला फोन केला होता आणि जवळपास अर्धा पाऊण तास ते या चित्रपटाबद्दल तिच्याशी बोलत होते! हा जबरदस्त किस्सा जब्बार पटेल यांनी या मुलाखतीत विस्तृतपणे सांगितला आहे.
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एकदा सुधीर नांदगावकर यांचा जब्बार पटेल यांना फोन आला आणि त्यांनी सांगितले,” अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) आज मुंबईमध्ये आहेत आणि त्यांना उंबरठा चित्रपट पाहण्याची इच्छा आहे!” अटल बिहारी वाजपेयी हे राजकारणातील एक सुसंस्कृत आणि साहित्य संगीत यांची आवड असलेला संवेदनशील कवी मनाचे नेते आहेत हे जब्बार पटेल यांना ठाऊक होते. त्यांनी ताबडतोब दादर टीटीला ब्रॉडवे नावाचे एक थिएटर आहे तिथे या ‘उंबरठा’ चित्रपटाचे स्क्रीनिंग खास वाजपेयी यांच्यासाठी करायचे ठरवले. यासाठी त्यांनी काही सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला कार्यकर्त्यांना देखील चित्रपट पाहण्यासाठी बोलावले. अटलजी वेळेत आले आणि जब्बार पाटील यांना भेटले. जब्बार यांना ते प्रथमच भेटत होते. जब्बार पटेल यांना भेटल्यानंतर त्यांना अटलजी (Atal Bihari Vajpayee) म्हणाले,” तो आप जब्बार पटेल हो. मला वाटलं होतं, जब्बार पटेल कुणीतरी वयोवृद्ध गृहस्थ असतील. तुम्ही तर खूपच तरुण दिसतात!” त्यावर जब्बार यांनी हसत हसत दुजोरा देत म्हणाले ,”या उंबरठा चित्रपटाची आम्ही हिंदी व्हर्शन देखील बनवली आहे ‘सुबह’ या नावाने. जर मला थोडे आधी समजले असते तर मी तुमच्यासाठी हिंदी आवृत्ती आज येथे दाखवू शकलो असतो.” त्यावर अटलजी म्हणाले,” अरे बाबा नही नही… हमे तो मराठी में ही देखनी है.. तुमच्या ‘घाशीराम कोतवाल’ बाबत देखील मला असेच कोणीतरी सांगितले याची हिंदी आवृत्ती देखील आहे. पण मला मराठी आवृत्तीच पाहायची होती आणि तो प्रयोग मी मराठी पाहिला आणि मला खूप आवडला. त्यातील ‘श्री गणराया नर्तन करी आम्ही पुण्याचे बामन हरी…’ मला आज देखील आठवते!” असं म्हणून वाजपेयी यांनी चक्क गाऊन जब्बार दाखवले. जब्बार पटेल यांना खूप आनंद झाला एक राजकारणी व्यक्ति देखील आपली कलाकृती किती बारकाईने पाहत असतात. याचे त्यांना कौतुक वाटले.
त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी संपूर्ण ‘उंबरठा’ चित्रपट शांतपणे बघितला. सिनेमा पाहिल्यानंतर ते जब्बार पटेल यांना म्हणाले,” मै आपको क्या कहू? जब्बार कहू या डॉक्टर कहू? बहुत बढीया फिल्म आपने बनाई है. देखो भैया जब्बार इस फिल्म में जो लडकी है ना इसने हमको बहुत रुलाया है. हमे उससे बात करनी है. ही मुलगी म्हणजे स्मिता पाटील शिवाजीराव पाटील यांची मुलगी आहे ना? साखर संघ वाल्या? शिवाजीराव सोशालिस्ट है हमारे अच्छे मित्र है. आपके पास स्मिता पाटील का नंबर है तो जरा बात करवाईये.” हे ऐकून जब्बार पटेल यांना खूप आनंद झाला लगेच त्यांनी स्मिता पाटीलला तिथून फोन लावला. स्मिता त्यावेळी घरीच होती. जब्बार म्हणाले ,”स्मिता अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांना तुझ्याशी बोलायचे आहे. त्यांनी आता आपला चित्रपट पाहिला आहे!” त्यावर स्मिता म्हणाली ,”अरे हे काय जब्बार? आधी तरी कळवलं असत तर मी आले असते ना! केवढा मोठा कवी माणूस आहे!”
त्यानंतर स्मिता पाटील आणि अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) तब्बल अर्धा पाऊण तास फोनवर बोलत होते. अटलजी इतके भारावून गेले होते की ते पुन्हा पुन्हा तिला म्हणत होते,” अरे बेटी तुमने हमको आज बहुत रुलाया है…” फोन झाल्यानंतर अटलजींनी तिथे उपस्थित असलेल्या महिला कार्यकर्त्यांसोबत देखील बातचीत केली आणि सिनेमातील प्रत्येक पैलू बाबत त्यांच्याशी चर्चा केली. चित्रपटाच्या क्लायमॅक्स बाबत अटलजी यांनी महिला कार्यकर्त्यांसोबत विचार विनिमय केला आणि स्मिताचा निर्णय किती योग्य आहे हे त्यांना सांगितलं. एकूणच या चित्रपटाचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्यावर झाला होता.
यानंतर एका कामाच्या निमित्ताने अटलजींना भेटायला जब्बार पटेल दिल्लीला गेले होते तिथे त्यांच्यासोबत लाल कृष्ण आडवाणी होते. तेव्हा वाजपेयींनी सांगितले “ ये डॉ जब्बार पटेल है हमने इनकी फिल्म देखी है उंबरठा. बहुत अच्छी है.” त्यावर आडवाणी म्हणाले,” मैने इनका नाम सुना है. लेकिन ‘उंबरठा’ नही देखी. क्या है फिल्म की कहानी?” जब्बार ने थोडक्यात स्टोरी लाईन सांगितल्यानंतर आडवाणी म्हणाले,” क्या इस फिल्म में गिरीश कार्णाड भी है? मैने ये फिल्म हिंदी मे देखी है. त्यावेळी मी ऑर्गनायझर या वर्तमानपत्रात लिखाण करीत होतो त्यावेळी मी या सिनेमावर लिहिले होते!” आता थक्क होण्याची पाळी जब्बार पटेल यांची होती. ‘उंबरठा’ चित्रपटावर समीक्षण लालकृष्ण अडवाणी यांनी ‘ऑर्गनायझर’ या नियतकालिकात लिहिले होते हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला.
=====
हे देखील वाचा : पानशेतच्या महापूरात वाचलेलं गदिमांच अजरामर गीत!
=====
पुढे तीन चार वर्षात अनपेक्षितपणे स्मिता पाटील यांचे निधन झाले. तेव्हा जब्बार पटेल यांना फोन करून वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) म्हणाले ,” वह बेचारी बच्ची चली गयी! उसने मुझे बहुत रुलाया था उंबरठा में…” स्मिता पाटीलच्या निधनाचे त्यांना प्रचंड दुःख झाले होते. स्मिता पाटील हे अभिनेत्री शरद पवार यांची देखील अतिशय आवडते अभिनेत्री होती. तिच्या भूमिकांचे त्यांना खूप कौतुक असायचे. शिवाजीराव पाटील हे शरद पवार यांचे मित्र. जेव्हा स्मिता गेली त्या दिवशी शरद पवार मुंबईमध्ये होते. ते जब्बार पाटील यांना म्हणाले,“आपल्याला नायर हॉस्पिटलमध्ये तिला आणायला गेले पाहिजे.” ते स्वतः नायर हॉस्पिटलमध्ये गेले आणि स्मिताचा पार्थिवा सोबत शरद पवारांनी साथ दिली अगदी तिला शेवटचा निरोप देइ पर्यंत. राजकारणी लोकांचा एक वेगळा पैलू आपल्याला येथे दिसून येतो!