अकोला ते मुंबई, बाप्पाच्या आठवणी… – ऋत्विक केंद्रे
‘मानसीचा चित्रकार तो’ या मालिकेतून आपल्याला परिचित झालेला अभिनेता म्हणजे ऋत्विक केंद्रे. त्याने ‘ड्राय डे’ नावाच्या चित्रपटात देखील काम केले आहे. ऋत्विक च्या घरी पण पाच दिवसांचा गणपती येतो. तो म्हणतो, “आम्ही मुंबईच्या घरात २०१४ पासून गणपती आणायला सुरुवात केली. मला गणपती उत्सव आठवतो तो अकोल्यामधील.
अकोल्याला आमचे मामा राहायचे. त्यांच्याघरी गणपती असायचा. आम्ही सर्व भावडं जमायचो. खूप मजा यायची. तिथे पूजा अर्चा, सोवळे या गोष्टी खूप कडक असत. आमच्या घरी महालक्ष्मी असायच्या. (गौरी पूजन) मला आठवतंय की आम्ही सर्व भावंडं अकोल्यामधील सार्वजनिक गणपती बघायला जात होतो. तिथे त्या काळात सायकल रिक्षा असायच्या. आम्ही एका सायकल रिक्षावाल्याला सांगून ठेवलेलं असायचं आणि मग संध्याकाळी आम्हा भावंडांचा मोर्चा तिथले चौकाचौकात असलेले सार्वजनिक गणपती पाहायला निघायचा. माझी आई तिच्या मैत्रिणींकडे सुद्धा मला गणपती आणि खास करून महालक्ष्मी दर्शनाला घेऊन जायची.
गेली काही वर्षे सर्व नातेवाईक मुंबईत वास्तव्याला आहेत. आम्ही यंदाच्या वर्षी देखील पाच दिवसांसाठी गणपती आणला आहे. फक्त यंदा गणपतीची मूर्ती छोटी आहे. दरवर्षी आमच्या घरी एक पद्धत अशी आहे की गणपतीला आम्ही एक तरी दागिना करतोच. गणपतीच्या निमित्ताने गणपतीसाठी म्हणून एखादा चांदीचा किंवा मोत्याचा दागिना खरेदी केला जातो. कांदिवलीचं सार्वजनिक गणेशोत्सवात एकदा मी एकपात्री अभिनय स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात मला पारितोषिक मिळाले होते, ती आठवण सुद्धा आता येत आहे.”
ऋत्विकचा ‘सरगम’ नामक चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल.