थ्री इडियटस्: एक हुशार चित्रपट
काही चित्रपट मनोरंजक असतात. काही समाजावर परिणाम साधणारे असतात. पण मनोरंजन आणि सामाजिक परिणाम या दोन्हींचा यशस्वी मेळ साधणारा चित्रपट म्हणजे थ्री इडियटस्… (3 Idiots) या चित्रपटाची ही पुरी फिल्मी कहानी.
या चित्रपटातील महत्वपूर्ण भूमिका म्हणजे आमिर खानने साकारलेला रॅन्चो. ह्या भूमिकेसाठी सर्वात आधी शाहरुख खानला (Shahrukh Khan) विचारण्यात आले होते. त्याच्या तारखा ‘माय नेम इज खान’ चित्रपटाला दिल्याने जुळत नव्हत्या. आणि म्हणून ती भूमिका आमिर खानकडे गेली. या चित्रपटाला भरघोस यश मिळाल्यावर ही इतकी छान भूमिका नाकारणारे आपण ‘फोर्थ इडियट’ असल्याचे शाहरुखने म्हटले होते. ह्या चित्रपटात भूमिका करायला अनेकजण उत्सुक होते. अर्शद वारसी त्यापैकीच एक. पण त्याच्याही तारखा जुळल्या नाही. करीना कपूर राजकुमार हिरानी यांच्या सोबत काम करायला उत्सुक असल्याने तिने स्वतः हून या चित्रपटात काम करण्याविषयी हिरानी यांना विचारले.
चित्रपटाची कथा ‘द इम्पिरीकल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ मध्ये घडते. प्रत्यक्षात चित्रपटात दिसलेले कॉलेज म्हणजे ‘द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगळूर’ होय.
या चित्रपटात आमिर खान (Amir Khan) समोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे वयाच्या ४४व्या वर्षी कोवळा कॉलेज तरुण दिसणं. चित्रपटात प्रिन्सीपलची भूमिका करणा-या बोमन इराणींपेक्षा आमिर वयाने फक्त ५ वर्षं लहान होता. त्यासाठी आमिरने इतकं कडक डाएट पाळलं की स्वतःच्या बर्थडेचा केक खाणंही त्याने टाळलं. त्यामुळे तो पडद्यावर कॉलेज तरुण वाटतो. त्याचं वय कुठेही आडवं येत नाही. हा चित्रपट पूर्ण उलट चित्रीत झालेला आहे. वर्तमानकाळातील गोष्टी ज्या चित्रपटात शेवटी येतात त्या आधी आणि कॉलेज दिवस नंतर चित्रीत झाले.
या चित्रपटातील काही प्रसंग चित्रित करणं त्या कलाकारांसाठी सुद्धा थोडं अवघड गेलं असेल. कॉलेज रॅगिंग सीनमध्ये पॅण्ट उतरवण्याच्या प्रसंगाला आर. माधवनच्या पत्नीचा विरोध होता. पण अखेर तो सीन चित्रीत झालाच. त्यामुळे चिडलेल्या आर. माधवनच्या पत्नीने त्याच्याशी कित्येक दिवस अबोला धरला होता.
ह्या चित्रपटातील काही भागाचे चित्रीकरण लेह इथे झाले. लेह मधल्या पद्मा कार्पो स्कुलमध्ये चतूरचा सुसु सीन ज्या भिंतीवर केला गेला, आज ती भिंत रंगवून तिला ‘रॅन्चो वॉल’ असे नाव देण्यात आले आहे. पर्यटकांचा तो आवडता स्पॉट आहे हे विशेष.या चित्रपटाने भारतात तुफान यश मिळवले आणि प्रेक्षकांच्या मनात जागाही. ह्या चित्रपटाने कमावलेल्या गल्ल्यासाठी चित्रपटाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले. त्याचबरोबर सुप्रसिद्ध हॉलीवूड दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी हा चित्रपट तीन वेळा पाहून त्याचे विशेष कौतुक केले.
या चित्रपटाने अनेक भारतीय पालकांना हलकासा चिमटा घेत भारतीय शिक्षण पद्धतीवरही आसुड ओढले. अर्थात या संदेशापेक्षाही तो त्यातल्या मनोरंजनासाठी जास्त लक्षात राहिला. ज्या सोनम वांगचुक यांच्यावर रॅन्चो हे पात्र बेतलं होतं त्यांच्या कार्याकडे फारसं लक्ष वेधलं गेलं नाही हे वास्तव सोडलं तर आज थ्री इडियटस् हा सर्व वयोगटातील मंडळींचा आवडता सिनेमा आहे हे नक्की!
=====
हे देखील वाचा: मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट शाहरुखने का सोडला ?
=====